आपला देश बदलतोय, पण शैक्षणिक वास्तवाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:14 AM2018-01-22T00:14:45+5:302018-01-22T02:22:34+5:30

शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे. शिक्षण थांबले, त्याचे जगणे थांबले, असे थोरामोठ्यांकडून नेहमीच सांगितले जाते ते काही उगाच नाही. कुठल्याही देशाचा विकास आणि जडणघडणीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

 Our country is changing, but what about the educational reality? | आपला देश बदलतोय, पण शैक्षणिक वास्तवाचे काय?

आपला देश बदलतोय, पण शैक्षणिक वास्तवाचे काय?

googlenewsNext

शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे. शिक्षण थांबले, त्याचे जगणे थांबले, असे थोरामोठ्यांकडून नेहमीच सांगितले जाते ते काही उगाच नाही. कुठल्याही देशाचा विकास आणि जडणघडणीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जेवढे शिक्षित नागरिक तेवढा तो देश अधिक समृद्ध समजला जातो. आपल्या देशातही शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन वेळोवेळी शिक्षण पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आणि येत आहेत. पण असे असतानाही या देशातील एक मोठा वर्ग अजूनही शिक्षणापासून वंचित राहिला आहे आणि ज्याच्यापर्यंत शिक्षणाची ही गंगा पोहोचली आहे त्यापैकी अनेकांना घोकंपट्टीच्या पलीकडे शिक्षणाचे महत्त्व उमगू शकले नाही असेच म्हणावे लागेल. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘असर’ अहवालातून हे वास्तव उघडकीस आले आहे. शिक्षण हे व्यवहाराभिमुख असावे, त्याचा आयुष्याशी संबंध जोडता यावा हे उद्दिष्ट समोर ठेवून २००५ साली देशात ज्ञानरचनावादी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या गुणाधारित अथवा परीक्षाधारित शिक्षण पद्धतीत झालेला हा बदल सकारात्मक आणि खºया अर्थाने जगण्याचे धडे देणारा ठरेल असा आशावाद त्यामुळे व्यक्त केला जात होता. पण असरच्या या अहवालाने रचनावादी शिक्षण अजूनही मुलांपर्यंत आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे अधोरेखित झाले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भारतातील शिक्षणाची दारुण स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील म्हणजे आठवी ते बारावीपर्यंतच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरील मातृभाषेतील वाचन करता येत नाही. ४० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही. ५९ टक्के मुलांनी कधीही कॉम्प्युटर हाताळलेला नाही. ४० टक्के मुलांना घड्याळातील वेळ सांगता येत नाही तर ४५ टक्के विद्यार्थ्यांना ग्रॅम आणि किलोग्रॅम समजत नाही. हे वास्तव केवळ धक्कादायकच नाही तर शिक्षण क्षेत्रात आम्ही खूप मजल मारली असल्याचा दावा करणाºयांची पोलखोल करणारेही आहे. असरच्या या सर्वेक्षणात यंदा महाराष्टÑातील नगर आणि सातारा या जिल्ह्यांची निवड झाली होती. नगरच्या ४५ टक्के मुलांना आपल्या राज्याची राजधानी कुठली हे सांगता आले नाही. तर साताºयातील ४५ टक्के मुलांना भारताच्या नकाशातील महाराष्टÑ ओळखता आला नाही. यासाठी केवळ विद्यार्थ्यांना दोष देता येणार नाही. त्याचे कारण असे की शाळांच्या भिंती रंगविणे, फळा फरशांवर चित्र रेखाटणे म्हणजे रचनावादी शिक्षण असा समज आम्ही करून घेतलाय. एवढे केले की रचनावादी शाळा तयार. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाचेही तेच. शहरातील उच्चभ्रू शाळांमधील विद्यार्थी संशोधनात्मक पद्धतीने विषय आत्मसात करतात. पण ग्रामीण भागाचे काय? तिथे तर थोडे लिहिता-वाचता आले, लहानसहान गणितं सोडविली की विद्यार्थी प्रगत समजला जातो. असरच्या अहवालाची कारणमीमांसा करताना शहरी आणि ग्रामीण भागातील या वाढत्या दरीचाही विचार होणे गरजेचे आहे. देशात आणि महाराष्टÑातही शिक्षण क्षेत्रात जी प्रगती झालेली आम्ही बघतोय ती केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित राहिली. ग्रामीण भारत यापासून अजूनही कोसो दूर आहे. शाळेत जाणारे चार अक्षरे तरी शिकतात पण ज्या लाखो मुलांनी शाळेचे पाऊलही कधी चढले नाही त्यांचे काय? शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या या देशाची ही शोकांतिकाच म्हणायची.
- सविता देव हरकरे

Web Title:  Our country is changing, but what about the educational reality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.