निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

By सुधीर लंके | Published: September 20, 2018 01:30 PM2018-09-20T13:30:57+5:302018-09-20T13:32:11+5:30

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्या राजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला.

Loyal and moderate Shivajirao Nagavade | निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

googlenewsNext

- सुधीर लंके 

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्याराजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला. जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी हयातभर एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन तत्वनिष्ठपणे काम केले त्यात नागवडे यांचा उल्लेख सातत्याने होत राहील. 

डोळ्यावर काळा चष्मा, स्वच्छ पांढरे कपडे असे नागवडे यांचे राहणीमान होते. मितभाषी आणि शांत. दूरध्वनी केल्यावरही शांतपणे बोलायला सुरुवात करायचे. कधीही कोणावर जहरी टीका केली नाही. जे काही बोलायचे ते विरोधकांचाही सन्मान राखत. लोकशाही मार्गाने. 

नागवडे मूळचे कम्युनिष्ट. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये आले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार क्षेत्रात ते पारंगत असल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे स्वत: त्यांची अनेकदा मदत घेत. राज्यात कारखानदारीत कोठे काही समस्या आली की वसंतदादा नागवडेंकडे ती समस्या सोपवत. त्यांचा या क्षेत्रात अधिकार असल्यानेच राज्य साखर संघाचे नेतृत्वही त्यांच्याकडे दिले गेले. शरद पवार यांनीही त्यांचे हे नेतृत्व मान्य केले. नागवडे हे वसंतदादा समर्थक म्हणून ओळखले जात. वसंतदादांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. विलासराव देशमुख यांच्यासोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 

काँग्रेसचे राजकारण सुरु केल्यानंतर हयातभर ते काँग्रेसचे पाईक राहिले. १९७८ साली त्यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. जनता दलाचे मोहन गाडे व नागवडे यांच्यात हा मुकाबला झाला.  त्यावेळी नागवडे प्रथम विधानसभेत पोहोचले. पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात नागवडे-पाचपुते हा संघर्ष पहायला मिळाला. विरोधकांचा ‘शंभर टक्के’ बंदोबस्त करायचा अशी प्रस्थापित राजकारण्यांची एक पद्धत असते. नागवडे त्यास अपवाद होते. त्यांनी कधीही विरोधकांवर टोकाची टीका केली नाही. सातत्याने सुसंस्कृतपणा जपला. पाचपुते बोलके व नागवडे मितभाषी असा हा राजकीय मुकाबला होता. पण, न बोलताही नागवडे यांनी आपला जनाधार कोसळू दिला नाही. १९९९ ला नागवडे पुन्हा आमदार झाले. चार वेळा विधानसभांना ते पराभूत झाले. 

१९९१ साली विखे-गडाख ही निवडणूक देशभर गाजली होती. यावेळी नागवडे हे गडाखांच्या रुपाने काँग्रेससोबत राहिले. काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणात नागवडे हे थोरात गटाचे समर्थक होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी बंडखोरी करत भाजपकडून विधानसभा लढवली. पण, त्यावेळीही नागवडे यांनी काँग्रेस सोडली नाही. 

वांगदरी हे त्यांचे गाव. तेथील सरपंच ते आमदार व सहकारातील मोठा नेता असा प्रवास त्यांनी केला. तालुक्यात शिक्षणसंस्थाही उभारल्या. खेडोपाडी शिक्षण व तंत्रशिक्षण संस्था पोहोचल्या पाहिजेत हे वसंतदादा पाटील यांचे स्वप्न होते. त्यातून नागवडे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु केले. केजी ते पीजीच्या शिक्षणसंस्था उभारल्या. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या हयातीतच कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय सभासदांनी घेतला. विद्यमान जिल्हा परिषदेत त्यांच्या सुनबाई महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. नागवडे परिवाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाईल, असे अनेकांना वाटत होते. पण, काँग्रेसच्या राजकारणात ती संधी त्यांना मिळाली नाही. नागवडे यांनी काँग्रेसमध्ये आयुष्य घातले. त्या तुलनेत पक्षाने त्यांचा योग्य सन्मान राखला नाही. 

विधानपरिषद किंवा इतर ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करता येणे शक्य होते. परंतु बदललेल्या कॉंग्रेस संस्कृतीत नागवडे दुर्लक्षित राहिले. नागवडे यांनी स्वत:हून त्यासाठी कधी लुडबूड केली नाही. २०१४ च्या निवडणुकीत सहमतीच्या राजकारणात राहुल जगताप यांच्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा दिलदारपणा नागवडे यांनी दाखविला होता. जगताप यांच्या विजयात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ‘बापू’ नावाने परिचित असलेले नागवडे हे जुन्या काँग्रेस नेत्यांच्या शृंखलेतील एक महत्त्वाचे केंद्र होते. ‘बापू’ नावाप्रमाणेच ते शांत व संयमी होते.

लेखक अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत. 

Web Title: Loyal and moderate Shivajirao Nagavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.