तीक्ष्ण दृष्टीचे रघुराम राजन पण

By admin | Published: June 9, 2015 05:01 AM2015-06-09T05:01:35+5:302015-06-09T05:01:35+5:30

अ‍ॅलन ग्रीनस्पॅन हे अमेरिकेचे माजी फेडरल रिझर्व्ह चीफ होते. २००८ नंतरची जी आर्थिक घसरण झाली त्याला त्यांची धोरणे कारणीभूत ठरली होती.

Raghuram Rajan, for a sharp vision, too | तीक्ष्ण दृष्टीचे रघुराम राजन पण

तीक्ष्ण दृष्टीचे रघुराम राजन पण

Next

हरिष गुप्ता (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

अ‍ॅलन ग्रीनस्पॅन हे अमेरिकेचे माजी फेडरल रिझर्व्ह चीफ होते. २००८ नंतरची जी आर्थिक घसरण झाली त्याला त्यांची धोरणे कारणीभूत ठरली होती. त्यांच्या स्वत:च्या कामाविषयीच्या कल्पना अत्यंत साध्या सोप्या आहेत. ते अधूनमधून जी धोरणे जाहीर करतात, त्याचे परिणाम जगभर जाणवत असतात. ते म्हणाले, ‘‘फेडरल रिझर्व्ह येथे मी नवी भाषा शिकलो जी फेड-स्पीक या नावाने ओळखली जाते. तुम्ही लवकरच त्या असंबंद्ध भाषेत बोलू लागाल.’’
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे देशाचे केंद्रीय बँकर म्हणून ओळखले जातात. बँकिंगच्या क्षेत्रात त्यांची दृष्टी बहिरी ससाण्यासारखी तीक्ष्ण आहे. त्यामुळेच ते अ‍ॅलन ग्रीनस्पॅनच्या अगदी उलट आहेत. पण त्यांनी फेड-स्पीक भाषेचे भारतीय रूप सादर केलेले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी बँकांचा रेपो दर ०.२५ ने कमी केला. ही कृती त्यांनी आपल्या मनाविरुद्ध केली. पण त्यांनी रेपोचा दर कमी करण्यास मान्यता दिली नसती तर ते वाईट ठरले असते. कारण भारतीय चलनाचे ते कस्टोडीयन म्हणून ओळखले जातात. भारताच्या क्षितिजावर महागाईचे ढग दाटले असताना रेपो दरात लहानशी कपात करण्यास त्यांना मान्यता द्यावी लागली. एका वर्षात त्यांनी केलेली ही तिसरी कपात होती. ही कपात करताना आपल्या बहिरी ससाण्यासारख्या प्रतिभेला कुठे धक्का लागणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती.त्यांची कृती आणि त्यांचे शब्द यांचा कुठेच ताळमेळ बसत नाही हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. केंद्रीय सांख्यीकीय कार्यालयाच्या विकास मोजण्यासाठी नव्या पद्धतीविषयी त्यांच्या मनात संशय आहे. त्यांनी आपल्या धोरणाचे पूर्वी जे आकलन केले आहे त्यात या नव्या पद्धतीविषयी असलेले विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणाले होते, ‘‘साडेसात टक्के विकास गृहित धरला तरी त्यात अबकारी कराचा आणि सबसिडीचाही वाटा आहे. तो तुम्ही वजा केला तर विकास खूप भरीव आहे, असे जाणवत नाही.’’ विकासाचे आकडे नव्या पद्धतीमुळे चांगले दिसत असतील, तर ती निश्चितच काळजी करण्यासारखी बाब आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे केंद्र सरकारच्या विरोधात का भूमिका घेत आहेत हे कळत नाही. आपला विरोध ते मऊमुलायम शब्दातून व्यक्त करीत असतात. ‘‘मी जर व्याजदरात कपात केली तर मी सरकारला खूष करीत आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि मी व्याजदरात कपात केली नाही तर मला सरकारशी संघर्ष करायचा आहे असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही एक विचार पक्का का करीत नाही? ’’ असे मत त्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी जे शब्द वापरले त्यातून त्यांच्या मनात जी घालमेल सुरू आहे ती व्यक्त झाली. ते उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘रिझर्व्ह बँक ही काही चीअर लीडर नाही. ती भूमिका बजावण्याचे काम देशातील अन्य लोक करीत असतात. आमचे काम लोकांच्या मनात आपल्या चलनाविषयी विश्वास निर्माण करणे हे आहे. असा विश्वास निर्माण झाल्यावर त्यातून चांगले निर्णय घेण्याची चौकट निर्माण होत असते.’’ आपल्या देशाचे भाववाढीचे व्यवस्थापक असलेल्यांचे केंद्र सरकारच्या धोरणांशी पटत नाही असे दिसते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळचा मान्सून नेहमीपेक्षा कमी राहील असा अंदाज कुणीच व्यक्त केलेला नाही असे म्हटले आहे. पण राजन हे त्यांच्याशी सहमत होत नाहीत. उलट त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ‘‘यापूर्वी ‘एल निनो’ असतानाही चांगला पाऊस पडला आहे. पाऊस कमी पडला म्हणून उत्पादन घटले असेही झालेले नाही.’’ हे सांगून राजन यांना काय म्हणायचे आहे? उलट त्यातून त्यांच्या मनातला गोंधळच स्पष्ट झाला आहे. त्यानंतर ते विकासाविषयीच्या स्वत:च्या कल्पनेकडे वळून म्हणाले, ‘‘आपल्या अर्थकारणात कपात करणे आवश्यक आहे असे तुम्हाला का वाटते?’’ कारण विकास साडेसात टक्के इतका झाला आहे. त्यांच्या हातात असते तर त्यांनी कपात करण्यास मान्यता दिली नसती. हे सांगत असताना ते निसटून जाण्याचा स्वत:चा मार्ग मोकळा ठेवतात. ‘‘काही बाबतीत सध्याची कपात आवश्यक आहे असे वाटते. सध्याच्या परिस्थितीत तेच योग्य आहे.’’
अर्थशास्त्र हे तसे पाहता भौतिकशास्त्रासारखे आहे. त्यात निश्चितता कमी असते. त्याचे निष्कर्ष मात्र सर्वांनी स्वीकारले आहेत. आर्थिक अपेक्षा या खरीददारांच्या तसेच विक्रेत्यांच्या सामूहिक आशा आणि भीतीने तसेच मध्यवर्ती बँकरच्या शब्दांनी आकारास येत असतात. ग्रीन स्पॅनच्या फेड-स्पीक प्रमाणे त्या नसतात तर लोकांच्या आकांक्षांवर आधारलेल्या असतात. मला वाटते की राजन यांनी ग्रीनस्पॅनचे म्हणणे खूपच गंभीरपणे घेतलेले दिसते.
वास्तविक त्यांनी ते तसे घेण्याची गरज नव्हती. २००५ साली ग्रीनस्पॅनच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘‘अलिकडच्या आर्थिक घडामोडींमुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे बरोबर होते. पण त्यावेळचे अन्य प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तसेच अमेरिकेचे लॉरेन्स सुमेर्स यांनी राजन यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. पण त्यानंतर २००८ साली बँकिंगच्या क्षेत्रात जो पेचप्रसंग निर्माण झाला, त्यामुळे राजन यांना लौकिक प्राप्त करून दिला. राजन यांना बहिरी ससाण्यासारखी तीक्ष्ण दृष्टी आहे असा त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असताना आणि आता रिझर्व्ह बँकेचे प्रमुखपद भूषवित असताना त्यांनी याच तीक्ष्ण दृष्टीचा प्रत्यय आणून दिला. त्यांची प्रतिमा धोका न पत्करणारी अशी झाली आहे. ती त्यांना त्यांच्या भविष्यातील करियरमध्ये उपयोगी पडणार आहे. सधन राष्ट्रात जे परिवर्तन घडून येत आहे आणि दक्षिण युरोपमध्ये जी फेररचना होत आहे, त्यामुळे जागतिक अर्थकारणाला राजन यांच्यासारख्या शिस्तप्रिय कर्तबगार माणसाची गरज भासणार आहे. पण त्यांनी भारताला स्वत:च्या विचारांची प्रयोगशाळा मात्र बनवू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात रचनात्मक बदल घडवून आणीत असताना राजन यांची वृत्ती अधिक महत्त्वाची ठरणार आहे. नरेंद्र मोदी हे सबसिडीला लक्ष्य करीत असून अप्रत्यक्ष कररचनेत समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत त्यांना भांडवलाचा पुरवठा होत राहिला तर त्यांच्या बदलांपासून अपेक्षित लाभ होणार आहे. पायाभूत सोयीवर सध्या अधिक खर्च करण्यात येत आहे, जसे चीनने १९९० साली केले होते. एखाद्या चमत्काराने राजन हे जर चीनचे मध्यवर्ती बँकर झाले असते तर चीनचा सध्याचा विकास झालाच नसता! राजन यांच्या बुद्धिमत्तेविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. पण स्वत:च्या प्रवृतीत बदल न करणारा बँकर आपल्या देशाला परवडणार नाही. तसेच भांडवलाचा पुरवठा झाला नाही तर मोदींनाही आपल्या सुधारणा पुढे नेता येणार नाही.

Web Title: Raghuram Rajan, for a sharp vision, too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.