प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं..!

By अतुल कुलकर्णी | Published: April 11, 2018 04:00 AM2018-04-11T04:00:25+5:302018-04-11T04:00:25+5:30

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...

Love is in the chair ..! | प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं..!

प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं..!

googlenewsNext

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...

प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणि
खुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं!
तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !!

आमच्या पक्षात कावळा, साप, मुंगूस,
कुत्रा असं काहीही म्हणत प्रेम करता येतं;
कितीही चुकलो आम्ही, तरीही
खुर्चीवरच प्रेम करता येतं...!
पाच वर्षं सरली की अंगात घुमू लागतात,
जागेपणी पुन्हा एकदा खुर्चीचे झोपाळे;
मनामध्ये झुलू लगतात !

आठवतं ना? तुमची पाच जेव्हा सरली होती, खुर्ची तुमची कशी घामाने भरली होती !
जाती पातीच्या लाटांवर बेभान होऊन
नाचला होतात तुम्ही,
खुर्ची तुमची बुडता बुडता
वाचला होतात तुम्ही!
बुडली होती खुर्ची तुमची,
अजून तुम्हाला वळत नाही,
खुर्चीच्या स्वप्नावाचून दिवस तुमचा
सरता सरत नाही...!
तुम्हालाही ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !
कारण
प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं
खुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!
तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !

आम्ही खुर्चीसाठी भांडत नाही
असं म्हणणारी माणसं झूट असतात,
खुर्चीसाठीच झुरणारी माणसंच
खरी सच्ची असतात...

असाच एक जण मला म्हणाला,
आम्ही कधी खुर्चीसाठी काम केलं नाही,
पाच वेळा निवडून आलो तरी
खुर्चीवर प्रेमबिम केलं नाही !
आमचं काही नडलं का?
खुर्चीशिवाय अडलं का?
तो खरं तर खोटं बोलत होता...
खुर्चीसाठीच तो आतून तळमळत होता...
तेव्हा मी लगेच त्याला म्हटलं,
प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणि
खुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं...!
तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !

खुर्चीसाठी गाजराचं थाटावं लागतं दुकान
अच्छे दिन आणि जुमल्यांचं
खोटं खोटं बांधावं लागत मकान...
भर दुपारी उन्हात कधी
खुर्चीसाठी फिरावं लागतं...
मनात आमच्या खुर्ची नाही
असंच सतत सांगावं लागतं...
खुर्चीसाठी कधी कधी रुसणं असतं,
खुर्चीशिवाय जगणं सगळं व्यर्थ असतं...
खुर्ची आहे तर आम्ही असतो,
खुर्ची नसेल आम्ही कुठेच नसतो...
जनतेसाठी लढतोय आम्ही,
असं सांगावं लागतं... पण,
प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं
खुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!
तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !
 

Web Title: Love is in the chair ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.