Om ... Peace EVM Peace | ओम...शांती ईव्हीएम शांती
ओम...शांती ईव्हीएम शांती

या ‘ओखी’ चेही काही कळत नाही. ना काळाचे भान, ना वेळेचे. बरं महाराष्टÑात आले ते ठीक पण या राज्यातून नंतर शिरायचे कुठे तर... थेट गुजरातेतच...! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात ! अरे बाबा.... तेथे निवडणुका आहेत. मोदीसाहेब सभांवर सभा घेत आहेत. मुख्यमंत्री असताना १४ वर्षांच्या काळात घेतल्या नसतील तेवढ्या सभा यावेळी ते घेताना दिसत आहेत. इलेक्शन नसते तर एवढ्या वेळेत त्यांचे १० विदेश दौरे नक्कीच झाले असते.
असो...! मोदीसाहेब यावेळी संत्रस्त आहेत एवढे मात्र खरं... त्यामागे कारणेही अनेक आहेत. टिष्ट्वटरवर विराटने मोदींना क्लीन बोल्ड केले. मोदींच्या तुलनेत विराट कोहलीच्या फालोअर्सची संख्या वाढली आहे. तिकडे ओपिनियन पोलवाले बीजेपीचा ग्राफ दिवसागणिक खाली आणत आहेत. राहुल, हार्दिक, जिग्नेश या त्रिकुटाचा वादळी धुमाकूळ चालूच आहे. त्यात या ‘ओखी’ची भर. आणि हिंमतही बघा... चक्क त्यांची सुरतचीच सभा रद्द करून टाकली.
बरं हे ‘ओखी’ पॉलिटिकल असते तर त्याचा बंदोबस्तही करता आला असता. चार-सहा सीडी व्हायरल करून टाकल्या असत्या. इडी, आयटी, सीबीआयच्या रेड टाकून ईडा-पिडा टाळली असती. महाराष्टÑातून गुजरातेत आले म्हणून सीजीएसटीचा बडगाही उगारला असता. आणि शेवटी काहीच नाही तर विरोधकांनीच हे वादळ गुजरातेत पाठविले म्हणून त्याचे भांडवलही करता आले असते. पण हे वादळ काही आपल्या पूर्वाश्रमीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी किंवा आपली ‘मन ही बात’ ऐकण्यासाठी आले नाही. नियतीच्या मनात यावेळी वेगळे काहीतरी आहे असे आता मोदींनाही वाटू लागले. गुजरातेत आता जादूगरांचे नव्हे तर ज्योतिषाचे काम आहे हेही त्यांंनी ताडले. लगेच ज्योतिषी बीजेपी मुख्यालयात हजर झाले. त्यांनीही बीजेपीची कुंडली तयार करून राहुल, हार्दिक, जिग्नेश अनुक्रमे राहू, केतू, शनीच्या स्थानी असून ओखीच्या प्रभावाने ‘बुरे दिन’ची संभावना वर्तविली.
बरं यावर काही उपाय? ग्रह शांती वगैर...
एका नेत्याने विचारले.
ज्योतिषी : आहे ना...! ‘ईव्हीएम शांती’... बस्स... त्यावर विश्वास ठेवा.
आणि मग सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला...!
- दिलीप तिखिले


Web Title: Om ... Peace EVM Peace
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.