हे साहित्यिक की व्यापारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 3:07am

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे स्वरूप आले असून यंदाची निवडणूक तर आणखी ओंगळवाणी होणार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे स्वरूप आले असून यंदाची निवडणूक तर आणखी ओंगळवाणी होणार, अशी लक्षणे दिसू लागली आहेत. यंदाच्या संमेलनाला सुरुवातीपासूनच विघ्न सुरू झाली आहेत. संमेलन हिवरा आश्रमला ठरल्यानंतर वाद झाला. नंतर स्थान बदलून ते बडोद्याला हलवावे लागले. आता बडोद्याचे आयोजक पैशांच्या चणचणीने संकटात सापडले आहेत. त्यातच संमेलनाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या एका उमेदवाराने प्रायोजकत्वाची आॅफर दिल्याने हे साहित्य संमेलन की फिल्म फेस्टिव्हल, असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडणे स्वाभाविक आहे. स्वत:च्या साहित्यिक योगदानाबद्दल ज्यांच्या मनात शंका असतात, तीच माणसे असे उपद्व्याप करीत असतात. या निवडणुकीत बड्या राजकीय नेत्यांनीही थेट हस्तक्षेप सुरू केला आहे. सर्वसाधारण निवडणुकीत असे प्रकार होतात. प्रादेशिकवाद, भाषा, धर्म, जात ही मते मागण्याची हुकमी साधने असतात. इथेही असेच होणार आहे. सुुरुवात प्रायोजकत्व मिळवून देण्यापासून झाली आहे. राजकीय नेत्यांचे फोनही सुरू झाले आहेत. आता हळूच प्रादेशिक अस्मिता पेटवल्या जातील. नंतर हा प्रचार धर्म अणि जातीवरही येऊन ठेपेल. थोडक्यात काय तर उमेदवाराच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी याच साहित्यबाह्य वांझोट्या गोष्टी वरचढ ठरणार आहेत. किमान सारस्वतांनी तरी अशा कुठल्याही घाणेरड्या गोष्टींत गुंतू नये. पण, दिवसेंदिवस असे प्रकार वाढतील. आता तर मतदारांना डांबून ठेवण्याचे प्रकारच तेवढे बाकी राहिले आहेत. उद्या तेही होतील. अलीकडे केवळ प्रतिष्ठा मिळवण्यासाठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा आटापीटा सुरू झाला असल्याने पुढच्या काळात साहित्याशी कवडीचा संबंध नसलेला एखादा राजकीय नेता, व्यापारी किंवा डॉन या प्रवृत्तीही या पदासाठी जोर लावतील. कारण, शेवटी प्रतिष्ठाच मिळवायची असली की माणूस काहीही करतो. बडोद्याचे संमेलन त्या अंगाने अविस्मरणीय ठरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कुठल्याही राज्याचे वैचारिक नेतृत्व त्या राज्यातील लेखक, साहित्यिक, विचारवंतांकडे असते असा एक सर्वसाधारण समज आहे. पण, साहित्यिक स्वहितासाठी असे व्यवहारी होत असतील तर समाजाला वैचारिक नेतृत्व देण्याची जबाबदारी ते कसे पार पाडू शकतील हा मोठाच प्रश्न आहे. साहित्यिक असे भ्रष्ट होत असताना किमान मतदारांनी तरी साहित्यहिताची भूमिका घेत या शारदेच्या उत्सवासाठी लक्ष्मीचे दर्शन घडविणाºयांना मतदानातून धडा शिकविला पाहिजे.

संबंधित

शस्त्रधारी सेन्सॉरशिप
पर्यटनासह राज्याच्या महसुलालाही चालना मिळणे शक्य!
मुहूर्त लाभला, हक्काचे काय?
मुंबईकरांची समस्या आहे निवा-याची!  निवारा अभियानची पुनश्च आंदोलनाची हाक
जिहादी विचारांनी माथी भडकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याची धडपड

संपादकीय कडून आणखी

राज्याची उपराजधानी म्हणविणा-या शहरातील स्वच्छतेचा ‘कचरा’
स्पर्धेचं जग अन् अपेक्षांचं ओझं
बस्स् कर यारऽऽ अब कितना रुलायेगा ?
एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने पुन्हा हादरली डोंबिवली
व्यवसाय करण्यात सुलभता, गुंतवणुकीत मात्र घसरण

आणखी वाचा