पैसा कमावण्याचे कोचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:47 AM2018-03-23T03:47:58+5:302018-03-23T03:47:58+5:30

Money Making Coaching | पैसा कमावण्याचे कोचिंग

पैसा कमावण्याचे कोचिंग

Next

- संदीप प्रधान

सदू : पैसा म्हणजे काय रे भाऊ?
दादू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट आहे भाऊ.
सदू : अगदी सनी लिआॅनपेक्षा पण मादक?
दादू : पैसा असेल तर सनी लिआॅनची रांग लागेल दारात.
सदू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट असेल तर दारू वाईट तसा पैसाही वाईट असेल नाही का?
दादू : तू म्हणतो तसेच मला वाटत होते. पण कालच मी ‘अवघे पाऊणशे वयमान’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ््याला हजर होतो. तेथे मनोहरपंत जोशी यांचे प्रवचन ऐकून मी प्रभावित झालो. ते म्हणाले की, जीवनात अनिश्चितता नको असेल तर प्रत्येकाने जीवनात पैसा कमावला पाहिजे.
सदू : अरे काय बोलतोस काय? कालपर्यंत समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक घटवून घटवून मला वाटत होतं की, ‘नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे’ हेच सत्य आहे. मात्र पंतांचा हा सल्ला ‘मनाचा’ नसून स्वानुभवाचा असल्यानं अगदी अस्सल असणार.
दादू : अगदी बरोबर. पंत कोकणातील नांदवीसारख्या लहानग्या गावातून मुंबईत आले आणि शिवसेनेत काम करता करता मोठ्ठे उद्योजक झाले.
सदू : चल मग आपणही शिवसेनेत जाऊ. तिकडं गेल्यावर आपलीपण सरांसारखी सरसर प्रगती होईल.
दादू : छ्या... ते शक्य नाही.
सदू : का?
दादू : काल ते पुस्तक प्रकाशित झाले आणि मनोहरपंतांचा पैसा कमावण्याचा सल्ला ऐकून ‘मातोश्री’च्या बाहेर शिवसेना प्रवेशाकरिता रांग लागलीय.
सदू : मग आता आपण कसे होणार पैसेवाले?
दादू : मला पण तोच प्रश्न पडलाय?
सदू : आपण सरांसारखं हॉटेल काढूया का?
दादू : डायरेक्ट हॉटेल. सुरुवात तर वडापावच्या गाडीपासून करावी लागेल नां?
सदू : आता जर गाडी टाकली तर भरपूर पैसा कमवायला आपल्याला किमान दीडशे वर्षांचे आयुष्य लागेल. नाही हे काही जमायचे नाही.
दादू : मग आपण पंतांसारखा टॉवर उभा करूया का? एवढा उंच टॉवर...एवढा उंच की आजूबाजूचे सगळे टॉवर त्या टॉवरपुढे एखादे ‘भवन’ वाटले पाहिजेत.
सदू : अरे येड्या, टॉवर उभा करायचा तर अगोदर पैसा नको का? सिमेंट, रेती, स्टील खूप मोठ्ठा खर्च असतो.
दादू : आयडिया... आपण पैसा कमावण्याचे क्लास काढूया. आलेल्याची मुलाखत घ्यायची. त्यांची स्वप्नं समजून घ्यायची आणि ती पूर्ण करण्याकरिता त्यांनी किती पैसा कमावला पाहिजे त्याचं कोचिंग करू.
सदू : पैसा कमावण्याची सुुरुवात ही कोचिंगपासून करणे ही अस्सल ‘कोहिनूर’ कल्पना आहे.
(दोघे चालत चालत स्टेशनजवळ येतात. तेवढ्यात त्यांचे लक्ष एका फलकाकडे जाते)
सदू : अरे दादू... हे पाहिलस का? पैसा कमावण्याचे प्रि. मनोहर जोशी यांचे कोचिंग क्लास अगोदरच सुरू झालेत.

Web Title: Money Making Coaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा