इतिहासाची पाने...स्थैर्य अन् एकात्मतेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:55 AM2019-03-25T02:55:49+5:302019-03-25T02:56:25+5:30

जनता पक्षाचा प्रयोग फसला. त्याचे तीन प्रमुख पक्षांत विभाजन झाले. समाजवाद्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाची स्थापना केली. जनसंघवाल्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, तर चौधरी चरणसिंग यांनी पुन्हा लोकदलाची स्थापना केली होती.

... Once again for the inertia and integrity of the Congress | इतिहासाची पाने...स्थैर्य अन् एकात्मतेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच

इतिहासाची पाने...स्थैर्य अन् एकात्मतेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसच

googlenewsNext

- वसंत भोसले

जनता पक्षाचा प्रयोग फसला. त्याचे तीन प्रमुख पक्षांत विभाजन झाले. समाजवाद्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाची स्थापना केली. जनसंघवाल्यांनी जनता पक्षाची स्थापना केली, तर चौधरी चरणसिंग यांनी पुन्हा लोकदलाची स्थापना केली होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घरवापसी केली आणि इंदिरा गांधी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. १९५२ पासून दर पाच वर्षांनी पाच निवडणुका पार पडल्या होत्या. आणीबाणीच्या कालखंडाने पाचव्या लोकसभेची मुदत एक वर्षाने वाढविण्यात आली होती. मार्च १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली आणि सत्तांतर झाले, ते टिकले नाही. देश पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहू लागला. १९८० मध्ये निवडणुका लागल्या.
आता भारताची स्वातंत्र्यानंतरची मतदारांची संख्या दुप्पट झाली होती. पहिल्या निवडणुकीत १७ कोटी मतदार होते. ती संख्या आता ३५ कोटी ६२ लाख ५ हजार ३२९ वर पोहोचली होती. ५४२ मतदारसंघ झाले होते. काँग्रेसने सर्वाधिक ४९२ जागा लढविल्या. एकूण ५६.९२ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी चारने घसरली होती. झालेल्या मतदानांपैकी काँग्रेसने ४२.६९ टक्के मते घेत ३५३ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळविले. विरोधी एकाही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नाहीत. जनता पक्षाला केवळ ३१, धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला ४१, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३३, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दहाच जागा जिंकता आल्या. मावळते पंतप्रधान चौधरी
चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकदलास केवळ तीनच जागा जिंकता आल्या.
काँग्रेसला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (८५ पैकी ५१), महाराष्ट्र (४८ पैकी ३९), मध्य प्रदेश (४० पैकी ३५), बिहार (५४ पैकी ३०), ओडिसा (२१ पैकी २०), कर्नाटक (२८ पैकी २७), आंध्र प्रदेश (४२ पैकी ४१), राजस्थान (२५ पैकी १८), पंजाब (१३ पैकी १२), तामिळनाडू (३९ पैकी २०), नवी दिल्ली (७ पैकी ६) या राज्यांनी भरभरून साथ दिली. धर्मनिरपेक्ष-जनता पक्षाला उत्तर प्रदेशातून २९ जागा मिळाल्या. इंदिरा गांधी आणि संजय गांधी पुन्हा एकदा अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीतून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांची नवी दिल्लीतून निवड झाली. इंदिरा गांधी यांनी जास्तीत जास्त सभांना हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडकमधूनही निवडणूक जिंकली. १४ जानेवारी १९८० रोजी त्यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
महाराष्ट्रात ४८ पैकी ३९ जागा जिंकत काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्याकाळी महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘पुलोद’चे सरकार होते. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटना काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी यांनी अनेक बड्या नेत्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविले होते. यात वसंतदादा पाटील (सांगली), शंकरराव चव्हाण (नांदेड), यशवंतराव मोहिते (कºहाड), विठ्ठलराव गाडगीळ (पुणे), शंकरराव पाटील (बारामती), गुलाब नबी आझाद (वाशिम), पी. व्ही. नरसिंहराव (रामटेक), वसंतराव सावे (वर्धा), आदींचा समावेश होता. काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या तरी मुंबई आणि कोकण पट्ट्यात मात्र जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली. मुंबईतील सहापैकी पाच जागा जनता पक्षाने जिंकल्या. राम जेठमलानी, सुब्रह्मण्यम स्वामी, प्रमिला दंडवते, रामभाऊ म्हाळगी, प्रा. मधू दंडवते, बापूसाहेब परुळेकर आदी निवडून आले. केवळ दक्षिण मुंबईतून मुरली देवरा विजयी झाले. सर्वांत गाजलेली निवडणूक त्यांची ठरली. संघटना काँग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण विरुद्ध इंदिरा काँग्रेसतर्फे शालिनीताई पाटील यांच्यात लढत झाली. पुलोद सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने राजकारण केले, असा आक्षेप वसंतदादा पाटील यांचा होता. त्यामुळे या दोघांत तीव्र मतभेद निर्माण झाले होते. वसंतदादा पाटील यांनी शालिनीताई पाटील यांना साताऱ्यातून उभे केले. चव्हाण यांना अत्यंत कठीण गेलेली ही निवडणूक होती. त्यात त्यांचा केवळ ३५ हजार मतांनी विजय झाला. संघटना काँग्रेसलाही एकमेव जागा महाराष्ट्रात मिळाली. पुढील निवडणूक होईपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही निवडणूक त्यांची अखेरची ठरली.

 

Web Title: ... Once again for the inertia and integrity of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.