किशोरीच्या आत्महत्येमागील वेदना

By सुधीर लंके | Published: September 16, 2018 09:47 AM2018-09-16T09:47:54+5:302018-09-16T10:16:15+5:30

किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे.

Maharashtra Class 11 Girl Allegedly Hangs Herself Over Maratha Quota | किशोरीच्या आत्महत्येमागील वेदना

किशोरीच्या आत्महत्येमागील वेदना

Next

किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे. किशोरी ही अहमदनगर तालुक्यातील कापूरवाडी या खेड्यातील तरुणी. काकडे हे मराठा कुटुंब. किशोरीचे वडील शेतकरी आहेत. ते स्वत: इतिहास विषयातील पदवीधर आहेत. भावासोबत एकत्र राहतात. एकत्र कुटुंब. शेती आणि दूध धंद्यावर हे कुटुंब उदरनिर्वाह करते. किशोरीने आत्महत्या का केली? हे तिच्या कुटुंबाला अगोदर उलगडले नव्हते. पोलिसांनीही ते सांगितले नव्हते. नंतर तिच्या वसतीगृहातील खोलीत चिठ्ठी सापडल्याचे समोर आले. ‘चांगले गुण मिळूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असे किशोरीने त्यात लिहिले आहे.

चिठ्ठीतील तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. तिच्या वडिलांना ही चिठ्ठी पोलिसांकडून वाचायला मिळाली. ‘माझ्या एकटीला एका वर्षासाठी कॉलेजचे शुल्क, वसतीगृहाचे शुल्क, क्लासची फी मिळून ४२ हजार रुपये लागले. घरात माझ्यासह सख्खे-चुलत मिळून सात भावंडे आहेत. एवढ्या भावंडांचा खर्च आमचे कुटुंब कसे करणार?’ असा हिशेब तिने या चिठ्ठीत मांडल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. शेतकºयाच्या मुलीने मांडलेला हा हिशेब अत्यंत वेदनादायी आहे. तो राज्यकर्त्यांनी व समाजधुरिणांनी समजावून घ्यावा असा आहे.
किशोरी ही गुणवान होती. वडिलांनी मुलाला कला शाखेत तर तिला आवर्जून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. कोणत्या मुलाने कशात करिअर करावे याबाबत या घरात स्वातंत्र्य दिसते. तिच्या घरी जाऊन तिचा शालेय संग्रह पाहिला की तिची गुणवत्ता दिसते. ‘धरु नका मुलाची आशा, डोळ्यासमोर ठेवा पी.टी. उषा’ हे तिच्या एका वहितील बोधवाक्य आहे. अगदी चौथीपासूनची शाळेची गुणपत्रके तिने एका फाईलमध्ये व्यवस्थित जतन करुन ठेवली आहेत. ती पाहताना हृदय गलबलते. ‘खेळताना सांघिक भावना आहे’. ‘वाचन, चित्र काढणे व गाणे ऐकणे आवडते’, ‘आपले म्हणणे नेमके व कल्पकतेने मांडते’, हे तिच्याबद्दलचे तिच्या शिक्षकांचे अभिप्राय या गुणपत्रकांमध्ये दिसतात. अनेक बोधकथांची तिने सुबक कात्रण वही केली आहे. त्यात ‘शेतकºयांचे भांडण’ ही देखील एक बोधकथा आहे. चित्रकलेची तिला आवड होती. बैलपोळ्याची अनेक चित्रे तिने काढली होती. आत्महत्येच्या अगोदरच्या दिवशी तिने गावाकडे येऊन बैलपोळा साजरा केला. स्वत: पुरणपोळी केली. बैलांच्या जोडीसोबत फोटो काढला. बैलांसह घरच्या सर्वांना गोडधोड खाऊ घातले व दुसºया दिवशी जगाचा निरोप घेतला. शिवाजी महाराजांची चित्रेही तिने रेखाटली होती. ‘लोकमत’ राजधानी दिल्लीत मराठी भाषेतून सुरु झाला याचे तिलाही अप्रूप होते. आपल्या संग्रहात तिने यादिवसाचा अंक जपून ठेवलेला दिसतो.

किशोरीच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त झाली. असे प्रसंग घडल्यानंतर अशी हळहळ व्यक्त होते. पण, त्याची कारणमीमांसा होत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून ही आत्महत्या झाल्याचे समोर आले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाºयांचा आकडा हा तीसच्या पुढे गेला आहे. आत्महत्या हा आरक्षणावरील पर्याय नाही. कारण, व्यक्तीच राहणार नसेल तर आरक्षणाचा फायदा कोणाला? ही बाब आंदोलकांनी व सरकारनेही तरुणांच्या मनावर बिंबविण्याची आवश्यकता आहे.
दुसरी बाब आहे, सरकारी नितीची. घटनात्मक अडचणींमुळे आरक्षण देता येत नाही असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु किशोरीचा प्रश्न हा महाविद्यालयीन शुल्काचा होता. विनाअनुदान तत्व नसते तर कदाचित तिने हे पाऊल उचलले नसते. अनुदानित-विनाअनुदानित, सरकारी -कंत्राटी असे भेद सरकारने उभे केले आहेत. जातीय भेदांइतकेच हे भेदही समाजाचे शोषण करतात. विनाअनुदानित शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करणाºयाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवावी लागते हे नगर जिल्ह्यातीलच चित्र आहे. विनाअनुदान तत्वाच्या नावाखाली काही संस्था, कॉलेज जो पैसा मिळवितात त्याचा हिशेबही एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. किशोरीचा बळी हा केवळ आरक्षणाचा बळी नाही. तो विनाअनुदान तत्वाचाही बळी आहे. तरुणांमध्ये आज जी मोठी चीड आहे त्याला हे धोरणही कारणीभूत आहे.

विनाअनुदान तत्त्व संपुष्टात आणण्यासाठी कुठलाही घटनात्मक अडसर नाही. ‘विनाअनुदान’ हा एक शब्द काढला तरी मोठा भेदाभेद संपेल. मात्र, या मूळ मुद्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात भेदाची पहिली ठिणगी या भेदाने पडते. खासगी शाळांचे पीक जोमाने बहरते आहे हीही समाजात एक नवी भिंत उभी राहते आहे. कारण अशा शाळा कुणासाठी मर्यादित झाल्या आहेत हे सर्वश्रूत आहे. रयत शिक्षण संस्थेत बहुजन व सर्वसामान्यांची मुले शिकावीत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अपार कष्ट उपसले. या ज्ञानदानाच्या कामासाठी लक्ष्मीबार्इंचे मंगळसूत्र विकले. त्यांच्याच संस्थेतील मुलीने शिक्षणाचा आर्थिक हिशेब मांडत आत्महत्या करावी हे कुणाचे अपयश आहे? कर्मवीरांचा वारसा सांगणाºया सर्वांनीच याबाबत चिंतीत व्हायला हवे. किशोरी ही शेतकरी व सर्वच गरीब वर्गाचे भांडण कोणाशी आहे हे सांगून गेली. ही आत्महत्या शिक्षणक्षेत्राच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

(लेखक हे ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत)

Web Title: Maharashtra Class 11 Girl Allegedly Hangs Herself Over Maratha Quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.