निसर्गाने स्त्रीला नवनिर्मितीची शक्ती दिली आहे. आई म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच असतो. वेदनादायी परंतु गोड संवेदना देणारे एक दिव्यच असते. हे अग्निदिव्य पार पडल्यानंतरचा आनंद चिरंतन असतो. मात्र, काही स्त्रिया मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहतात. काही महिलांना जन्मत:च गर्भाशयाची पिशवी नसते किंवा ती काही कारणाने निकामी झालेली असते अथवा कर्करोगामुळे गर्भाशय काढण्याची वेळ आलेली असते. अशा महिलांना अपत्यप्राप्तीचे सुख मिळू शकत नाही. यावर सरोगसी म्हणजे गर्भाशय भाड्याने घेण्यासारखे उपायही आहेत. परंतु, मूल आपल्याच हाडामांसाचा गोळा असावा, असे कोणत्याही आईला वाटणे स्वाभाविक असते. पुण्यात गुरुवारी झालेल्या गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेने वैद्यकीय विज्ञानाचे नवे दालन खुले केले आहे. जन्मत:च ज्यांना गर्भाशय नाही किंवा काही कारणाने गर्भाशय काढून टाकावे लागणाऱ्या स्त्रियांची मातृत्वाची आस आता पूर्ण होऊ शकणार आहे. देशातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया करण्याचे शिवधनुष्य प्रख्यात शल्यविशारद डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी पेलले. परंतु, त्यांचा प्रवासही सोपा नव्हता. डॉ. पुणतांबेकर यांच्याच शब्दांत सांगायचे तर, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी परवाना मिळविणे, हे एका दिवसाचे काम नाही. त्यांनी गेल्या १४ वर्षांपासून गर्भाशयाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्या. त्यांचे तंत्रज्ञान जगातील ४० देशांमध्ये ‘पुणे टेक्निक’ म्हणून ओळखले जाते़ गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया स्वीडनमध्ये २०१४ मध्ये झाली होती. आतापर्यंत जगात केवळ २५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे डॉ. पुणतांबेकर यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने स्वीडन व अमेरिकेत जाऊन सर्व वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले़ प्रत्यारोपणासाठी भारतीय कायदे वेगळे आहेत. महिलेला आई किंवा बहीणच गर्भाशय दान करू शकते. त्यासाठी वयाचे निकषही पाळावे लागतात. या सगळ्या अडथळ्यांवर मात करून डॉ. पुणतांबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील वैद्यकीय ज्ञानाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू केला आहे. ‘पुणे टेक्निक’चे हे यश निसर्गाकडून अन्याय झालेल्या अनेक महिलांची मातृत्वाची आस पूर्ण करू शकणार आहे.