मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: June 27, 2017 12:39 AM2017-06-27T00:39:57+5:302017-07-26T12:04:46+5:30

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही.

Meghdavara means that the chest | मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

Next

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!
मुंबईत पाऊस बरसायला लागला की एक अनोखं चित्र दिसतं. आभाळात काळ्याकुट्ट ढगांची अन्् जमिनीवरल्या लोंढ्यांच्या डोईवर छत्र्यांची गर्दी. या शहरात सगळ्या प्रकारच्या अभिरूचीला जागा आहे. म्हणूनच तर आषाढाच्या पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली की जसा दादा कोंडकेंच्या ढगाला लागली कळ...ची धून गुणगुणणारा वर्ग आहे, तसाच महाकवी कालिदासाच्या मेघदूताची याद जागवणारा वर्गही कमी नाही. तसं पाहिलं तर बरसू पाहणाऱ्या ढगांचं प्रणयीजनांना वाटणारं आकर्षण नवं नाही. तो परंपरेनं चिंब भिजलेला वारसा आहे. आषाढाची सय आली अन्् पाऊस मुंबईवर अक्षरश: कोसळला. जलमय झालेल्या मुंबईची दृश्यं पाहताना बाहेरच्या माणसाच्या छातीत धस्स होईलही कदाचित पण अस्सल मुंबईकर धबाबा कोसळलेला पाऊसही लीलया अंगावर झेलतो. म्हटलं तर मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसरा पाऊसही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!
आषाढाच्या पहिल्याच दिवशी मेघदूतातल्या कविकल्पनेला जागून पाऊस मुंबापुरीवर बरसला. रविवारच्या सुटीच्या दुलईत लपटलेली मुंबई धो धो कोसळलेल्या पावसानं सुखावली. या शहराचा पर्जन्यमापक अनोखा आहे. २४ तासांत किती मिलीमीटर किंवा किती इंच पाऊस पडला, याच्या खानेसुमारीत मुंबईकरांना फारसा रस नसतो. सायन, दादर टीटी आणि हिंदमाता यासारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आणि उपनगरांच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे सब वे पाण्यात बुडाले, रेल्वेचे रूळ पाण्यात डुबकी मारून बसले, की मुंबईत पाऊस सुरू झाला असं मानायची पद्धत आहे. मुंबईतल्या पावसाच्या गणिताचं प्रमेय तसं सुटायला अवघडच. कारण नखशिखान्त भिजल्यावर हे शहर अंग आक्रसून घेत नाही. उलट अधिक उन्मादक होतं. रोमॅन्टिसिझमच्या अंगानं आक्रमकही. मुंबईतल्या प्रेमीयुगुलांची चिंब भिजल्यानंतरची अभिव्यक्तीही खाशी असते. ‘त्यांच्या’तल्या तिला पाऊस आवडतो. त्याला कधीमधी नाही आवडत. तिच्यासाठी...पाऊस म्हणजे मोकळं होणं, भरभरून सांगणं, असोशीनं व्यक्त होणं. पण त्याचं काय? कवी सौमित्रच्या शब्दांत सांगायचं तर त्याला वाटतं...पाऊस म्हणजे चिखल, राडा...एक हसं करणारा प्रकार! मुद्दा इतकाच, की पावसाकडे कोण कसं बघेल यातली अनिश्चितता पावसाच्या बेभरवशाच्यापेक्षा जास्त आहे. पण वर्षाकाठी आठ-दहा महिने घामाच्या धारांमध्ये चिंब भिजणारा मुंबईकर चातकासारखी पावसाची वाट बघतो. कमालीच्या जागरूकतेनं मान्सूनच्या आगमनाचा ट्रॅक ठेवतो. मुंबईचा पाऊस बघण्यासाठी समुद्रालगतच्या तारांकित हॉटेलांमध्ये तळ ठोकून राहणाऱ्या अरबांची एके काळी त्यावरून टिंगल केली जायची. पण ते उंटावरचे नव्हे, तर खरेखुरे शहाणे होते, असं उसळलेला अरबी समुद्र प्रेमानं बघणाऱ्या मुंबईकरांना एव्हाना मनोमन पटलंय. रम्य वगैरे नसला, तरी सूर्याला दोन-तीन दिवस औषधालाही फिरकू न देणारा पाऊस मुंबईकरांना आवडतो. रखडलेल्या लोकल, तुंबलेले रस्ते, अर्धीअधिक भिजलेली गर्दी, चिकचिकाट अन्् मुंगीच्या वेगानं नि मुंगळ्याच्या चिकाटीनं चालणारी वाहतूक अशा धबडग्यात रोमँटिक होण्याला जागा मिळावी तरी कशी? पण पावसाची मौज लुटायला इथं मनाई नाही. कंबरेएवढ्या पाण्यात बंद पडलेल्या गाडीला धक्का मारणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. ‘चले यार धक्का मार’च्या या वरातीत अनोळखी माणसंही सुहास्य वदनानं सामील होतात. भिजून देहाचं धुकं वगैरे करण्याएवढा वेळ मुंबईकरांपाशी नाही. तरीही आता मुंबईचे रंग हमखास बदलणार. छत्र्या-रेनकोटांचे नानाविध प्रकार. बायकांच्या पावसाळी पर्सेस आणिक खूप काही. पाऊस कवितेतून वगैरे व्यक्त न करणारा मुंबईकर पाऊस मन:पूर्वक जगतो. तो पावसाला कुरकुरत नाही. नावं ठेवत नाही. अनोळखी पावसालाही सखा म्हणून छत्रीत घेण्याची दानत हेच या शहराचे महाकाव्य!
-चंद्रशेखर कुलकर्णी

Web Title: Meghdavara means that the chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.