शंभर खड्ड्यांची ओरड करायची की स्वत:च एक बुजवायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:14 AM2018-02-13T04:14:22+5:302018-02-13T04:18:32+5:30

आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते.

One hundred pits of cry or do you want to sit down? | शंभर खड्ड्यांची ओरड करायची की स्वत:च एक बुजवायचा?

शंभर खड्ड्यांची ओरड करायची की स्वत:च एक बुजवायचा?

Next

- गजानन दिवाण

आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या ! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते.

इतरांना नाव ठेवणे तसे फार सोपे असते. घरातली छोटी अडचण सोडवू न शकणारा घरकर्ता सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंतच्या चुकांवर भाष्य करीत असतो. आता तर फेसबुकपासून व्हॉटस्अ‍ॅपपर्यंत अशी अनेक साधने अगदी सहज उपलब्ध असल्याने प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊन बसला आहे. अचडणी, समस्या, चुका हे सांगणाºयांची मोठी फौजच निर्माण झाली आहे. पण, त्या सोडविणार कोण? प्रत्येकवेळी प्रशासन आणि राजकारण्यांकडे बोट दाखवून आपण मोकळे कसे होऊ शकतो? शिक्षणाचेच पाहा. अक्षरश: बाजार झाला आहे या क्षेत्राचा. गरीब घरातला मुलगा सीए, डॉक्टर होण्याचे स्वप्न बघूच शकत नाही. जिथे पोट भरण्याची भ्रांत तिथे लाखोचे शुल्क कसे परवडणार, ही गरिबांपासून मध्यमवर्र्गींयापर्यंतची सारखीच ओरड. तुम्ही म्हणाल, परिस्थितीच तशी आहे, मी एकटा काय करू शकतो? जालन्यातील मैत्र मांदियाळी ग्रुपने केलेल्या कामाचे उदाहरण यावरील उत्तर आहे. तुमच्याआमच्यासारखा नोकरी-व्यवसाय करून आपला संसार सांभाळणाºयांचा हा ग्रुप. केवळ ३० जणांनी २०१४ साली सुरू केलेला हा ग्रुप आज राज्यभर पसरला आहे. इतरांना नाव ठेवण्यापेक्षा गरजवंतांना शक्य होईल तितकी मदत करणे हेच या ग्रुपचे काम. शिक्षणासाठी पैशांची गरज असलेल्या ४८ जणांना गेल्यावर्षी त्यांनी मदतीचा हात दिला. अशाच कामासाठी हा ग्रुप महिन्याला प्रत्येकी २०० रुपये जमा करतो. ते अपुरे पडत होते म्हणून फेसबुकवरून आवाहन केले. तब्बल २६ जणांचा शैक्षणिक खर्च उचलणारे दानशूर समोर आले. या मदतीतूनच गेल्यावर्षी एक मुलगा पीएसआयची पूर्व परीक्षा पास झाला. एकजण पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला. मी एकटा काय करू शकतो, त्याचे हे उत्तर. यावर्षी उर्वरित २२ जणांचा प्रश्न त्यांना मार्गी लावायचा आहे. औरंगाबादेतील एका मुलीला दहावीला ९४.६० टक्के गुण मिळाले आहेत. भावाला दहावीत ८९ तर बारावीला ८७ टक्के गुण मिळाले. त्याला सीएच्या पात्रता परीक्षेत २०० पैकी १४७ गुण मिळाले. तीही सीएची तयारी करीत आहे. वडील सेक्युरिटी गार्ड असून त्यांचा दरमहा दहा हजार पगार आहे. मुलाच्या क्लासची दहा हजार आणि मुलीची सहा हजार फी ते कोठून भरणार? ‘मैत्र मांदियाळी’च्या आवाहनानंतर जालन्यातील दोघे दानशूर समोर आले. यावर्षी या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च मार्गी लागेल, असे या ग्रुपला वाटते. पुढे काय, तर इतर काही प्रश्न आणि त्याची अशीच उत्तरे. जग खूप मोठे आहे कबूल. पण, म्हणून मी काहीच करायचे नाही काय? हे ४८ विद्यार्थी म्हणजे सारे जग नाही. पण शिक्षणाच्या बाजारीकरणावर ओरड करीत बसण्यापेक्षा त्याचा फटका बसणाºया काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आपणच आपल्या माध्यमातून कसे सोडवू शकतो, हे ‘मैत्र मांदियाळी’ने दाखवून दिले आहे. अलीकडेच नाना पाटेकरने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. तो म्हणाला, ‘आपण काय करू शकतो? शंभर खड्डे पडलेत ना, यातला एक खड्डा आपण बुजवू या! कारण त्यावेळी त्या खड्ड्यातून जो कुणी जाणार होता तो एकतरी वाचेल. आपण तेवढेच करू शकतो. तू किती शहाणा, तू किती चुकलास असे सल्ले देत राहण्यापेक्षा मला हे जास्त संयुक्तिक वाटते...’ नाना म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्येकाने स्वत:च ठरवून घ्यायला हवे. शंभर खड्ड्यांच्या नावे ओरड करीत बसायचे की स्वत:च यातला किमान एक खड्डा बुजवायचा. शेवटी माझ्या हातात काय, हेच अधिक महत्त्वाचे नाही काय?

Web Title: One hundred pits of cry or do you want to sit down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.