राज ठाकरे यांचे चला गावाकडे!

By किरण अग्रवाल | Published: December 20, 2018 08:02 AM2018-12-20T08:02:15+5:302018-12-20T08:02:28+5:30

आतापर्यंत अधिकतर शहरी राजकारणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राज ठाकरे यांनी ग्रामीण भागात मोर्चा वळवून भात व कांदा उत्पादकांच्या समस्या जाणून घेतल्या हे बरेच झाले म्हणायचे...

Raj Thackeray Advice to public goes to the village | राज ठाकरे यांचे चला गावाकडे!

राज ठाकरे यांचे चला गावाकडे!

Next

- किरण अग्रवाल
आतापर्यंत अधिकतर शहरी राजकारणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राज ठाकरे यांनी ग्रामीण भागात मोर्चा वळवून भात व कांदा उत्पादकांच्या समस्या जाणून घेतल्या हे बरेच झाले म्हणायचे, कारण त्यांच्यामुळे ग्रामीण जनतेला आपला आवाज बुलंद करण्यासाठी एक पर्याय मिळाला. त्या पर्यायी भूमिकेतूनच राज यांना ग्रामीण दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला; पण हा प्रतिसाद तरी त्यांना टिकवून ठेवत मतयंत्रात परावर्तित करता येणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजकारणात नवनिर्माण घडविण्याकरिता स्वतंत्रपणे पाऊल उचलले तेव्हा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा शहरी भागावरच लक्ष दिल्याचे दिसून आले. संघटनात्मक बांधणी व त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था असो, की विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका; मनसेने या क्षेत्रातच ताकदीने लढविल्या व काही ठिकाणी यशही संपादिले. मला पारंपरिक पद्धतीतला धोतरातला नव्हे तर जिन्स पँटमधला शेतकरी बघायचाय व नवा महाराष्ट्र घडवायचाय, असे राज ठाकरे नेहमी म्हणत आले; परंतु ग्रामीण भागात व शेतक-यांपर्यंत ते ख-या अर्थाने पोहोचू शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आता कांद्याचे दर घसरल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी सुरू केलेली आंदोलने पाहता, ठाकरे यांनी तिकडे आपला मोर्चा वळविल्याने त्यांचेही राजकारण चलो गाव की ओरच्या दिशेने सुरू झाल्याचे म्हणता यावे.

मनसेच्या स्थापनेनंतर लोकसभा व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय पदाधिका-यांच्या नियुक्त्या होत आल्या आहेत ख-या; परंतु नेतृत्वाचा एकखांबी तंबू असल्याने राज ठाकरे यांना ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष पुरवता आलेले नाही. ग्रामीण भागात आजही परंपरेने काँग्रेस, राष्ट्रवादी व नंतरच्या काळात शिवसेना रुजलेली-वाढलेली दिसून येते. भाजपा स्वबळावर सत्तेचे स्वप्न पाहात असली तरी, ग्रामीण भागात त्यांची स्थिती कमजोर आहे हे त्यांनाही ठाऊक आहे. शहरी भागातील भाजपाच्या यशाला ग्रामीणमधील शिवसेनेची साथ या बळावर युतीचे सत्तेचे स्वप्न पूर्ण होत आले आहे. या सर्वपक्षीयांच्या ग्रामीणमधील हजेरीपटात मनसे अगदीच जेमतेम राहिली आहे. म्हणूनच, कांदा प्रश्नानिमित्ताने राज ठाकरे यांचे ग्रामीण भागात लक्ष पुरवणे त्यांच्या पक्षासाठी संधीची नवी कवाडे उघडी करून देणारे ठरू शकते, शिवाय शिवसेनेच्या ग्रामीण भागातील प्रभावाला धक्का देण्याचे काम यातून घडून येऊ शकते.

मनसेच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांच्या हाती आलेल्या संधीचे सोने न करता शहरी जनतेचा तसा भ्रमनिरासच घडविला असला तरी, राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाबद्दलची औत्सुक्य टिकून आहे हेदेखील तितकेच खरे. राज यांच्या सभांना गर्दी जमते ती त्यामुळेच. पण, अनुभव घेऊन झालेले मतदार पुन्हा त्यांच्या वाटेला न गेल्याचा नाशकातील अनुभव आहे. अर्थात, मध्यंतरी खुद्द राज ठाकरे पक्षाकडे तितकेसे लक्ष देऊ शकले नव्हते त्यामुळेही पक्षीय विकलांगता ओढवली होती; परंतु आता पुन्हा नव्या जोशाने ते परतून आले आहे. एकेकाळी नाशकातील गोदा पार्कची निर्मिती करताना गुजरातेतील साबरमतीच्या काठाचे व नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारे राज आता पूर्णत: यू टर्न घेऊन मोदी विरोधात तोफा डागत आहेत. राष्ट्रीय राजकारण, शहरी प्रश्न व त्याजोडीला आता ग्रामीण भागातले शेती व शेतक-यांशी संबंधित विषय अशा सर्वांगीण भूमिकेतून राज यांची ही वाटचाल होऊ घातल्याने ती मनसेसाठी आशादायी म्हणता यावी; पण प्रश्न आहे तो त्यातील सातत्य टिकवून ठेवण्याचा.

मनसेला व खरे तर राज ठाकरे यांना नाशिककरांनीच प्रारंभात मोठा हात दिला होता. एकाच वेळी शहरातले तीन आमदार निवडून देताना लोकसभेच्या निवडणुकीतही दुस-या क्रमांकाची मते दिली होती. नाशिक महापालिकेतही सत्तेपर्यंत पोहचविले होते; परंतु नवनिर्माणाच्या खुणा उमटायला विलंब झाल्याने गेल्या वेळी मतदार भाजपाच्या पर्यायाकडे वळाले. त्यानंतर मनसेकडून संघटनात्मक सक्रियतेतील सातत्य टिकवून ठेवले गेले नाही. परंतु आता अलीकडेच नव्याने संघटनात्मक बांधणी केली गेली आहे. जनतेचा अन्य पर्यायांकडूनही भ्रमनिरास होत असल्याने अशा स्थितीत ग्रामीण भागातील जनतेला मनसेचा पर्याय खुणावू शकतो. राज ठाकरे यांच्या ग्रामीण दौ-यास त्यामुळेच प्रतिसाद लाभतांना दिसत आहे. कांदाप्रश्नी सत्ताधा-यांना कांदे फेकून मारा, असे खास ठाकरे शैलीतले आव्हान करून राज यांनी ग्रामीण भागात आपली रुजुवात करून घेतली आहे. आता त्यांच्याकडून व मनसेकडूनही ग्रामीण शेतकरी समस्यांशी जोडलेल्या नाळेच्या संबंधाशी सातत्य राखले जाणे गरजेचे आहे. तसे झाले तर, पक्षाच्या नवनिर्माणालाही गती लाभू शकेल.

Web Title: Raj Thackeray Advice to public goes to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.