आता भाजपही वेगळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:58 AM2018-03-17T00:58:08+5:302018-03-17T00:58:08+5:30

सारे आयुष्य संघ व भाजपला शिव्या घालण्यात, मोदींना गुजराती म्हणण्यात आणि साऱ्या गुजरात्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे असा सभ्य सल्ला त्यांना देणारे नारायण राणे यांना त्यांच्या पुत्र-पौत्रांसह आपल्या संघटनेत प्रवेश देणारा भारतीय जनता पक्ष आता कर्मठ राहिला नाही.

Now BJP is no different | आता भाजपही वेगळा नाही

आता भाजपही वेगळा नाही

Next


सारे आयुष्य संघ व भाजपला शिव्या घालण्यात, मोदींना गुजराती म्हणण्यात आणि साऱ्या गुजरात्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे असा सभ्य सल्ला त्यांना देणारे नारायण राणे यांना त्यांच्या पुत्र-पौत्रांसह आपल्या संघटनेत प्रवेश देणारा भारतीय जनता पक्ष आता कर्मठ राहिला नाही. पौरोहित्याबाबतचे त्याचे सोवळेपणही आता तेवढेसे अस्पर्श राहिले नाही. महाराष्ट्राचे राज्यपालपद व कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद काँग्रेस पक्षाकडून मिळविण्यात यशस्वी झालेल्या एस. एम. कृष्णा (आता यांचे नावही फारसे कुणाच्या स्मरणात नाही) या सत्पुरुषाला मोदी आणि शहा यांच्यापुढे हात जोडून नम्रपणे उभे राहिलेले छायाचित्रात प्रथम पाहिले तेव्हाच भाजपच्या संस्कृतिकरणाकडून सामाजिकरणाकडे सुरू झालेल्या वाटचालीची झलक देशाला दिसली. नारायण राणे यांच्या प्रवेशाने तर हिंदू धर्माने ईश्वरभक्तीचा अधिकार श्रद्धावानांएवढाच अश्रद्धांना, भाविकांएवढाच अपराध्यांना आणि सावांएवढाच चोरांनाही दिला असल्याचा उदारपणा दाखविला आणि त्याचा प्रत्ययही समाजाला आणून दिला. आणि हो, ते नरेश अग्रवाल यांनी आतापर्यंत मायावतींचा बसप, मुलायमसिंगांचा सप, काँग्रेस आणि याखेरीज अनेक अन्य अनेक पक्षात राहण्याचा व त्यातील सत्तापदे मिळविण्याचा विक्रम केला त्यांनाही राण्यांसोबतच भाजपाने अत्यंत उदार अंत:करणाने आपल्या अंगणातच नव्हे तर दिवाणखान्यात आता प्रवेश दिला. या अग्रवालांनी मोदींना राक्षस म्हटले, त्यांच्या पक्षाला दानवांचा पक्ष म्हटले, जो देशभक्त पाकिस्तानच्या कैदेत यातना भोगतो त्या कुलभूषण जाधवला त्याने देशद्रोही व गुप्तहेर म्हटले शिवाय हिंदू दैवतांची नावे विदेशी मद्यांच्या नावात गुंफून केलेली कविताही त्याने संसदेला ऐकवली. त्यासाठी अरुण जेटलींनी त्याचे शब्द मागे घ्यायला त्याला भाग पाडले. आता तो इसम मोदींच्या आणि योगी आदित्यनाथाच्या मांडीला मांडी लावून पक्षात बसवून आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पक्षनिष्ठेची प्रवचने ऐकवील. राण्यांच्या गाठीशीही अनेक पक्षांचा अनुभव आहे. ते शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये आले, पुढे बेघर झाले आणि आता अमित शहांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष स्थापन केला. आता तो सारा पूर्वानुभव आणि त्यातील अहंकारांची सारी वस्त्रे उतरून भाजपच्या तिकिटावर ते राज्यसभेत विराजमान होत आहेत. खरे तर त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यायचे होते. पण त्या मंत्रिमंडळात शिवसेना आधीच बसली आहे आणि तिला राण्यांचा प्रवेशच काय पण वारासुद्धा चालणारा नाही. काँग्रेस सोडली आहे आणि भाजपात प्रवेश मिळत नाही अशा ‘घर का ना घाट का’ या अवस्थेत या मानी पुरुषाने आणि त्याच्या स्वाभिमानी पुत्रांनी तरी किती दिवस काढायचे असतात? शेवटी समाजाला येऊ लागलेली त्यांची कीव लक्षात घेऊनच बहुदा भाजपने त्यांना राज्यसभा देऊ केली. तसे करताना त्या पक्षाने देवेंद्र फडणवीसांसमोरील ‘सेना की राणे’ हा पेचही सोडवून घेतला आणि सेनेला असलेली राण्यांची धास्तीही दूर केली. राजकारण म्हणजे धर्मकारण नव्हे. ते त्याच्याच नियमांनी व सोयींनी करायचे असते. त्यात धर्म, न्याय, नीती वगैरेंसारखे मूल्ये आणायची नसतात. एकेकाळी हे काँग्रेसने केले. ‘जे आमच्यात येतात ते आपोआपच शुद्ध आणि पवित्र होतात’ असे माजी रेल्वेमंत्री जगजीवनराम एकदा म्हणाले. तेच सूत्र आता इतर पक्षांनी आत्मसात केले आहे. तरीही भाजपबद्दल इतरांना नसली तरी त्यातल्या काही संघनिष्ठांना त्याच्या पावित्र्याविषयीची आस्था होती. तो अजूनही ‘पार्टी विथ ए डिफरन्स’ आहे असे त्यांना वाटत होते. त्याविषयीचा आग्रहही ते धरत होते. पण भाजपएवढेच आता संघालाही राजकारण चांगले समजू लागले आहे. त्यात निष्ठा म्हणजे सत्तेची निष्ठा असते, सत्याची निष्ठा नसते हे त्यालाही समजले आहे. सबब एस. एम. कृष्णा आले, नरेश अग्रवाल आले आणि राणे सहकुटुंब सहपरिवाराने तरी त्याचे फारसे नवल तो परिवारही आता वाटून घेत नाही. कुणी सांगावे उद्या त्या पक्षात डावेही आलेले दिसतील. तसे ते त्रिपुरात आलेही आहेत. तात्पर्य, आता कोणत्याही पक्षाने दुसºयाला वैचारिक निष्ठा सांगण्याचे कारण उरले नाही.

Web Title: Now BJP is no different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.