समर्थन-विरोधाचे रण : रावणदहनाचे महाभारत !

By किरण अग्रवाल | Published: October 18, 2018 09:14 AM2018-10-18T09:14:57+5:302018-10-18T13:07:59+5:30

इतिहास असो की प्रथा-परंपरा, त्यांच्याकडे नव्या भूमिकेतून अगर विचारधारेतून पाहिले जाते किंवा नवीन संदर्भाने त्यांची पडताळणी केली जाते तेव्हा प्रचलित व्यवस्थांना धक्के बसून संघर्ष ओढवल्याखेरीज राहत नाही.

objects to burning Ravana’s effigy | समर्थन-विरोधाचे रण : रावणदहनाचे महाभारत !

समर्थन-विरोधाचे रण : रावणदहनाचे महाभारत !

Next

इतिहास असो की प्रथा-परंपरा, त्यांच्याकडे नव्या भूमिकेतून अगर विचारधारेतून पाहिले जाते किंवा नवीन संदर्भाने त्यांची पडताळणी केली जाते तेव्हा प्रचलित व्यवस्थांना धक्के बसून संघर्ष ओढवल्याखेरीज राहत नाही. विशेषत: अशा नव्या भूमिका जेव्हा व्यक्ती वा समूहांच्या अस्मितेशी निगडित असतात अथवा तशा त्या बनतात, तेव्हा त्या विचारांऐवजी अभिनिवेश अधिक डोकावतो. मूळ भूमिका बाजूला पडून समर्थन-विरोधाचे रण माजण्याचा धोका त्यातून उद्भवतोच, शिवाय अशा बाबी मग समाजस्वास्थ्य कलुषित होण्यासही कारणीभूत ठरू पाहतात. दुष्प्रवृत्तींवर विजयाचे प्रतीक म्हणून केल्या जाणाऱ्या रावण दहनाला होत असलेल्या विरोधाकडेही याचदृष्टीने बघता येणारे आहे.

विजयादशमी म्हणजे पराक्रमाचा, विजयाचा उत्सव; या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तसेच शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे अर्जुनाने बाहेर काढून कौरव सैन्यावर विजय मिळविला असे दाखले पुराणात आढळतात. म्हणूनच यादिवशी शस्त्रपूजन व रावणदहन केले जाते. लोकमान्यता लाभलेला इतिहास व परंपरा यामागे आहे. शस्त्रपूजन करताना सीमोल्लंघन करून शमीची, आपट्याची पाने लुटून आणण्याची प्रथाही पूर्वापार चालत आली आहे.; परंतु इतिहासाला वर्तमानाच्या धडका बसू लागल्या असून, आपट्याची पाने लुटण्याला गेल्या काही वर्षांत जसा पर्यावरणवादींचा विरोध होऊ लागला आहे त्याप्रमाणेच, रावण दहनाला आदिवासी समाज संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. रावणाच्या दुष्टतेची एकच बाजू परंपरेने समोर आणली जाते, पण राजा रावण हा महान दार्शनिक, विवेकवादी, बलशाली व उत्कृष्ट रचनाकार होता. इथल्या वर्णांध व्यवस्थेने त्याला बदनाम केले, असे म्हणतानाच रावणदहन हे एक सांस्कृतिक कपट कारस्थानच असल्याचा आरोपही संबंधितांनी केला आहे व यापुढे असे न करण्याचे सुचविले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह आदिवासी एकता परिषद, आदिवासी शक्ती सेना, एकलव्य युवा संघटना, तसेच विविध आदिवासी समाज संस्थांकडून त्याबाबतची निवेदने वरिष्ठाधिका-यांकडे दिली गेली असून, दुसरीकडे अशी मागणी करणा-यांवर कारवाई करण्याचे निवेदनदेखील वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे रावणदहनाचे महाभारत घडून येणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

मुळात रावणदहनात एक प्रतीकात्मकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. अहंकार, दुष्टाव्यावर सत्प्रवृत्तींचा; म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय या अर्थाने हे दहन केले जात असते. पण, आजवरच्या या भूमिकेलाच छेद देणारा विचार पुढे आला असून, रावणाला पूज्य मानणा-यांनी रावणदहनातून आपल्या भावनांना ठेच पोहोचत असल्याची भूमिका जोरकसपणे मांडली आहे. रावणाचा संहार करून प्रभू श्रीरामांनी मानव समाजावर मोठे उपकार केले, असा महर्षी वाल्मीकींच्या वर्णनाचा आशय भारतीय संस्कृतिकोशात उल्लेखिला असला तरी; आपल्याकडेच विदर्भात काही ठिकाणी रावण पूजला जातो. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात सांगोळा येथे रावणाची मूर्तीही आहे. रावणाचे सांगोळा म्हणूनच हे गाव ओळखले जाते. आदिवासींमधील कोरकू हे रावणाला देव मानून त्याची व त्याचा पुत्र मेघनादची दसरा व होळीला पूजा करतात. तामीळनाडूत तर रावणाची ३५० पेक्षा अधिक मंदिरे असून, छत्तीसगढ, झारखंड आदी प्रांतात त्याची पूजा करणारे अनेकजण आहेत. राजस्थानच्या हाडौती भागात रावणदहन न करता मातीपासून पुतळा बनवून तो ध्वस्त केला जातो. मध्य प्रदेशातील मंदसौर हे मंदोदरीचे गाव म्हणून रावणाची सासुरवाडी मानली जाते. तिथेही रावणदहन केले जात नाही. त्यामुळे रावणाला खलनायक ठरवून केले जाणारे दहनाचे कार्यक्रम थांबवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

अर्थात, रावण तपश्चर्याशील व तत्त्वज्ञानी असल्याचे जसे दाखले देण्यात येतात, तसे त्याच्या दुष्टाव्याचे व पराकाष्टेच्या दुर्गुणांचे दाखलेही ठायीठायी असल्याने प्रतीकात्मक रूपाने केले जाणारे रावणदहन सुरूच ठेवण्याची भूमिका दहन समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे यासंदर्भातील संघर्षाला अभिनिवेश प्राप्त होऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. अस्मितांची जोडही त्याला लाभू पाहत आहे. परिणामी वैचारिक मन्वंतरातूनच या विषयाची सोडवणूक होऊ शकणारी आहे. नाही तरी, पुतळे पाडण्याने किंवा दहनाने विचार अगर विकार विस्मृतीत जात नसतातच. त्यासाठी मानसिक मशागतीचीच गरज असते. आज मनामनांमध्ये जो आपपरपणा, दुष्टावा, व संकुचितता वाढीस लागली आहे, तिचे दहन होणे खरे गरजेचे आहे. दस-यानिमित्त सीमोल्लंघन करायचे ते या अशा अपपवृत्तींचे. लुटायचे ते सद्विचारांचे सोने. माणसातील माणुसकीचा भाव जागविणारे पूजन यानिमित्ताने घडून यावे, इतकेच.

Web Title: objects to burning Ravana’s effigy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा