खाकीतील नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:29 AM2018-01-18T03:29:03+5:302018-01-18T03:29:13+5:30

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत

Madness in khaki | खाकीतील नराधम

खाकीतील नराधम

googlenewsNext

खाकी वर्दीवाले पूर्वीसारखा दरारा अथवा आदर केव्हाच गमावून बसले आहेत. हप्तावसुली, गुन्हेगारांना संरक्षण, सर्वसामान्यांना विनाकारण वेठीस धरणे हे प्रकार पोलिसांकडून सर्रास सुरु आहेत. भ्रष्टाचारात तर हा विभाग राज्यात अव्वल आहे. काही लोकांच्या या प्रतापांमुळे आधीच बदनाम झालेल्या पोलीस खात्याची अब्रू पुरती चव्हाट्यावर आणण्याचे काम नागपुरातील एका पोलीस शिपायाने केले आहे. या नराधमाने पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा चीड आणणारा आणि तेवढाच लज्जास्पद प्रकार नागपुरातील सोनेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसाची वर्दी घातली की आम्हाला कुठेही, काहीही करण्याचा, कसेही वागण्याचा जणू परवानाच मिळाला आहे, अशा अविर्भावात पोलीस खात्यातील काही लोक समाजात वावरत असतात. भररस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणे, चौकाचौकात अड्डे जमवून वाहनचालकांना वेठीस धरणे या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. कालपरवा तर एका पोलीस कॉन्स्टेबलने जिल्हा न्यायालयातील एका अधिकाºयालाच मारहाण केली. आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षक नाही याचेही भान त्यांना बरेचदा राहात नाही,अशी परिस्थिती आहे. ही एकप्रकारची पोलिसी गुंडागर्दीच म्हणायला हवी. एका असहाय महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून, तिच्या बाळाला मारण्याची धमकी देऊन बळजबरी करण्याचे धाडस एक पोलीस शिपाई करतोच कसा? त्याच्यावर कुणाचाच वचक नाही काय? की पोलीस खात्यात आता असा वचक ठेवणारे अधिकारीच राहिले नाहीत. अशा नराधमास मग तो पोलीस असला तरी कठोर शिक्षा व्हायलाच हवी. सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जायला आधीच घाबरतात आणि अशा घटनांमुळे त्यांची ही भीती आणखी वाढते. एकीकडे शासनातर्फे पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: महिलांना पोलीस ठाणे म्हणजे आपले माहेर वाटावे या दृष्टीने त्यांच्या मदतीकरिता वेळोवेळी कार्यपद्धतीत योग्य ते बदल तसेच सुधारणा केल्या जातात. पण असे बेपर्वा पोलीसवाले शासनाच्या या प्रयत्नांवर पाणी फेरतात. त्यामुळे खाकी वर्दीतील या गुन्हेगारांना कोण लगाम घालणार असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. खरे तर पोलिसांमधील ही वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यासाठी वेळप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यासही हरकत नाही. आपण जनतेचे रक्षक आहोत ही भावना प्रत्येक पोलिसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

Web Title: Madness in khaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस