लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:01 PM2019-05-24T17:01:48+5:302019-05-24T17:06:44+5:30

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.

Lok Sabha Election Results 2019 congress ncps motive completely failed in maharashtra says shiv sena | लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

Next

- आ. डॉ. नीलम गोऱ्हे

उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. भारतात रालोआ व महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या जागा चांगल्या संख्येने निवडून येतील, हा आमचा आत्मविश्वास होता. सरकारचे घटक म्हणून आम्ही शेतकरी कर्जमुक्ती व्हावी, भूसंपादनाचे विधेयक लोकाभिमुख व्हावे, जीएसटीचा परतावा महापालिकांना थेट अगोदरच मिळावा, महाराष्ट्र अखंड राहावा, नाणार प्रकल्प रद्द व्हावा यासाठी जाहीर भूमिका सर्व सदनांत घेतली. त्यासाठी शिवसेनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये पाठपुरावा केला. आमच्या वैचारिक मतभेदांना काहींनी भांडण हे नाव दिले. परंतु शिवसेनेची भूमिका पोटात एक व ओठात एक कधीच नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवरचे मतभेद सर्व व्यासपीठांवर व प्रत्यक्ष संवादातून मांडत होते, परंतु त्यांनी युतीत मतभेद झाले तरी मनभेद होऊ दिले नाहीत.



शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात थेट मदत व सेवा करण्यातही शिवसेना जनतेसोबत राहिली. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांसाठी शिवसेनेने अनेक सेवाभावी योजना केल्या. उदा. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, गुरांसाठी पशुखाद्य यासोबतच आमदार-खासदारांनी महिन्याचे मानधनही दुष्काळ मदतसेवेसाठी दिले. याबाबत समाजात सकारात्मक भूमिका दिसून आली व शिवसेनेची विश्वासार्हता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणजे सरकारमधील दोन्ही घटकांची परत एकदा युती झाली, हे मतदारांनी स्वीकारले.



उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. महाराष्ट्रात तर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने कशाबशा दोन जागा राखल्या व दोन जागा फोडाफोडीने निवडून आणल्या. धाराशिव, परभणी, मुंबईच्या तीन जागा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, यवतमाळ, बुलडाणा, मावळ, नाशिक यासोबतच कोल्हापूर, हातकणंगले व पालघर या नव्या जागा मिळविल्या. एका अर्थाने कोल्हापूरच्या अंबाबाई व तुळजापूरच्या आदिशक्तीने हा आशीर्वादच दिला, असे मला वाटते. विचार म्हणून देशहित, महाराष्ट्र विकास, राजकीय विश्वासार्हता, कार्यकर्त्यांचे परिश्रम या घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून आला. जनतेचा हा विश्वास व प्रेम पाहिले तर विधानसभेतही युती राहील असे वाटते. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता परत मिळलेल्या या संधीतून जनतेला अधिक विश्वास व न्याय देण्याचा संकल्प आजच करणे योग्य राहील.

(लेखिका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या आहेत)
 

Web Title: Lok Sabha Election Results 2019 congress ncps motive completely failed in maharashtra says shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.