बडोदा संमेलनात आले मोदी...

By संदीप प्रधान | Published: February 3, 2018 12:28 AM2018-02-03T00:28:01+5:302018-02-03T00:28:45+5:30

बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता साहित्यिक डेरेदाखल झाले. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे (प्रवासभाडे मागणा-या लेखकूंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार, या प्रश्नाकरिता पिच्छा पुरवणा-या पत्रकारांचा डोळा चुकवून) सभामंडपात वावरत होते.

Narendra Modi in Baroda meeting | बडोदा संमेलनात आले मोदी...

बडोदा संमेलनात आले मोदी...

googlenewsNext

बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता साहित्यिक डेरेदाखल झाले. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे (प्रवासभाडे मागणा-या लेखकूंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार, या प्रश्नाकरिता पिच्छा पुरवणा-या पत्रकारांचा डोळा चुकवून) सभामंडपात वावरत होते. ढोकळा, फाफडा, खाकरा असे पोटात गॅस धरणारे पदार्थ खाऊन ही गुजराती मंडळी कसे दिवस काढतात, हा प्रश्न जोशी यांच्या मनात (दातात अडकलेल्या ढोकळ्यातील मोहरीसारखा) टोचत होता. तेवढ्यात, जोशींच्या कानाशी जोरात तुतारी वाजली आणि पाठोपाठ आले... आले... असा गजर झाला. पाहतात तो काय? मोदीकुर्ता परिधान केलेले, खांद्यावर शाल घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सभामंडपी अवतरले होते. जोशींना धक्का मारून दोनचार साहित्यिक-कम-स्तुतिपाठक पुढे धावले. अर्थात, सुरक्षारक्षकांनी त्यांना (सुटे पैसे नसल्यानं बसचा कंडक्टर खाली उतरवतो तसे) झिडकारले. तेवढ्यात, कुणीतरी जोशी यांच्या कानाशी येऊन पुटपुटले की, मोदीसाहेबांना घाई आहे. त्यांचे भाषण अगोदर घ्या. पण, तोपर्यंत मोदी माईकवर पोहोचले होते... मेरे प्यारे देशवासियों... (लोकांनी टाळ्या पिटल्या) मित्रो, मी आज मराठीत बोलणार आहे. (पुन्हा टाळ्या) मी साहित्य संमेलनाला येणार की नाही, यावरून उलटसुलट चर्चा सुरूहोती. महाराष्ट्रात शिवसेना सरकारमध्ये राहणार की नाही, यावरून होते तशी (देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकतात) (सभामंडपात खसखस पिकते) मी आज मराठीत तुमच्यासमोर भाषण करत आहे, याचे श्रेय शिवसेनेलाच आहे. मुखपत्राच्या अग्रलेखातून रोज न चुकता होणारी टीका व्हॉट्सअ‍ॅपवरून माझ्याकडे येत होती. सुरुवातीला मला ती वाचता येत नव्हती. मात्र, कोल्हापूरचे जावई आमचे अमितभाई शहा यांनी मला दोन गोष्टी शिकवल्या, एक म्हणजे जहाल टीका वाचताना जळजळीत कोल्हापुरी मिसळ हाणायची. म्हणजे मिसळच्या ठसक्यापुढे टीका फिकी वाटते आणि टीकेमुळे वाढलेल्या जळजळीचे मिसळ हेच कारण असल्याचा समोरच्यांचा समज होतो. (टाळ्या) राज ठाकरे यांनी साहित्यिकांना महाराष्ट्रातील घडामोडींबाबत भूमिका घेण्याचे आवाहन केले, असे मी वाचले. त्यामुळे तुम्ही कोणती भूमिका घेता, याकडे माझे लक्ष आहे. मात्र, महाराष्ट्रातील १२ कोटी लोकांच्या वतीने भूमिका घेणारे तुमचे संमेलनाध्यक्ष जेमतेम १०७३ मतदारांच्या बळावर निवडून येतात आणि त्यातही २९ मते अवैध ठरतात, हे विसरू नका. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची प्रमुख मागणी आहे, हे मला येथे येण्यापूर्वी कळले. पण, गुजराती माणूस व्यवहारी आहे. तो ‘इस हाथ से ले, और उस हाथ से दे,’ असे करतो. त्यामुळे तुम्ही माझ्या दोन मागण्या मान्य करा. बडोदा मराठी वाङ्मय परिषदेला सध्या असलेला महामंडळाच्या संलग्न संस्थेचा दर्जा बदलून समाविष्ट संस्थेचा दर्जा देऊन सध्याचा मतांचा कोटा वाढवा. यामुळे उद्या गुजराती माणूस संमेलनाध्यक्ष होऊ शकेल. लक्ष्मी-सरस्वतीची गळाभेट होईल आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय खुला करा. (जोशी चुळबुळ करू लागतात) मोदी लगेच निघून जातात. थोड्या वेळाने कळते की, भाषण मोदींचेच होते, पण करणारे गोरेगावचे विकास महंतो होते...

Web Title: Narendra Modi in Baroda meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.