आक्रमक अन् संवेदनशील बंगालबाबत जरा जपूनच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:15 AM2019-07-15T05:15:41+5:302019-07-15T05:16:06+5:30

बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे.

Regardless of Bengal ... | आक्रमक अन् संवेदनशील बंगालबाबत जरा जपूनच...

आक्रमक अन् संवेदनशील बंगालबाबत जरा जपूनच...

Next

बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे. ते दीर्घकाळ डाव्यांच्या ताब्यात राहिले आहे. स्वत: ममता बॅनर्जी या शीघ्रकोपी नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. तसा सारा बंगालच कमालीचा शीघ्रकोपी व आत्मनिष्ठ आहे.
गोवा, मेघालय, कर्नाटक आणि आता बंगाल. भाजपच्या ‘सर्व राज्ये स्वाहा’ या सध्याच्या धोरणाचा स्पर्श आता बंगालला झाला आहे. त्या पक्षाचे एक प्रवक्ते महेश जोशी म्हणाले, बंगालचे १०७ आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व कम्युनिस्ट या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भाजपचा अलीकडचा इतिहास पाहता त्यांच्या वक्तव्यात तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. अडचण एवढीच की बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे. ते दीर्घकाळ डाव्यांच्या ताब्यात राहिले आहे. स्वत: ममता बॅनर्जी या शीघ्रकोपी नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. तसा सारा बंगालच कमालीचा शीघ्रकोपी व आत्मनिष्ठ आहे. ज्या काळात अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा होती त्या ब्रिटिशकाळात तेथील तुरुंगात महाराष्ट्राचे तीन तर एकट्या बंगालचे २५० स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा बंगालमध्ये बंगाली राष्ट्रवादाने उचल खाल्ली होती. त्याचे नेतृत्व लीगचे शहीद सु-हावर्दी आणि सुभाषचंद्रांचे भाऊ शरदचंद्र बोस हे करीत होते.


या शरदचंद्रांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन नेहरूंनी त्यांचा झेंडा उतरवायला लावला होता. त्या राज्याने थेट टाटांना चटके दिले. तेथील नक्षलवादी चळवळ त्याने जागीच संपविली आहे. अशा राज्याच्या राजकारणात तोडफोड व पक्षांतर घडवून आणण्याचे भाजपचे कृत्य त्याच्यासकट साऱ्या देशावर उलटू शकते ही बाब लक्षात घ्यावी एवढी गंभीर आहे. बंगाल हे मुळातूनच डावे, क्रांतिकारी व स्वत:च्या स्वतंत्र बाण्यावर कमालीचा भरोसा असलेले राज्य आहे. देशबंधू दास, सुभाषबाबू, अरविंद घोष, नवनिर्माण चळवळ, युगांतर व पुढे नक्षलवाद हा त्याचा इतिहास कमालीचा उग्र राहिला आहे. ममता बॅनर्जींचा उदय, उठाव आणि आक्रमकता या पार्श्वभूमीवर पाहायची आहे. त्यांना भाजप नको, काँग्रेस नको आणि तिसरी आघाडीही नको. त्या आणि फक्त त्याच स्वत:ला बंगालच्या तारणहार मानणा-या नेत्या आहेत. त्यांना डिवचून केंद्र सरकार एका नव्या व न संपणा-या संघर्षाला तोंड द्यायला सज्ज झाले आहे. ममता बॅनर्जी या सहजपणे समजूत पटणा-या नेत्या नाहीत. त्या केंद्रावर कशाही उलटू शकतात आणि त्यांचा पक्षही त्यांच्याएवढाच आक्रमक व फारशी भीडभाड नसणारा आहे. त्यामुळे गोव्यात जे झाले आणि कर्नाटकात जे होत आहे ते तसेच बंगालमध्ये होईल, अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. आपण नव्याने पंजाब व काश्मीरसारखे आणखी काही करून टाकू अशी याची भीती केंद्राने त्याचमुळे बाळगली पाहिजे. तृणमूल काँग्रेस पक्षाला कोणतीही भूमिका वा विचार नाही. ममता दाखवतील तीच त्याची दिशा आहे. पण तो पक्ष बलशाली आहे, त्याचे विधानसभेत बहुमत आहे आणि चोवीस खासदार लोकसभेत आहेत. उद्या ममताबाई तेथील जनतेला केंद्रविरोधी लढ्याचा आदेश देऊ शकतील व तेथील जनतेच्या मनात आजवर झालेल्या अन्यायाचा रोष एखादेवेळी उफाळूनही येईल.

सुभाषबाबूंच्या नंतरचा फॉरवर्ड ब्लॉक, युगांतर व नवनिर्माण या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला कम्युनिस्ट पार्टीतील प्रवेश आणि आता त्याच्या जोडीला प्रत्यक्ष तृणमूल काँग्रेस तो संघर्ष केंद्रालाही फार जड जाईल. मणिपूर, नागालॅन्ड, मिझोरम आणि आसाम ही पूर्वेकडील राज्ये तशीही अशांत आहेत. त्यातून बंगाली माणूस एकदम भडकून उठतो. त्याने टाटांचे आणि त्यांच्या नॅनो गाडीचे काय केले हा इतिहास ताजा आहे. केंद्र व विशेषत: त्यातील गृहमंत्री अमित शहा यांना नको तशा प्रतिज्ञा नको त्या वेळी करण्याचा सोस आहे. बंगालातील तृणमूल काँग्रेसची राजवट उखडून टाकण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. हे भांडण राजकारणापुरते मर्यादित आहे तर एकदाचे ठीक, पण ते जनतेचे झाले तर मात्र त्याचा स्फोट मोठा होईल आणि सा-या देशाला दीर्घकाळ मनस्ताप भोगावा लागेल. जी गोष्ट गोव्यात करता येते किंवा कर्नाटकात यशस्वी होते ती देशात सर्वत्र यशस्वी होईलच असे नाही. तसाही आपला देश बहुविध प्रवृत्तींचा आहे आणि बंगालची प्रवृत्ती कमालीची आक्रमक व संवेदनशीलही आहे.

Web Title: Regardless of Bengal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.