आज बुधवार, दि. २७ सप्टेंबर! आज देवीची पूजा करून, देवीसमोर फुलाची सातवी माळ बांधावयाची आहे.
या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. देवी उपासक नवरात्र मोठ्या धूमधडाक्यात साजरी करीत आहेत. आदिशक्ती-निर्मितीशक्तीची उपासना करीत आहेत. नवरात्रातील उपवासही चालू आहेत, तसेच श्री सूक्त पठण आणि श्रीसप्तशती पाठही चालू आहेत. श्री सूक्त हे देवीच्या उपासकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. प्राचीन कालापासून भारत हा शेतीप्रधान देश आहे. आश्विन महिन्यात नवरात्रात शेतातील रोपे पिवळी झालेली असतात. अशा वेळी वारा आला की, त्यावर डोलणारी रोपे म्हणजे सुवर्ण माळच वाटते. धान्यलक्ष्मीचे धनलक्ष्मीत रूपांतर होते. लक्ष्मी म्हणजेच समृद्धी! तिचे वर्णन या श्री सूक्तात केलेले आहे.
ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या अंती श्री सूक्त हे जोडलेले आहे. श्री सूक्त हे तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे. कारण यास्क आणि शौनक यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. श्री सूक्तात एकूण २५ ऋचा आहेत. तसे पाहिले तर प्रत्येक वेदात श्रीसूक्त आहे.
आपण आज देवीसमोर सातवी माळ बांधत असताना, तीन हजार वर्षांपूर्वी रचलेले श्री सूक्त समजून घेऊ या .
श्री सूक्तात म्हटले आहे.
‘हे अग्ने, सोन्यासारखा कांतिमान, मनोहर, सोन्याचांदीच्या माळा घातलेल्या, आल्हाद देणा-या सुवर्णमय अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. हे अग्ने, ज्या लक्ष्मीच्या योगाने मला सुवर्ण, धन, अश्व, गोधन व सेवक आदी संपदा मिळेल, त्या अविनाशी व स्थिर अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. जिच्या मध्यवर्ती रथापुढे घोडे चालत आहेत व हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व समजते, अशा लक्ष्मीदेवीला मी आवाहन करीत आहे. श्री देवी माझ्यावर कृपा कर.
जिच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, जी स्मित हास्य करते, जिचे घर सुवर्णाचे आहे, जी दयाळू, तेजस्वी, संतुष्ट आहे व जी संतोष देते, जिचे वास्तव्य कमळात असते व जिची कांतीही कमळासारखी आहे, अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो.
जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, आल्हाद देणारी, कीर्तिवान, उज्ज्वल आहे. देव जिची सेवा करतात, जी उदार आहे, जी कमल धारण करते, 'ई' असे जिचे बीजरूप आहे, त्या लक्ष्मीला मी शरण आहे. माझे दारिद्र नष्ट होवो, अशी मी तुला प्रार्थना करतो.
सूर्याइतकी तेजस्वी कांती असणाºया हे लक्ष्मी, तुझ्या तपामुळे बेल वृक्षाला ‘वनाचा राजा’ म्हणून मान्यता मिळाली. माझ्या तपाचे फळ म्हणून माझ्या मनातील दैन्य व बाह्य दारिद्र्य दूर होवो. हे लक्ष्मी, कुबेर व मणिभद्र हे माझ्याकडे कीर्तीसह येवोत.
भूक, तहान इत्यादी मलांनी युक्त अशा तुझ्या ज्येष्ठ भगिनीला म्हणजे, अलक्ष्मीला मी नष्ट करतो. हे देवी, अभाव व दारिद्र्य माझ्या घरातून घालवून टाक. सुगंधाने ओळखू येणारी, अपमानित होऊ न शकणारी, नेहमी पुष्ट, तसेच सुपीक व सर्व प्राणिमात्रांवर सत्ता असणारी जी भूमिरूपी लक्ष्मी, तिला मी आवाहन करतो.
हे लक्ष्मी, आमच्या मनातील संकल्प व इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सत्य भाषण करावे, आमचे पशू पुष्ट असावेत. आम्हाला अन्न भरपूर मिळावे व मला कीर्ती मिळावी. हे कर्दमा, तुझ्यामुळे लक्ष्मी वाढली आहे. तू माझ्या शेतात उत्पन्न हो, तसेच कमळांची माळ धारण करणारी संपदाही माझ्या कुळात वास करो. हे जलाशय स्नेह उत्पन्न करोत. हे चिक्लीत नामक लक्ष्मीपुत्रा, तुझ्यापासून होणारा लाभ मला मिळो व माझ्या कुळात लक्ष्मीदेवीचा वास असो.
हे अग्ने, दयाळू व कमळांची माळ धारण करणारी, पुष्करिणीत निवास करणारी, चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी, पिंगट वर्णाची सुवर्णमय, पुष्ट अशा लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. हे अग्ने, सस्ययष्टी हाच जिचा दंड, सुवर्णाची कांती असणारी, दयाळू, सोन्याच्या माळा परिधान केलेली, सूर्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. हे जातवेद अग्ने, त्या अविनाशी स्थिर लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. ती आली की, भरपूर सुवर्ण, गोंधळ, दासदासी, अश्व, इष्टमित्र, सेवक इत्यादी मिळतील.’ या श्री सूक्तात कर्दम म्हणजे कृषितज्ज्ञ कर्दम ऋषी असा अर्थ घेतला जातो. ते माझ्या शेतात आले, तर माझ्या शेतातील उत्पन्न वाढेल. कर्दम म्हणजे चिखल! माझ्या शेतात चिखल झाला, म्हणजेच पाऊस पडला, तर माझ्या शेतांतील धान्योत्पादन वाढेल, असाही अर्थ काढता येतो. नवरात्रात अनेक उपासक श्री सूक्ताचे पठन करतात, परंतु ते म्हणत असताना त्याचा अर्थ नीट जाणून घेतला, तर अधिक चांगले होईल. म्हणून मी येथे श्री सूक्ताचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे.
माणसाचा प्रथम स्वत:वर विश्वास असावयास हवा, मगच तो ईश्वरावर म्हणजेच सृष्टीत असलेल्या चैतन्यावर विश्वास ठेवू शकतो. भक्तीचा जास्त गाजावाजा न करता, ती शांतपणे करीत राहिली, तर मनोबल वाढते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. पायांचा आवाज न करता, जो चालतो, तो दूरपर्यंत चालू शकतो. कोणतीही उपासना रागावून, चिडून, आदळ आपट करीत करू नये. उपासना करीत असताना, नेहमी चेहºयावर हास्य, मनात समाधान आणि वाणीत नम्रता व माधुर्य असावे. केवळ उपासना माणसाला कोणतेही फळ देऊ शकत नाही. प्रथम आपण आपले काम मन लावून, मेहनत घेऊन करावयास हवे. श्रद्धा आणि सबुरीने माणसाला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. भाग्याची दारे ही सर्वत्र आहेत. जिद्दीने प्रामाणिक मेहनत करून, उपासना करणाºयाच्या मार्गात ती लागत असतात. उपासना निर्भयपणे करावी. आपण आनंद आणि सुख देणाºया क्षणांची वाट पाहात राहिलो, तर कायमची वाटच पाहात राहू, पण मिळालेला प्रत्येक क्षण हा जर आनंद आणि सुखात घालविला, तर आपण कायमचे सुखात राहू. आपण समाजात पाहिले, तर एक गोष्ट लक्षात येते ती ही की, जी माणसे नेहमी यशस्वी होतात, ती अडचणीतही संधी शोधत असतात आणि जी माणसे नेहमी अयशस्वी होतात, ती नेहमी संधी आली असता, अडचणी सांगत बसणारी असतात. संधींचा आपण शोध घेतलाच पाहिजे. आपण आज नवरात्रातील सातव्या दिवशी देवीची प्रार्थना करू या.
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ता ।।