पुराणातील उड्डाणे अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:13 AM2018-04-24T03:13:11+5:302018-04-24T03:13:11+5:30

‘डिजिटल इंडिया’ ही केवळ घोषणा नसून त्याची पाळंमुळं पुराणात इतकी खोलवर रुजलेली आहेत

Older Airlines | पुराणातील उड्डाणे अन्...

पुराणातील उड्डाणे अन्...

Next

नंदकिशोर पाटील|

फार फार वर्षांपूर्वी या भारतभूमीत दूरसंचाराचं आधुनिक माध्यम इंटरनेट अस्तित्वात होतं, हे भाजपाचे त्रिपुरामधील मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी सांगून टाकलं ते एका अर्थानं बरंच झालं! आजवर हे गुपित दडवून ठेवल्याने महाभारत, रामायण काळातील अनेक घटना-घडामोडींविषयी अकारण गैरसमज होता. आता पुराणातील सगळ्या कथा-गोष्टी कशा सोप्या आणि विश्वासार्ह झाल्या आहेत! जन्मजात शंकेखोर स्वभावामुळे आपण खरंच महाभारत घडलं असेल का? कौरव शंभरच होते की आणखी किती? हनुमंतांनी लंकेतील सीतेचा शोध कशावरून लावला? अशा नानाविध शंका उपस्थित करत असू. पण विप्लव कुमार देव, सत्यपाल सिंह, वासुदेव देवनानी या महानुभवांनी आपले हे अज्ञान एकदाचे दूर केले, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानायला हवेत. ‘डिजिटल इंडिया’ ही केवळ घोषणा नसून त्याची पाळंमुळं पुराणात इतकी खोलवर रुजलेली आहेत, हे या तिघांच्या नवसंशोधनामुळे जगाला आता कळले असेल. त्यामुळे या तिघांना नोबेल पारितोषिक मिळाले तर नवल वाटायला नको! संघशाखेतील या नवसंशोधकांचा ‘ग्लोबेल्स’ ते ‘नोबेल’ हा प्रवास थक्क करणारा आहे. कधीकाळी पोलीस दलात असताना गुन्हेगारांचा माग काढणारे सत्यपाल सिंह यांनी मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री होताच थेट डार्विन आणि न्यूटनलाच चॅलेंज दिले. माणसांची उत्पत्ती माकडांपासून झाली, हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आणि न्यूटनने लावलेला गतीच्या नियमांचा शोध त्यांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे तो पाठ्यपुस्तकातून तात्काळ काढून टाकला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्या कैक वर्षे आधी दुसऱ्या ब्रह्मगुप्ताने लावला होता, असा राजस्थानचे शिक्षणमंत्री असलेले वासुदेव देवनानी यांचा दावा आहे. शिक्षणमंत्र्यांचे हे अगाध ज्ञान पाहून शिक्षक आणि विद्यार्थीही चकित झाले म्हणतात! विप्लव कुमार देव म्हणतात तेही खरंच म्हणा. इंटरनेट असल्याखेरीस महाभारतातील संजयास कुरुक्षेत्रावरील युद्धाचा आँखो देखा हाल धृतराष्ट्राला ऐकवता नसता आला. कदाचित तेव्हा फेसबुक लाईव्हची देखील सोय असावी. पण आंधळ्या धृतराष्ट्राकडे बघून संजयाने तो मोह टाळला असेल. पांडव इनमिन पाच. पण शंभर कौरवांशी एकाचवेळी संवाद करणंं हे गांधारीसाठी केवढं दिव्य? पण व्हॉट्सअपमुळं ते शक्य झालं असावं! ‘कौरवाज्’ नावाचा ग्रुप त्यांनी व्हॉट्सअप वर बनवला होता, असा मेसेज फिरत आहे. महाभारत काळात टेस्टट्युब बेबीचंही तंत्रज्ञान अस्तित्वात असावं. कर्णाचा जन्म हा पुरावा आहे. प्लास्टिक सर्जरी ही तर त्याहून जुनी. मानवी धड आणि हत्तीचं शिर असलेलं गणेशाचं रूप हे याच तंत्रज्ञानातून तयार झालं आहे, असं स्वत: पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाभारत काळात घडलेल्या घटनांचे जुने संदर्भ त्या काळातील संगणक सर्व्हररून डाऊनलोड केले तर कदाचित महर्षी व्यासांनी लिहून ठेवलेल्या महाभारतापेक्षा वेगळंच महाभारत जगासमोर येईल. द्रौपदी वस्त्रहरण आणि कठुआ, उन्नावमध्ये घडलेल्या घटनांमध्येही एक साम्य आहे. त्यावेळी भीष्म, द्रोणाचार्य आणि आता पंतप्रधान मोदींचे मौन !!

Web Title: Older Airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.