विषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 06:34 AM2018-08-22T06:34:45+5:302018-08-22T06:35:20+5:30

गाव दत्तक घेऊन ‘समाधानी गाव’ मोहीम घेतानाच विषमुक्त शेतीचा विचार खाकीधारी करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नाना कदम !

Poisonous Practitioner of Poisonous Farming | विषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता

विषमुक्त शेतीचा खाकीधारी प्रणेता

Next

हातात काठी घेऊन दटावणी करणारा तो खाकीधारी ! तुमच्या-आमच्या मनातील पोलिसांची प्रतिमा अशीच असते. गाव दत्तक घेऊन ‘समाधानी गाव’ मोहीम घेतानाच विषमुक्त शेतीचा विचार खाकीधारी करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नाना कदम !

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची यादी कधी कमी होत नाही. एखाद्या समस्येवर मार्ग निघाला असे वाटत असताना नवनवे प्रश्न जन्म घेतात. नेमक्या त्याच प्रश्नाला न्याय देणे ही खरी गरज असते. घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळणे ही जशी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली समस्या आहे. अशाच अनेक विषय आणि प्रश्नांच्या गर्तेत शेती क्षेत्र अडकलेले आहे. त्या समस्यांवर अत्याधुनिक तंत्रांचा अवलंब करण्याबरोबरच नव्या जमान्याची गरज बनलेल्या विषमुक्त शेतीसारख्या विचाराचा अंगीकार करणे गरजेचे आहे. नेमके तेच काम अनेक व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतल्याचा अनुभव आपल्याला येतो. पण पोलीस क्षेत्रात काम करणारा एखादा अधिकारीदेखील पेटून उठू शकतो, याचे उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक नाना तथा भुजंग दत्तात्रय कदम यांच्याकडे पाहिले जाते.
खरेतर, पोलीस हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यापुढे विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आणि खाक्या उभा राहतो. नाना कदम मात्र त्याला अपवाद ठरले. सोलापूर जिल्ह्यातील २०० गावांमध्ये पायपीट करून या माणसाने विषमुक्त शेती या विषयावर शेतकºयांचे प्रबोधन केले. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने २२ गावात काढण्यात आलेल्या प्रबोधन यात्रेचे त्यांनी नेतृत्व केले. गो-पालनावर आधारित शेतीचे महत्त्व समजावून सांगताना रासायनिक शेतीच्या माध्यमातून हानीकारक हरितवायूची निर्मिती होते. त्याचा एकूण वातावरणावर काय परिणाम होतो, याविषयीचे प्रबोधन ते करतात. अडवलेले पाणी आणि त्याच्या नियोजनावर माहिती देतात. देशी गार्इंच्या आधारावर शाश्वत पर्यावरणपूरक शेती कशा पद्धतीने होऊ शकते, हे सांगतात. गेल्या सहा वर्षांपासून चाललेल्या या चळवळीतून तब्बल एक हजार शेतकरी विषमुक्त शेतीकडे वळले आहेत.
थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सेंद्रीय शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर, कृषी-उद्योग क्षेत्रात क्रांती करणारे बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड आणि सोलापूरचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभू यांच्या मदतीने त्यांनी आपला विचार कृतिशील केला. त्याचाच परिणाम म्हणून पोलीस खात्यानेही ‘कम्युनिटी पोलिसिंग’ अंतर्गत कदम यांच्या कामाला साथ दिली. दरवर्षी येणारी आषाढी वारी वा जिल्ह्यातील कोणताही मोठा उत्सव असो कदम यांच्या प्रबोधन यात्रा वाहनाचा प्रवास तेथे सातत्याने राहिला. ‘निरामय आरोग्याची जादुई पेटी’ हे घोषवाक्य घेऊन विषमुक्त शेतमालाचा स्वत:चा मॉल उभारण्याचा निर्णय सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घेतला. कदम यांनी उभ्या केलेल्या चळवळीच्या माध्यमातून तो साकारही झाला. जादुई पेटीतून विषमुक्त शेतमाल घरपोच देण्याचा उपक्रमही नाना कदम यांनी राबविला. या उपक्रमाला समाधानी व स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव योजनेची मदत त्यांना झाली. पोलीस खाते, कृषी आणि ग्रामविकासासाठी गाव दत्तक घेते, ही घटनाच मुळात समाजाला वेगळा संदेश देणारी होती. खाकीधारी माणूस आणि पोलीस खाते यांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन नवी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून नाना कदम यांच्या कार्याकडे पाहिले जाते. त्या खात्यात राहून विषमुक्त शेतीचा संदेश देतानाच गाव समाधानी राखण्याचा मंत्र सर्वांपर्यंत पोहोचविताना १९८९ साली पोलीस दलात दाखल झालेले नाना कदम दिसतात.
- राजा माने

Web Title: Poisonous Practitioner of Poisonous Farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी