वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 03:12 AM2018-10-12T03:12:22+5:302018-10-12T03:12:47+5:30

गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. 

 Need for psychological rehabilitation of drivers; Attempts at the government level should be made | वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

वाहनचालकांच्या मानसिक बदलाची गरज; सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत

Next

- अशोक दातार 
(वाहतूकतज्ज्ञ)

गेल्या २० वर्षांत मोबाइल फोनला आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आज मोबाइल वापरते. मोबाइल वाजला रे वाजला की त्यावर त्वरित बोलण्याची निकड प्रत्येकाला असते. एरव्ही काही आक्षेप असायचे काहीच कारण नाही. परंतु जेव्हा वाहनचालक असे करतात, तेव्हा ते नक्कीच आक्षेपार्ह व धोकादायक आहे.
अनेकांना वाटते की वाहन चालवणे हा वेळेचा अपव्ययच आहे. तेव्हा जर फोन केल्यास हा वेळ सत्कारणी लागू शकतो. असे करणे काही गैर नाही. आता दुर्दैवाने पोलिसांच्या नियमानुसार वाहन चालवताना फोन करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. मात्र पदोपदी पोलीस नसल्यामुळे वाहनचालक या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. औद्योगिक व व्यावसायिकदृष्ट्या अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक करताना फोनचा वापर करण्याच्या गुन्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीला कारणीभूत कोण? महाराष्ट्र पोलीस? कारण अतिशय उद्यमशील असे महाराष्ट्रातील लोक आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी फोनचा वापर सदोदित करत असतात. असा फोनचा वापर अपघाताला कारणीभूत ठरतो हा मुद्दा अलाहिदा.
आपल्याकडे लोकलच्या डब्यावर चढून प्रवास करणारे स्टंटबाज जसे आहेत, त्याहून खूपच सोपा स्टंट म्हणजे, दुचाकी चालवताना हेल्मेटच्या आत कानावर खोचून फोनचा वापर करणारेही आहेत. दुचाकी वाहनांना ट्रॅफिकमधून मार्ग काढायला आवडते. विशेषत: बसेस व फुटपाथ यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून निसटून जाताना, कानावर हेडफोन लावून संगीताचा आस्वाद घेताना आजूबाजूच्या वाहतुकीचे भान न राहिल्यामुळे अपघतात घडतात. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाण जर १ टक्का असेल तर ते खूपच जास्त आहे.
सध्या मोबाइल क्षेत्रातील क्रांतीमुळे इंटरनेटची सुविधा जवळजवळ सर्व मोबाइल कंपन्यांमार्फत ग्राहकांना दिली जाते. ज्यामुळे अनेक दृक्श्राव्य माध्यमांद्वारे मालिका, क्रीडा स्पर्धा, चित्रपट आदींचे प्रक्षेपण ग्राहकांना सहज उपलब्ध होते. परिणामी मोबाइलचा वापर अधिक होणे स्वाभाविकच आहे. वाहन चालवताना हे सर्व बघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.
मात्र हे सर्व रोखण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्वांगाने प्रयत्न व्हायल हवेत. एक म्हणजे दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करायला हवी. त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.
दुसरे म्हणजे नवे तंत्रज्ञान शोधायला हवे, जसे की वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीडो मीटरचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे मोबाइल वापरावर बंदी आणण्यासाठी प्रवासात जॅमर किंवा अन्य पर्याय शोधायला हवा. याचे संशोधन राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवे. तसेच वाहनांच्या व फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. मात्र चालकांच्या मानसिकतेमध्ये आवश्यक तो बदल होताना दिसत नाही. हा बदल घडवण्यासाठी सामाजिक व सरकारी स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. तरच भविष्यात मोबाइलवर बोलून वाहन चालवणा-यांचे अपघात होणार नाहीत.

Web Title:  Need for psychological rehabilitation of drivers; Attempts at the government level should be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार