मराठवाडा हिरवाकंच होणार

By गजानन दिवाण | Published: July 21, 2018 12:21 PM2018-07-21T12:21:37+5:302018-07-21T12:23:30+5:30

वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

Marathwada will be in green | मराठवाडा हिरवाकंच होणार

मराठवाडा हिरवाकंच होणार

Next

कायम दुष्काळाच्या छायेत जगणारा मराठवाडा आगामी काही वर्षांत हिरवाकंच झाला, तर नवल वाटायला नको. तशी जोरदार तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यातील प्रशासनही झपाट्याने कामाला लागले आहे.

राज्यभरात यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मराठवाड्याने एक कोटी ७३ लाख ६४ हजार रोपट्यांची लागवडदेखील केली आहे.

महावृक्षलागवड मोहिमेत पहिल्या टप्प्यात केवळ दहाच दिवसांत मराठवाड्याने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यातही आघाडी आहे ती रेल्वेने पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातूरची. दुष्काळाच्या झळा काय असतात, हे त्यांनीच सर्वाधिक भोगले आहे म्हणून असावे कदाचित. ३३.४६ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना या जिल्ह्याने आतापर्यंत ३५ लाख ५४ हजारांवर रोपांची लागवड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने २७.६८ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना १६ लाख ५६ हजार रोपे लावली आहेत. जालन्याला ३६.२६ लाखांचे उद्दिष्ट असून, १२ लाख ६२ हजार रोपे लावली आहेत. बीड जिल्ह्यात ९७ टक्केवृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने केवळ ३२ टक्के वृक्षलागवड झाली आहे.

वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून १ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीत मराठवाडा उद्दिष्टपूर्ती करणार यात अजिबात शंका नाही. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८८ टक्केरोपे जगली. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ८७ टक्के, हिंगोलीत ८३ टक्केरोपटी जगली.

अन्य जिल्ह्यांत रोपटी जगण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा कमी होते. सर्वात कमी ५४ टक्केरोपटी नांदेड जिल्ह्यात जगली. लागवड केलेली रोपट्यांची संख्या पाहिली, तर हे प्रमाणदेखील अजिबात कमी नाही. एवढी झाडे जगली तरी दुष्काळाची छाप सोडून मराठवाडा हिरवाकंच व्हायला वेळ लागणार नाही. यंदा तर मराठवाड्यात तब्बल अडीच लाख लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे वन विभाग सांगतो आहे.

वन विभागाची अशी आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

Web Title: Marathwada will be in green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.