स्वयंसुधारणेला संधी !

By किरण अग्रवाल | Published: August 15, 2018 03:23 PM2018-08-15T15:23:11+5:302018-08-15T15:23:41+5:30

परदु:ख जाणून घेतल्याखेरीज स्वत:च्या चिंता वा विवंचनेची तीव्रता कमी होत नाही.

Opportunity for self-concept! | स्वयंसुधारणेला संधी !

स्वयंसुधारणेला संधी !

Next

परदु:ख जाणून घेतल्याखेरीज स्वत:च्या चिंता वा विवंचनेची तीव्रता कमी होत नाही. गुरु, गुरुजी, बुवा-बाबाच काय; मोटिव्हेशनल स्पीकर, म्हणजे प्रेरक वक्ते म्हणून हितोपदेश करणारेही तेच सूत्र मांडत असतात, जे महात्मा गांधीजींच्या ‘पिड परायी जाने रेऽ’शी नाते सांगत असते. मर्यादांची वेस ओलांडून पुढे पाऊल टाकल्याशिवाय व संकुचिततेतून बाहेर पडून स्वत:ला मोठ्या प्रवाहात समाहित करून घेतल्याखेरीज त्याची अनुभूती येत नसते. यशाची पायरी गाठण्यासाठी तुलनेच्या झोपाळ्यावर झुलणे त्यासाठीच गरजेचे असते. कोणत्याही स्पर्धा अगर सर्वेक्षणात सहभागी होऊन आपण नेमके कुठे आहोत, हे जाणून घेण्याचे प्रयत्नही याच अनुभूतीच्या कक्षेत मोडणारे असतात, म्हणूनच जगण्यासाठी सुगम ठरणारी शहरे निवडण्याकरिता देशभरात केले गेलेले सर्वेक्षण व त्यातील निष्कर्षांकडे याच भूमिकेतून बघता यावे.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने यंदा प्रथमच देशातील ‘इझ आॅफ लिव्हिंग’ म्हणजेच जगण्यासाठी सुखावह अथवा सुगम अशा १११ शहरांचा सर्व्हे करून गुणानुक्रमानुसार त्याची यादी घोषित केली आहे. यात राज्यातील आठ शहरांचा समावेश असून, त्यातील निम्मी म्हणजे चार शहरे तर ‘टॉप-१०’ मध्ये आली आहेत. राज्यातील या आठ किंवा देशातील १११ शहरांखेरीज अन्य शहरे राहण्या किंवा जगण्यासाठी सुखावह नाहीत, असाही याचा अर्थ लावता येईल व कुठे व कुणास आले अच्छे दिन असा सवालही उपस्थित करता येईल; परंतु याकडे तसे न पाहता अन्य शहरांमधील जीवनमान कसे व कोणत्या आधारावर उंचावता येईल, या दृष्टिकोनातून पाहता यावे. कारण, त्या त्या शहरातील प्रशासन, सामाजिक संस्था व त्याद्वारे केले जाणारे काम, आर्थिक स्थिती आणि पायाभूत सुविधा अशा निकषांअंतर्गत तब्बल ७८ मुद्द्यांवर हे सर्वेक्षण केले गेले व प्रत्येक शहरातील सुमारे ६० हजारांवर नागरिकांची मते जाणून घेऊन त्याआधारे निष्कर्ष काढले गेले आहेत. त्यामुळे तुलनात्मकतेतून सिद्ध व सादर केली गेलेली सुगमता आत्मपरीक्षणाला तसेच स्वयंसुधारणेला संधी देणारीच म्हटली पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे, पुणे आता ‘आक्टोपस’ प्रमाणे वाढलेय, तेथील ट्रॅफिक डोकेदुखीची ठरते, असे कितीही म्हटले जात असले तरी जगण्यासाठीच्या सुखावहतेत पुणे देशात अव्वल, सर्वोत्तम ठरले आहे, हा केवळ पुण्याचाच नव्हे; राज्याच्याही अभिमानाचा विषय ठरावा. नवी मुंबई व बृहन्मुंबई ही शहरेही अनुक्रमे द्वितीय व तृतीयस्थानी असल्याने ‘टॉप-३’चा मान महाराष्ट्राला लाभला आहे. या यादीत ठाणे सहाव्या क्रमांकावर असून, वसई-विरार विसाव्या तर नाशिक एकविसाव्या स्थानी आहे. नाशिक पाठोपाठ सोलापूर २२ व्या क्रमांकावर आहे. सदरचे सर्वेक्षण जगण्यासंबंधीचे असले तरी, तुलनेतील सुखावहता अशी की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेले बनारस ३३ व्या, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाउन’ नागपूर हे ३१ व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे देशाचे व राज्याचे नेतृत्व करणारे आपल्या शहरांना तितके राहण्यायोग्य करू शकले नाहीत जितके त्यापुढील शहरांनी सिद्ध केले.

तुलनात्मकदृष्ट्या विचार करता ही बाबदेखील लक्षात घेता येणारी आहे की, अहमदाबाद (२३), हैदराबाद (२७), बंगळुरू (५८) व दिल्ली (६५) पेक्षाही महाराष्ट्रातील ठाणे, वसई-विरार, नाशिक व सोलापूर पुढे आहेत. यात पुन्हा अहमदाबाद म्हणजे पंतप्रधानांचा गढ. पण, टॉप-१० मध्ये गुजरातेततील एकही शहर येऊ शकले नाही. मोदींच्याच राज्यात विकास पराभूत झाल्याच्या आरोपाला पुन्हा संधी देणारीच ही बाब ठरावी. अर्थात, देशातील ‘स्मार्ट सिटी’च्या स्पर्धेत असलेल्या शंभर शहरांचा यात प्रामुख्याने समावेश केला गेल्याने इतर शहरांना आपली सुखावहता सिद्ध करायला फारशी संधी मिळाली नाही, पण यातील निकष लक्षात घेता आगामी काळात सर्वेक्षणाबाहेरील शहरांनाही तयारीला लागता येईल. विशेषत: मुंबई-पुण्यासोबतच्या सुवर्ण त्रिकोणात गणले जाणारे नाशिक २१ व्या क्रमांकावर राहिले, अशा शहरांनाही पायाभूत सुविधा व प्रशासनिक सुधारणेला यानिमित्ताने दिशा मिळावी. त्यादृष्टीने या सर्वेक्षणाकडे पाहिले गेले, तरच त्यामागील उद्देशपूर्ती घडून येऊ शकेल.

Web Title: Opportunity for self-concept!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.