माणूस आणि प्राण्यांचा संघर्ष नुकसानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:47 AM2018-10-11T02:47:22+5:302018-10-11T02:47:43+5:30

आजघडीला शासकीय पातळीवर वन्यप्राण्यांना महत्त्व आले. मात्र, वन्यप्राणी म्हटले की, नजरेसमोर उभा राहतो तो वाघ. वाघ वगळता उर्वरित आघाड्यांबाबत उदासीनता दिसून येते.

 Man and animal conflict are harmful | माणूस आणि प्राण्यांचा संघर्ष नुकसानकारक

माणूस आणि प्राण्यांचा संघर्ष नुकसानकारक

googlenewsNext

- कौस्तुभ दरवेस 
(वन्यजीव अभ्यासक)

आजघडीला शासकीय पातळीवर वन्यप्राण्यांना महत्त्व आले. मात्र, वन्यप्राणी म्हटले की, नजरेसमोर उभा राहतो तो वाघ.वाघ वगळता उर्वरित आघाड्यांबाबत उदासीनता दिसून येते. वाघ संवर्धनाचा पहिला प्रयोग भारतात १९७२-७३ साली व्याघ्रसंरक्षक जिम कार्बेट यांच्या नावावर सुरू करण्यात आला. मात्र, ४५ वर्षांनंतर वाघांची संख्या समाधानकारक नाही. याला व्याघ्रसंरक्षण प्रकल्पांचे अपयश म्हणावे लागेल.
देशभरात ५० हून अधिक अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्प आहेत. व्याघ्र प्रकल्पांचा उद्देश वाघाचे संवर्धन इतकाच मर्यादित नव्हता. त्याला वाघांचे नाव देत, इतर वन्यजिवांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण व्हावे, या हेतूने प्रकल्पांची निर्मिती सुरू झाली. काझिरंगात व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेंड्यांचे, कर्नाटकला बंदीपूर व्याघ्र प्रकल्पात हत्तींचे, सुंदरबन येथे खाऱ्या पाण्यातील मगरी असो, अथवा मेळघाटमधील रानरेडा अशा वन्यजिवांना व्याघ्र प्रकल्पांनी संजीवनी मिळवून दिली. आययूसीएनतर्फे भारतात आढळणाºया १ हजार २६३ पक्षी प्रजातींपैकी १७२ प्रजाती संकटग्रस्त घोषित करण्यात आल्या. महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५५६ पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. भविष्यात ही यादी कमी होईल, असे वाटत नाही.
इतर वन्यजिवांच्या संवर्धनाची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही. त्यातही ज्या प्रजाती आपल्या देशात प्रदेशनिष्ठ आहेत, जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी केवळ आपल्या देशाची असते. शेकडो वन्य प्राणिपक्षी प्रजाती नष्टप्राय झाल्या असून, पुढे असे होऊ नये, म्हणजेच ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्या नष्ट होऊ नयेत, म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणे जरूरीचे आहे. महाराष्ट्रातील पक्षांच्या नऊ प्रजाती नष्टप्राय श्रेणीत मोडतात. धोकाग्रस्त श्रेणीत महाराष्ट्रातील सात प्रजातींचा अंतर्भाव झाला आहे. संभाव्य संकटग्रस्त या श्रेणीत १८ प्रजाती, तर संकटसमीप श्रेणीत एकूण २८ प्रजाती अंतर्भूत आहेत. शहरीकरणाच्या लाटेवर स्वार असलेल्या महाराष्ट्रात मानव आणि वन्यप्राणी यांचा अधिवासासाठीचा संघर्ष जोर पकडत आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाºया वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. प्राण्यांसाठी संरक्षित भागांतून रस्त्यांची निर्मिती केली गेल्याने घटना वाढत आहेत.
अवैध शिकार, खाद्यासाठी केल्या जाणाºया शिकारी, वन्यप्राण्यांची तस्करीमुळे धोका निर्माण झाला आहे. संघर्षात मानवाचा विजय होतो असे नाही. हल्ल्यात मानवाला प्राण गमवावा लागला आहे. हल्ल्यामुळे वन्यप्राणी संरक्षण कार्यक्रमाची आवश्यकता जाणवत आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्रांची निर्मिती केली पाहिजे. संकटग्रस्त प्रजातींचा विचार केला, तर त्यांच्या संवर्धनासाठी जंगले, माळराने, पाणथळीच्या जागांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मानव आणि वन्यप्राणी हे घटक पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण हिस्सा असून, त्यांनी सहकार्याने राहणे गरजेचे असल्याची जनजागृती गरजेचे आहे. वन्यप्राण्यांचे आणि त्यायोगे पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. कारण लोकसहभागाशिवाय वन्यजिवांचे संरक्षण करता येणे अशक्य आहे. कारण मानव आणि वन्य जीव दोघांकरिता हा संघर्ष जिंकण्याचा नव्हे, जगण्याचा आहे.

Web Title:  Man and animal conflict are harmful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.