उन्हाळ्यात कामी येईल ना मेट्रो..!

By अतुल कुलकर्णी | Published: July 11, 2018 12:26 AM2018-07-11T00:26:50+5:302018-07-11T00:28:44+5:30

दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला.

political articles on Metro | उन्हाळ्यात कामी येईल ना मेट्रो..!

उन्हाळ्यात कामी येईल ना मेट्रो..!

Next

प्रिय देवेंद्रभाऊ,
दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला. शिवाय विधानसभेच्या अध्यक्षांना न विचारता विधानभवन कुणाच्या परवानगीनं जलयुक्त केलं असंही विचारलं. त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटलं. एवढं होऊन टोप्या उडवणारा मिश्किल स्वभाव तसूभरही कमी झालेला नाही हे पाहून जरा गंमतही वाटली...
टीका करायला काय जातंय. जे कामं करतात त्यांच्यावरच टीका होते असं त्यांचे जीवलग मित्र आर.आर. नेहमी सांगायचेच की... संत्रानगरी एक नंबरचे शहर होण्यासाठी आपण काय काय करतोय याची जाणीव त्यांना कशी होणार? आपल्या इथं एवढे विविध विभाग, एवढे अधिकारी, पण आपण याचं त्याला त्याचं याला कळू न देता सगळ्या विभागांना कामाला लावलंय. कोण, कुणासाठी, कुणाचं काम करतोय याचा थांगपत्ता अजून ठेकेदारांना लागलेला नाही तर यांना कुठून लागणार सांगा बरं...? त्यामुळे सगळ्या शहरात एकाचवेळी विकासाची दंगल सुरू झालीय. ही त्यांना पाहावत नाही. त्यांना वाटतं ही दंगल मुंबई विरुद्ध दिल्ली आहे. खरं खोटं आपलं आपल्याला माहिती. त्यांना काय करायचं यात पडून...?
आमच्या संत्रानगरीनं दोन्ही ठिकाणी तुल्यबळ नेते दिले आहेत. एवढे भारी की यांची माणसं त्यांना विचारत नाहीत आणि त्यांची यांना...त्यामुळे विकास कामं कशी सुसाट सुटलीत ते टीकाकारांना नाही कळायचं. आमच्याकडं त्यांच्यासारखा पुतण्या पण नाही, त्यामुळं आम्हाला कुणाला विचारत पण बसावं लागत नाही. आलं मनात की सुरू करतो कामं आपण.
आता आमच्याकडे काही नतद्रष्ट अधिकारी आहेत. ते उगाच काही रिपोर्ट देत राहतात. आता त्या अग्निशमन विभागाने आग विझवायचं काम सोडून आग लावण्याचं काम कशासाठी करावं बरं...? त्यांनी एक अहवाल दिला होता. काय तर म्हणे, आपल्या शहरात चालू असलेल्या कामांमध्ये कसलाही ताळमेळ नाही. कुणाचा कुणाला पायपोस नाही, त्यामुळे मोठा पाऊस आला तर आमच्या शहरातल्या किमान ७० वस्त्या पाण्याखाली जातील. असा अहवाल देतात का बरं...? बरं दिला तर दिला, आमच्या संत्रानगरीच्याच माणसांनी दिलाय ना. मग त्यांचा शब्द पण खरा नको का ठरवायला. उलट आम्ही त्यांचा शब्द ११० टक्के खरा ठरवला. ७० नाही तर थेट १०० वस्त्या पाण्याखाली जाऊ दिल्या या पावसात. पण त्यांना आपल्या चांगल्या कामाचं काही कौतुकच नाही. उगाच नावं ठेवत राहतात. जेव्हा का आमच्या शहरातून मेट्रो सुरू होईल ना साहेब, तेव्हा कळेल त्यांना काय मजा असते ती. आपल्याकडं उन्हाळा किती कडक राहतो, माहिती नाही त्यांना. अहो उन्हाळ्याच्या दिवसात आपले लोक सकाळी मेट्रोत बसतील. मस्त थंडगार एसीमध्ये, जाईना का कुठेही मग मेट्रो. उन्हापासून बचाव तर होईल ना भाऊऽऽ. आपल्याला फार दूरचा विचार करनं पडतं भाऊ. तुम्ही काही काळजी नका करू... चालू द्या जे चालूय ते.
 

Web Title: political articles on Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.