चला हुंड्याला बदनाम करूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:44 PM2019-03-08T22:44:07+5:302019-03-08T22:44:31+5:30

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले.

Let's defame the dowry ... | चला हुंड्याला बदनाम करूया...

चला हुंड्याला बदनाम करूया...

Next

- धर्मराज हल्लाळे

एकीकडे स्त्री सन्मानाचे, समतेचे बोलायचे अन् दुसरीकडे समताधिष्ठित समाजरचनेला सुरूंग लावायचा. ही दुहेरी नीती परंपरेने चालत आली आहे. अशाच कुप्रथा परंपरांनी स्त्रीला प्रदीर्घ काळ कोंडवून ठेवले. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व क्षेत्रात मुलींनी, महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे़ तरीही समाजातील दुय्यम वागणूक सर्वार्थाने दूर झालेली नाही. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या कार्याचा, शौर्याचा गौरव होतो. परंतु, आजही हुंड्यासारख्या कुप्रथा पूर्णत: हद्दपार होत नाहीत. त्यामुळे महिलांचा सन्मान हा कृतिशील असला पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात शेतकरी आत्महत्या हा गंभीर आणि तितकाच चिंतेचा विषय आहे.  मराठवाड्यातील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना भेट दिल्यानंतर निश्चितच शेतीप्रश्न हे आत्महत्याच्या मुळाशी असल्याचे समोर येते़ परंतु, अनेकदा सामाजिक प्रतिष्ठा, मुलीचे विवाह आणि कर्ज हे दुष्टचक्र दिसून येते. आधीच दुष्काळाची स्थिती त्यात मुलीचे लग्न हे पित्याला ओझे वाटू लागते. एकीकडे आत्महत्या करून स्वत:ची सुटका करून घेणारे काहीजण तर बहुतांश लोक कर्जाच्या ओझ्याखाली संपूर्ण आयुष्य काढतात. महिला दिनी हा प्रश्न मनाला नक्कीच सतावतो, कारण आजही मुलगी आणि तिचे लग्न हे तिच्या कुटुंबियांसमोर प्रश्न म्हणून उभे राहते. खरे तर मुलीचा विवाह हा आनंदाचा क्षण असायला हवा. मात्र हुंड्याच्या ओझ्यामुळे समाजात एक मोठा वर्ग दडपणाखाली जीवन जगतो. नक्कीच आज उघडपणे हुंड्यावर बोलले जात नाही़ तो गुपचूप केला जाणारा व्यवहार आहे. तरीही ग्रामीण भागात हुंडा किती घेतला यावर घेणा-याची प्रतिष्ठा सांगितली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. आनंदाने ऐपत असताना एकमेकांना भेटवस्तू दिली जात असेल अथवा मदत केली जात असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण जेव्हा मुलीच्या पित्याला अनिवार्यपणे वर पक्षाला हुंडा द्यावा लागतो, तेव्हा ते एक प्रकारे शोषण असते. आश्चर्य म्हणजे अनेक जण निर्लज्जपणे बोली लावतात. कित्येक प्रकरणात सोयरिक मोडली जाते. विवाहाच्या दिवशीसुद्धा हुंड्यासाठी अडून बसणारे महाभाग कमी नाहीत. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात जनजागरण झाल्यामुळे येणा-या काळात सकारात्मक बदल होतील. तूर्त अनेक समाजात मुलींची संख्या चिंतेचा विषय आहे. अशा वेळी काही ठिकाणी हुंड्याची स्थिती उलट्या दिशेने जाणारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शोषण करून देण्याघेण्याचा जो व्यवहार होतो तो सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा ठरतो.
मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेतला असता अनेक कारणांपैकी मुलींचे विवाह हे कारणसुद्धा नमूद केले जाते. एकीकडे हुंडा तर दुसरीकडे मुलगीच पित्याला ओढे वाटू लागल्यामुळे बालविवाह सुद्धा घडतात. केवळ त्याच्या तक्रारी होत नाहीत, इतकेच. एका सामाजिक प्रश्नांमधून दुसरे गंभीर प्रश्न जन्म घेतात नेमके तेच हुंडा या कुप्रथेतून दिसते. मुळातच हुंडा घेणे ही मानसिकता स्त्रीचे अस्तित्व नाकारणारी आहे. ती आज कोणत्याही बाजूने मुलांपेक्षा कमी नाही. कुटुंबच नव्हे तर समाज उभारणीत स्त्रियांचा वाटा मोलाचा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग इतकेच नव्हे संरक्षण क्षेत्रातही महिलांनी सक्षमपणे पाऊल ठेवले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस ८ मार्च असला, तरी सातत्याने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यासाठी कधीकाळी प्रतिष्ठेचा विषय केला जाणारा हुंडा बदनाम केला पाहिजे़ आज कायद्याने प्रतिबंध केला असला, तरी कौटुंबिक समारंभात उघडपणे देणे-घेणे सुरू असते. अशावेळी जागतिक पातळीवरील समतेचे बोलत असताना आपण आपल्या घरापासून आणि स्वत:पासून सुरूवात केली पाहिजे. त्यासाठीच चला हुंड्याला बदनाम करूया, ही मोहीम राबविण्याची गरज आहे.

Web Title: Let's defame the dowry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dowryहुंडा