पटेल-पटोले : जुन्या संघर्षाची नवी नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:36 AM2018-06-06T02:36:01+5:302018-06-06T02:36:01+5:30

या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती.

 Patel-Patole: New Challenge of Old Conflict | पटेल-पटोले : जुन्या संघर्षाची नवी नांदी

पटेल-पटोले : जुन्या संघर्षाची नवी नांदी

Next

- गजानन जानभोर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाला चिंतेत आणि आत्मचिंतनात टाकणारा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरी ही निवडणूक सर्वस्वी नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेची होती. केवळ पंतप्रधानांनी आपले म्हणणे ऐकून न घेतल्याच्या रागात पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ही निवडणूक लोकांवर लादली. तटस्थपणे विचार केला तर आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी किती कामे केली, किती निधी आणला हा संशोधनाचा विषय आहे. प्रचंड ऊर्जा आणि उत्तम संघटनकौशल्य असलेला हा लोकनेता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने इतका ग्रासलेला आहे की स्वत:च्या अहमगंडालाच तो लोकल्याण मानू लागला आहे. पटोले आणि नारायण राणे सारखेच आहेत. ते कुठेच स्थिरावत नाहीत. आपल्या मनासारखे झाले नाही तर चवताळून उठतात आणि कुठला तरी आत्मघातकी निर्णय घेऊन आपल्यामागे कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही फरफटत नेतात.
प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोघांच्या परिश्रमामुळेच राकाँचे उमेदवार मधुकर कुकडे निवडून आले खरे. परंतु श्रेयाच्या लढाईत पटोलेच सध्या आघाडीवर आहेत. ‘हा विजय संपूर्ण आघाडीचाच’ अशी सावरासावर पटोलेंनी आता सुरू केली असली तरी पटेल-पटोले यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. पुढच्या काळात ते अधिक तीव्र होणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना पटोलेंना राहुल गांधींनी काही आश्वासने दिली आहेत, असे म्हणतात. पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर ती पूर्ण झाली नाहीत तर पटोले पुन्हा नवा घरठाव करतील. निवडणुकीतील विजय हा त्या नेत्याला अधिक आत्मविश्वास देणारा पण तेवढाच विनयशील बनविणारा असतो. पटोलेंच्या बाबतीत नेमके उलट घडत आहे. ते दिवसेंदिवस आक्रस्ताळे होत आहेत. पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या काळात त्यांनी फडणवीस-गडकरींवर केलेली वैयक्तिक टीका अत्यंत हीन दर्जाची होती. अशी घाणेरडी टीका करणाऱ्या नेत्याच्या भोवतालचे चाटूगार कार्यकर्ते जेव्हा टाळ््या वाजवून ‘खूप छान भाऊ’, असा लाळघोटेपणा करतात तेव्हा तो नेता अधिक चेकाळत जातो. पुढच्या काळात या लोकनेत्याचे असेच अध:पतन होणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून खूप काही बोध घेण्याची गरज आहे. ‘जातीच्या समीकरणात आम्ही कमी पडलो, मतविभाजन होऊ शकले नाही’ ही भाजप नेत्यांची सबब पराभूत मनाला तात्पुरती मलमपट्टी करणारी आहे. पण साक्षेपी विश्लेषण केले तर या दोन्ही जिल्ह्यातील भाजपची संघटनव्यवस्था कमालीची सडलेली असल्याचे लक्षात येईल. या पक्षाचे काही आमदार जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबडायचे, पुन्हा संधी मिळाली नाही तर? या हावरट वृत्तीने वागतात. एका आमदाराला तर लोकहितापेक्षा रेतीमाफियांचाच अधिक कळवळा आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकारिणी तातडीने बरखास्त करावी, एवढी दयनीय अवस्था भाजपची इथे आहे.
प्रफुल पटेल यांनी मधुकर कुकडे यांना उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले. परंतु, त्याच दगडाने पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीत आपला कपाळमोक्ष तर होणार नाही ना? याची काळजी प्रफुलभार्इंना घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक स्वत: प्रफुलभाई किंवा पत्नी वर्षाबेन लढणार आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. त्यावेळी कुकडेंचे पुनर्वसन कसे करणार? त्यांना डावलल्यामुळे जातीय अस्मिता टोकदार तर होणार नाही? त्या अस्मितांना नाना पटोले खतपाणी तर घालणार नाहीत? असे अनेक प्रश्न पटेलांसमोर उभे राहणार आहेत. कुणाला पटेल न पटेल! पण पुढच्या काळात नाना पटोले विरुद्ध प्रफुल पटेल असा जुनाच संघर्ष झाडीपट्टीत नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

Web Title:  Patel-Patole: New Challenge of Old Conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.