शापातून मुक्ती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:53 PM2017-12-17T23:53:12+5:302017-12-18T00:04:28+5:30

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे.

 Release from the curse! | शापातून मुक्ती द्या!

शापातून मुक्ती द्या!

Next

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वयन समारंभाच्या निमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी रविवारी पश्चिम विदर्भात पायधूळ झाडून गेले. रविवारी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १०४ सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये एकट्या विदर्भातील ७८ प्रकल्पांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांचा शाप लाभलेल्या विदर्भासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भागाला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्त करायचे असेल, तर सिंचनाच्या सोयी वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. दुर्दैवाने आतापर्यंत सिंचन सुविधा वाढविण्यासाठी घोषणाबाजी खूप झाली; पण प्रत्यक्षात नगण्य कामे झाली. परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष वाढताच राहिला. सुदैवाने सध्या केंद्र सरकारचे जल संधारण मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री पद, विकासाची दूरदृष्टी, कल्पकता आणि धडाडी असलेल्या विदर्भाच्या दोन सुपुत्रांकडे आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि विदर्भाच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्या जाईल, अशी आशा करण्यास हरकत नाही; मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्पांची आजवरची वाटचाल बघून, मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांच्या घोषणा झाल्या नाहीत, असे अजिबात नाही. अनेक लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांचे स्वप्न विदर्भाला वेळोवेळी दाखविण्यात आले. दुर्दैवाने गोसेखुर्द, जिगाव, निम्न पैनगंगासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे, घोषणेस दोन-तीन दशके उलटूनही पूर्णत्वास गेली नाहीत. मोठे प्रकल्प तर सोडाच; पण अनेक लघु प्रकल्पही, विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत. त्यामधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चवीने चघळल्या जातात. गेल्याच आठवड्यात सिंचन घोटाळ्यांशी संबंधित आणखी चार प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाले. एकीकडे जुन्या सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू होत असताना, दुसरीकडे रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याची कामे सुरू होत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न व्हायचे ते होत राहील; पण आता तरी कालमर्यादा निश्चित करून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा आणि या भूमीला शेतकरी आत्महत्यांच्या शापातून मुक्ती द्या, एवढीच फडणवीस-गडकरी जोडगोळीकडून अपेक्षा आहे!

Web Title:  Release from the curse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.