मुखवटा गळून पडला

By सुधीर महाजन | Published: August 31, 2017 12:39 PM2017-08-31T12:39:33+5:302017-08-31T12:39:45+5:30

केवळ आरोपावरून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना घरी का बसवले? आरोपांचा बोफोर्स मारा असताना प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन मंत्र्यांना अभयदान का दिले.

The mask fell | मुखवटा गळून पडला

मुखवटा गळून पडला

googlenewsNext

   आम्ही भाबडे आहोत की भोट, याचा उलगडा होत नाही. कोणी म्हणाले राहायला घर देतो की, आम्ही भाळलोच. कोणी म्हणाले, आम्ही तुम्हाला जवळपास फुकट धान्य देतो की, आमची मती गुंग होते. कोणी म्हणाले की, देश भ्रष्टाचारमुक्त करतो, की आम्ही देहाची कुरवंडी त्याच्यावरून ओवाळून टाकायला तयार; पण प्रत्येक वेळी फसगत होते आणि पश्चात्तापाचे चटके म्हणाल तर ते आता बसतच नाहीत, म्हणजे पश्चात्ताप झाला की आणखी काय, हे कळतच नाही. अशा वेळी शेजारीपाजारी चक्रम झाला, असे म्हणतात. म्हणजे वर्तमान काळात आम्हाला काही प्रश्न पडायला लागले तेही एकापाठोपाठ एक म्हणजे असे की, केवळ आरोपावरून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना घरी का बसवले? आरोपांचा बोफोर्स मारा असताना प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन मंत्र्यांना अभयदान का दिले. खरे म्हणजे असे प्रश्न विचारायचे नसतात. मनातसुद्धा येऊ द्यायचे नसतात. कोणत्या तरी बाबाने मनाच्या निग्रहाविषयी सांगितलेच आहे, तसा निग्रह करायचा असतो. बरे हे सगळे प्रश्न तुमच्या- आमच्यासारख्या सोशल मीडियात आणि वेगवान वर्तमानकाळात राहणा-याच्या दृष्टीने भूतकाळातील आहेत; पण वर्तमानकाळसुद्धा प्रश्नांचाच, तर भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा करणा-या नरेंद्र भार्इंच्या शिष्योत्तमाने सुनील केंद्रेकरांसारख्या अधिका-याची ससेहोलपट का लावली, असा प्रश्न पडतो. म्हणजे भ्रष्टाचाराच्या आड येणा-यांची गय केली जाणार नाही, अशी भाषा करताना कृती नेमकी वेगळी का?

कृषी आयुक्त सुनील केंद्रेकरांना दोन महिन्यांत बदलण्यात आले. कारण भ्रष्टाचाराच्या कुरणाला कुंपण घालण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. कृषी खात्याचा लौकिक म्हणा की या मातीचा गुण, येथे प्रामाणिक बियाणे उगवत नाही किंवा पणपत नाही. पनपलेच तर कुरणातील वळू ते फस्त करतात. भलेभले मल्ल या मातीत चीत झाले. केंद्रेकरांनी एक चूक केली ती अशी की, स्वत:चा शर्ट स्वच्छ ठेवण्यासाठी कृषी खात्याचा धोबीघाट मांडला. त्यामुळे मळखाऊ कपडे घालणारे अस्वस्थ झाले. त्यांच्या हालचाली सुरू झाल्या. लॉबिंगच्या कारवाया वाढल्या आणि केंद्रेकर जाणार या कुजबुजीने जाहीर चर्चेचे स्वरूप घेतले. अनेकांचा यावर विश्वास बसला नाही. केंद्रेकरांची बदली होणार नाही, अशी ठाम धारणा असलेली काही मंडळी होती. खात्याला चांगला अधिकारी मिळाला आणि त्याच्यामागे उभे राहिले पाहिजे, असे मानणारी प्रगतिशील शेतकरी मंडळीही होती. पोपटराव पवारांपासून ते माळीनगरच्या सुरेश वाघधरेंपर्यंत अनेकांनी या संभाव्य बदलीबाबत जाहीर आक्षेप घेतला. सोशल मीडियावर हा विषय आठवडाभर गाजत होता. मंत्रालयात कानोसा घेतला, तर तिकडेही काही हालचाल नव्हती. म्हणजे हा प्रकार कृषी खात्यातील भ्रष्टाचारी लोकांनीच बदलीची अफवा पसरविली, असा अर्थ काढला गेला. आणखी एक जबरदस्त आशावाद होता तो म्हणजे सरकार केंद्रेकरांसारख्या प्रामाणिक अधिका-याची बदली करणार नाही. कारण सामान्य माणूस सरकारविषयी स्वत:चे काही अंदाज बांधत असतो; पण काल झालेल्या किरकोळ बदल्या पाहता केवळ केंद्रेकरांना हटविण्यासाठी सरकारने हा घाट घातला.
दोन महिन्यांतच केंद्रेकरांनी असे काय केले, तर भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. दुभत्या गायीऐवजी भाकड गायींचे वाटप करण्यात आले होते, त्याची चौकशी त्यांनी सुरू केली. माळशिरस तालुक्यातील ठिबक सिंचन घोटाळा प्रकरणात न्यायालयात अहवाल सादर करण्याची तंबी अधिका-यांना दिली. शेतक-यांसाठीच्या निधीचे पाट दुसरीकडे कसे वळवले जातात हे खोदण्याचा प्रयत्न केला.

कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीला ही गोष्ट पचनी पडणे शक्य नव्हते. अखेर परंपरा कायम राहिली आणि केंद्रेकरांची बदली झाली. या बदलीने एक मात्र स्पष्ट केले की, भाजपचा रामराज्याचा मुखवटा फाटला. ‘पार्टी विथ डिफरन्स’ची उक्ती त्यांनीच खोटी ठरविली. काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस तसेच राष्टीय पातळीवर समाजवादी पार्टी, लालूप्रसाद यादव यांच्यावर दोषारोप करण्याची नैतिकता गमावली. भ्रष्टाचारी लॉबीसमोर महाराष्ट सरकार झुकते, हे एकदाचे स्पष्ट झाले. बरे झाले या सरकारने आपला खरा चेहरा स्वत:च दाखविला. कारण सामान्य माणसाचा भ्रमाचा भोपळा फुटला. केंद्रेकर भ्रष्टाचाराच्या खेळात रमणारे अधिकारी नाहीत. ते तेथेही भ्रष्टाचाराची पीच खोदायला लागतील. वास्तविक सरकारने त्यांना एखाद्या आयोगावर नेमून मंत्रालयात वळचणीला टाकायला पाहिजे. कारण ते स्वस्थ बसणारे नाहीत.
 

Web Title: The mask fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.