राणेंना सेनेने तूर्त रोखले, पुढे काय?

By यदू जोशी on Mon, November 27, 2017 12:46am

भाजपासोबत येऊन अवघे काही दिवस नाही होत तोच नारायण राणे हे युतीतील तणावाचे कारण ठरले आहेत. त्यांना मंत्री करण्यावरून विस्ताराचेच घोडे अडल्यासारखे आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’, अशी युतीतील दोन पक्षांची अवस्था आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले की ते आता सरकारमधून बाहेर पडणारच असे वाटू लागते. पण भाषण संपता संपता ते ‘सरकारला साथही देऊ अन् लाथही देऊ’ असे सांगतात. मग शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याऐवजी शिवसैनिकच सभा संपवून बाहेर पडतात. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत’, असे शरद पवार म्हणतात ते काही खोटे नाही. विदेशीच्या मुद्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर व १९९९ च्या विधानसभा निकालानंतर राष्ट्रवादीचे पायही सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकले होतेच ना! ते त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये तणाव, कुरघोडीचे अनेक प्रसंग आले, पण फेव्हिकॉलचा जोड पक्का राहिला. उद्धव ठाकरेंना मानले पाहिजे. राणेंना आमदार होण्यापासून त्यांनी रोखले आणि मंत्री होण्यापासून रोखण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तारच त्यांनी रोखून धरल्याचे आजचे तरी चित्र आहे. भविष्यात राणेंना घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल. ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उपयोग करीत राणेंना मंत्री करताना त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. अनेक वर्षे राणे शिवसेनेतच राहिलेले असल्याने त्यांची शक्ती आणि उपद्रवमूल्य या दोन्हींची शिवसेनेला चांगलीच जाणीव आहे. शिवाय, भाजपाचे बळ मिळाल्यास कोकणात राणे आपल्याला धक्के देऊ शकतात हेही मातोश्री ओळखून आहे. म्हणूनच राणे कोणत्याही परिस्थितीत नकोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. युतीच्या वादात आणि शिवसेनेने विषय प्रतिष्ठेचा केल्याने राणेंची मात्र तूर्त चांगलीच कुचंबणा होत आहे. गुजरातच्या निवडणूक निकालावर बरेच काही अवलंबून असेल. तेथे भाजपाला सत्ता मिळाली तर प्रसंगी शिवसेनेचा विरोध पत्करून राणेंना मंत्री करण्याची जोखीम भाजपा पत्करू शकेल. समजा गुजरातमध्ये भाजपाची सत्ता गेली तर शिवसेनेशी जुळवून घेण्याची भूमिका घेताना राणेंना बाजूला ठेवणे भाजपाला भाग पडेल, असे दिसते. युतीच्या भांडणाचा फायदा घेत सध्या शरद पवारांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राज्य पिंजून काढत आहेत. भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे. संवेदनशीलता अशीही नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे सादरीकरण एमएसआरडीसीने पत्रकारांसमोर केले. त्यावेळी या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी उपस्थित होते. प्रकल्प गतिमानतेने पूर्ण करण्यासाठी काय काय करणार, हे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगत होते. एका पत्रकाराने प्रश्न केला, ‘प्रकल्प पारदर्शकरीत्या पूर्ण व्हावा म्हणून काय करणार? संवेदनशील गगराणी यांनी पारदर्शकतेसाठी काय काय करता येईल, यासंदर्भात लगेच दुसºया दिवशी त्या पत्रकाराकडून लेखी सूचना मागविल्या आणि त्यानंतर १५ दिवसांतच प्रकल्पाच्या पारदर्शकतेसाठी कुठल्या उपाययोजना करणार, ते त्या पत्रकाराला लेखी कळविले. गगराणींची संवेदनशीलता बघून पत्रकारही अवाक् झाला.  

संबंधित

कांदा दर घसरणीवर थेट अनुदानाचा उतारा
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 डिसेंबर
आमदार राहात आहेत धोकादायक ‘मनोरा’मध्ये
उद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 डिसेंबर

संपादकीय कडून आणखी

कॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक!
हुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत !
‘या’ निकालाचा परिणाम होणे निश्चित!
न्यायसंस्थेतही हिंदुत्व!
विजेच्या महागाईवर बचतीचा तोडगा

आणखी वाचा