Marathi | मराठीच

- किशोर पाठक

कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने मराठी पुन्हा ऐरणीवर आली. त्यांच्या आई, पत्नीला मराठीपणातून पाकिस्तानने व्यक्त व्हायला बंदी घातली. ह्याचा देशाने निषेध केला. पुन्हा मराठीचा प्रश्न समोर आला. आपण मराठी किती माणसं आहोत, किती कोटी, त्यातील शिक्षित- सुशिक्षित, म्हणजे मराठी पेपर वाचणारे, लिहिणारे, त्यातून मराठी गद्य लिहिणारे आणि शेवटी कविता लिहिणारे? मराठी भाषा आणि शाळा हा पुन्हा प्रतिष्ठेचा प्रश्न झालाय. प्रत्येक शहरात एक दणकट मराठी शाळा हवीच हवी. जी इंग्रजीचे कथाकथित चटपटीतपण सांभाळून अव्वल दर्जा देईल अशी किमान एक शाळा प्रत्येक शहरात हवी. ज्यांना मराठीचा अभिमान आहे, मायबोलीतून मुलाला शिक्षण ही जाण आहे त्यांच्यासाठी एक दणदणीत शाळा हवी. मराठी मुलं हुशार असतातच. त्यासाठी उदाहरणे देण्याची गरज नाही. हे मराठीपण ठसवायला हवे. आपले व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक सध्या जोरात आहे. जरा शोध घेतला म्हणजे कळते की प्रत्येक लहान लहान तालुका वा मु. पो. मध्येही दर्जेदार कवी आहेत. किमान पन्नास कवी तर गल्लीबोळात आहेत. असे सर्व मराठी कवी एकत्र आले तर काही लाखांमध्ये अंदाज जाईल. ह्या सर्व कवींनी केवळ मराठीत व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना लाईक करीत राहण्यापेक्षा एकत्रित, सामूहिकरीत्या मराठीचे जागरण केले, हंबरडा फोडला तरी मराठीचा व्यवस्थित स्वर जनतेपर्यंत पोहचेल. तो स्वर जनमनात पोचविणे महत्त्वाचे आहे. असे काही कवी एकत्र येऊन आपले सामाजिक, आर्थिक वजन वापरून आपल्या गावात चांगली मराठी शाळा उभारण्यासाठी प्रयत्न केले तर एकाच वेळेस मराठी शिक्षण आणि शाळा दोघांचाही उद्धार होईल, नाहीतर फक्त सातवीपर्यंत मराठी शिकायचे म्हणजे प्रौढ कविता, लेख, गद्य कुणी वाचणार नाहीत. सातवीत मराठी संपलं तर बालकवितांच्या पुढे मुलं जाणार नाहीत. म्हणजे मराठीतलं जाज्वल्य मोठेपण मुलांपर्यंत कसं पोहोचणार, विठ्ठलाच्या पायरीवर दर्शनासाठी डोकं आपटणारा नामदेव आणि अस्सल मराठी मुख्यमंत्र्यांना मराठीच्या जागरणासाठी केलेला आक्रोश सारखाच आहे. आज सन २०१८ मधला पहिला दिवस. तेव्हा नव्या वर्षातील संकल्प प्रत्येकाच्या मनातच आहेत. ते आपण फलद्रूप होतील असा दृढ संकल्प करू या. २०१८ हे वर्ष मराठी पुनरुज्जीवन, संगोपन आणि संवर्धनाचं नवं पर्व ठरणारं घडायला हवं. केवळ निषेध करून प्रश्न सुटणार नाहीत. कठोरपणे मराठीचा वापर करायला हवा. हा २०१८ चा संकल्प.