चीन काश्मीरच्या खोऱ्यात नको तसा हस्तक्षेप करीत आहे, असा आरोप करतानाच काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्याच आरोपाखाली पाकिस्तानलाही गुन्हेगार ठरविणारे वक्तव्य दिले आहे. हे दोन्ही आरोप मुखोद््गत व्हावे एवढे आता जनतेला ठाऊक झाले आहेत. अशी वक्तव्ये देण्यातून मेहबुबा किंवा त्यांचे सरकार जनतेला आपल्या दुबळेपणाखेरीज दुसरे काही सांगत नाही. चीन हा पाकिस्तानचा मित्र देश आहे आणि त्याने भारताच्या अनेक प्रदेशांवर आपला अधिकार सांगितला आहे. शिवाय भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेली मॅकमहोन ही सीमारेषा आपल्याला मान्य नसल्याचे त्याने अनेकवार सांगितले आहे. त्याच प्रश्नावर १९६२ मध्ये त्याने भारताशी युद्धही केले आहे. शिवाय आजही तो प्रश्न जिवंत आहे असे चीनचे म्हणणे आहे. काश्मीर हा एकट्या मेहबुबाबार्इंच्या चिंतेचा विषय नाही. त्याची चिंता त्यांच्या वडिलांनी केली. त्याआधी नॅशनल कॉन्फरन्स हा काश्मिरातला दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी पक्षही वर्षानुवर्षे ती चिंता करीत आला. केंद्राने ती काळजी १९४७ पासून वाहिली आहे आणि आजही तिचे ओझे केंद्रावर कायम आहे. काश्मीर हा सरकारएवढाच जनतेच्याही काळजीचा विषय आहे. मेहबुबा मुफ्ती यांचा आताचा आरोप त्याचमुळे एका वारंवार सांगितल्या गेलेल्या वास्तवाच्या पुनरावृत्तीखेरीज दुसरे काही नाही. अशा पुनरावृत्तीची सरकारवर किंवा सरकारच्या नेत्यांवर जेव्हा येते तेव्हा ती त्यांची असहाय्यता आणि निष्क्रियता सांगत असते. मेहबुबा मुफ्तींचे सरकार भाजपच्या मदतीने श्रीनगरमध्ये सत्तारूढ झाले तेव्हापासून त्याने आपल्या नावावर म्हणावा तसा एकही पराक्रम नोंदविला नाही. त्याची दखल त्या राज्यातील जनताही फारशी घेत नाही. पाकिस्तानने ती घ्यावी अशी अपेक्षा नाही आणि चीनला मेहबुबा मुफ्ती या नावाच्या कुणी नेत्या आहेत हे कदाचित ठाऊकही नसणार. अशावेळी ही माणसे अशी वक्तव्ये देऊन आपले अस्तित्व सांगत असतात की आपल्यासकट केंद्राचे या प्रश्नाबाबतचे निष्क्रियपण सांगत असतात, असाच प्रश्न कोणालाही पडावा. पाकिस्तानचे घुसखोर प्रत्येकच दिवशी काश्मीरच्या सीमेवर आक्रमण करतात आणि सीमेनजीकच्या गावातली माणसे मारतात. या माणसांच्या मृत्यूच्या बातम्याही आता बातम्या वाटू नयेत अशा रोजच्या व नेहमीच्या झाल्या आहेत. भारताने एकदा सर्जिकल स्ट्राईक नावाचा पराक्रम केला. त्या एका पराक्रमाच्या कथा गेले काही महिने हा देश ऐकत आहे. मोदीही ती कथा सांगतात, शाह हेही ती सांगतात आणि बाकीच्या मंत्र्यांजवळ काश्मीरबाबत त्या एका गोष्टीशिवाय सांगण्यासारखे काही नाही. मेहबुबा मुफ्ती आणि केंद्र सरकार या दोहोंचेही यासंदर्भातील हतबलपण हे की त्यांना काश्मिरातील जनतेशी वा तेथील संघटनांशी वाटाघाटी करणे वा बोलणी करणे शक्य होत नाही. त्यांना ज्यांचा विश्वास वाटावा अशी माणसे त्या राज्यात नाहीत आणि आपल्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा असा प्रयत्नही या दोन सरकारांनी आजवर केला नाही. प्रयत्न झाला तो दुरावा वाढविणाराच झाला. भारतातील सारे अल्पसंख्य व त्यातही मुसलमान समाजाचे लोक देशाच्या दृष्टीने अविश्वसनीय आणि संशयास्पद आहेत अशी भाषा केंद्रातला सत्तारूढ पक्ष आणि त्याचा परिवार सातत्याने बोलत राहिला. हे बोलणे नुसते भाषणबाजीपुरते राहिले असते तरी ते एकवार समजण्याजोगे होते. आता या बोलण्याला कृतीची जोड मिळाली आहे. मुसलमान समाजातील किती तरुणांना त्यांनी गाईचे मांस बाळगल्याचा आरोप लावून सत्तारूढ पक्षातील टोळीबाजांनी आजवर मारहाण केली आणि त्यातल्या किती जणांची हत्या केली, याची आकडेवारीच आता एकदा जाहीर झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला देशद्रोही म्हणू, संशयास्पद ठरवू, खऱ्याखोट्या वहिमावरून तुमच्यावर दावे लावून तुम्हाला तुरुंगात डांबू , हे भारतातल्या भाजपच्या लोकांनी देशातल्या मुसलमानांना आणि अल्पसंख्यकांना एकीकडे ऐकवायचे आणि दुसरीकडे काश्मिरातील मुसलमानांनी आणि त्यांच्या तरुण पोरांनी भारताशी एकनिष्ठ राहावे अशी अपेक्षा करायची, यातला विनोदी व दूषित विसंवाद मेहबुबा मुफ्तींच्या लक्षात सहजच येत असावा. त्यांचे सरकार भाजपच्या मदतीने त्या राज्यात सत्तेवर असल्याने त्यांना याविषयी उघडपणे बोलण्याचे बळ एकवटता येत नसावे. अन्य पक्षांची मदत घेता येत नाही आणि ज्यांची मदत घेतली आहे ते आपली, आपल्या समाजाची आणि आपल्या राज्यातील जनतेची सातत्याने मानखंडना करीत आहेत, हे पाहावे लागावे याएवढे या मेहबुबाबार्इंचे दु:ख दुसरे नाही. एखाद्याला सत्तेच्या पदावर बसवून सतत अपमानित करीत राहणे हा प्रकार राजकीय छळाच्या संदर्भात नवा आणि जीवघेणा म्हणावा असा आहे. आजची गरज काश्मीरच्या जनतेशी प्रत्यक्ष व विश्वासाची बोलणी करणे ही आहे. त्याचवेळी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांचे आपल्याशी असलेले वैर लक्षात घेणे ही देखील आजची गरज आहे. आपली गरज व कोंडी हीच आपल्या शत्रूंसाठी संधी ठरते. पाकिस्तान आणि चीन हे दोन देश या संधीचा फायदा घेणार आणि तो घेताना मेहबुबाबार्इंचे अनाथपणही ते उघडे करणार. हा सारा प्रकार दिल्लीत बसून शांतपणे पाहणारे व पाहून न पाहिल्यासारखे करणारे हेच अशावेळी आपल्या कौतुकाचे विषय व्हावे.