विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

By रवी टाले | Published: March 9, 2019 04:05 PM2019-03-09T16:05:51+5:302019-03-09T16:06:32+5:30

विरोधक जागा वाटपावरून ताठर भूमिका घेत आहेत आणि भाजपा नेतृत्व लवचीक धोरण स्वीकारून, प्रसंगी पडते घेऊन, एकामागोमाग एका राज्यात जागावाटपास अंतिम स्वरूप देत सुटले आहे.

Opposition stiffness and BJP's elasticity! | विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

googlenewsNext


लोकसभा निवडणूक आता अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोग कधीही निवडणुकीची अधिसूचना जारी करू शकतो. त्यामुळे देशातील तमाम राजकीय पक्ष आपापली राजकीय समीकरणे मांडण्यात मश्गूल झाले आहेत; कारण निवडणूक म्हटली, की इतर सर्व बाबी गौण ठरतात अन् मतांची आकडेमोडच सर्वात महत्त्वाची ठरते! विरोधकांची मते एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे शक्य असल्याची आकडेमोड करूनच तर महागठबंधन या नावाने विरोधकांची मोट बांधण्याचे सूतोवाच झाले होते. त्यावर आता काही महिन्यांचा कालावधी उलटला आहे; मात्र लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असतानाही महागठबंधन काही प्रत्यक्षात आलेले दिसत नाही.
भाजपाने मात्र प्रादेशिक पातळीवर युती करीत, जागावाटपालाही अंतिम स्वरूप देण्याचा धडाका लावला आहे. शिवसेना, अकाली दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, अपना दल हे मित्र पक्ष अगदी अलीकडच्या काळापर्यंत भाजपावर प्रचंड नाराज होते. त्यांच्यासोबतची भाजपाची युती तुटते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती; मात्र भाजपा नेतृत्वाने लवचीकता दाखवत, प्रसंगी पडती बाजू घेत, मित्र पक्षांना बरोबर चुचकारले आणि विविध राज्यांमध्ये स्थिती मजबूत केली. भाजपासोबत केंद्र व राज्य सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेनेने सातत्याने भाजपाला विरोधकांपेक्षाही जास्त छळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, सातत्याने स्वबळावर लढण्याचे नारे दिले; मात्र तरीदेखील नमते घेत, शिवसेनेला आपल्या बाजूला राखण्यात भाजपाने यश मिळविले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि अपना दल या प्रादेशिक पक्षांचीही समजूत काढण्यात भाजपाला यश आल्याचे वृत्त आहे. तिकडे पंजाबमध्ये अकाली दलासोबत आणि तामिळनाडूत अण्णाद्रमुकसोबतच्या जागावाटपासही भाजपाने अंतिम स्वरूप दिले आहे.
भाजपाने झपाट्याने मित्र पक्षांसोबतच्या जागावाटपास अंतिम स्वरूप दिले असताना, विरोधक मात्र महागठबंधन साकारण्याच्या मुद्यावर अद्यापही चाचपडतच असल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसला सोबत घेण्यास तयार दिसत नाही आणि त्या पक्षाने डाव्या पक्षांशी युती करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डावे एकत्र आले तरी तिरंगी लढत होणे अवश्यंभावी दिसते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला खड्यासारखे बाजूला करून जागावाटपही उरकून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसला युतीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या झिरपत आहेत; मात्र काही दिवसांपूर्वी मायावतींनी काँग्रेससंदर्भात वापरलेली कडवट भाषा विचारात घेता, त्या काँग्रेससोबत जुळवून घेण्याच्या विचारात असतील असे वाटत नाही. आम आदमी पक्षासोबत जुळवून घेण्याची काँग्रेस नेतृत्वाची अजिबात मानसिकता दिसत नसल्याने, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशप्रमाणेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही तिरंगी लढत होणे आता अपरिहार्य दिसत आहे.
बिहारमध्ये काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने जागावाटप उरकले खरे; मात्र जादा जागांची मागणी पूर्ण न झाल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस-राजद युतीच्या वळचणीला आलेल्या उपेंद्र कुशवाह आणि जितनराम मांझी यांना हव्या असलेल्या जागांचे घोंगडे अद्यापही भिजतच पडले आहे. त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास बिहारमध्येही मोजक्या जागांवर का होईना, तिरंगी लढती बघावयास मिळू शकतात. तिकडे कर्नाटकात युती करून राज्य सरकार चालवित असलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलादरम्यानही जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. झारखंडमध्येही तशीच परिस्थिती आहे. नाही म्हणायला महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये जागावाटप उरकण्यात काँग्रेसला यश आले आहे; मात्र महाराष्ट्रात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतच्या जागावाटपाचे घोंगडे भिजतच पडलेले आहे. आंबेडकर आणि शेट्टींना हव्या तेवढ्या जागा देण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची नकारघंटा कायम राहिल्यास, बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मोजक्या जागांवर तिरंगी लढती होण्याची शक्यता फेटाळता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या डोक्यात यश गेल्याने ते मग्रूर झाल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच झाली; मात्र प्रत्यक्षात विरोधक जागा वाटपावरून ताठर भूमिका घेत आहेत आणि भाजपा नेतृत्व लवचीक धोरण स्वीकारून, प्रसंगी पडते घेऊन, एकामागोमाग एका राज्यात जागावाटपास अंतिम स्वरूप देत सुटले आहे. परिणामी बहुतांश जागांवर थेट लढती घडवून आणण्याचे विरोधकांचे स्वप्न धूसर होत चालले आहे. भाजपाला धोबीपछाड देण्याच्या मनसुब्यांना विरोधकांनी आपल्या ताठरपणामुळे अशा प्रकारे स्वत:च नख लावले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागायचे ते लागतील; पण ते विरोधकांच्या बाजूने लागण्याच्या शक्यतेला विरोधकांनी स्वत:च अपशकून केला आहे, हे मात्र खरे!


- रवी टाले                                                                                                    

 ravi.tale@lokmat.com
 

Web Title: Opposition stiffness and BJP's elasticity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.