प्रल्हाद जाधवमदतीला धावून जाणे हे माणसाच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. अशा मदतीच्या शेकडो कथा रोज कानी पडत असतात. पण खऱ्या अर्थाने मदत ही सोपी गोष्ट नाही. मदतीला धावून जाताना आपण त्यात काही निवड करत आहोत का, त्यात माझे तुझे करत आहोत का, सोपा मार्ग निवडत आहोत का, त्यामागे आपला काही छुपा हेतू आहे का, मदत अनिच्छेने करतोय का, कुणाच्या दडपणाखाली करतोय का, निर्भेळ आनंदाने करतोय का, यासारखे कितीतरी प्रश्न पडतात आणि तिथे आपल्या तथाकथित मदतकार्याचे पितळ उघडे पडते. सामान्यपणे माणूस जगताना सोपा रस्ता धरतो. कमी श्रमात अधिक लाभ मिळावा, अशी मनीषा बाळगतो. अभ्यास हा शिकण्यासाठी नाही तर परीक्षेत पास होण्यासाठी आहे, अशी त्याची धारणा असते. हा विचार आयुष्यभर त्याला जगण्याच्या उथळ पातळीवर ठेवतो. खोलात जाऊन जीवन समजून घेणे आणि सार्थकी लावणे त्याला आवश्यक वाटत नाही. कधीतरी वाढदिवसाला अनाथाश्रमातील मुलांना जेवण देणे किंवा कधीतरी एखाद्या पुनर्वसन संस्थेस डोनेशन पाठवून मोकळे होणे यात अनेकजण धन्यता मानतात. वर या दातृत्वाचे मार्केटिंग करून त्याचा वापर स्वत:च्या प्रतिमावर्धनासाठी करून घेतात, याला खरेच मदत किंवा सेवा म्हणता येईल का? उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये असे म्हणतात; पण वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळे वाटायला जाताना सोबत फोटोग्राफर घेऊन जाण्याची प्रथा अनेकांनी सुरू केली आहे. त्यात कुणाला काही काही गैरही वाटत नाही. माणसाच्या संवेदना बधिर करणारे असे अनेक बदल व्यवहारात आले आहेत. त्या गुंगीत जगणे धन्यतेचे लक्षण ठरले आहे. शब्दांचे अर्थ बदलत आहेत. मदत ही दुसऱ्यासाठी नसून स्वत:च्या फायद्यासाठी करायची गोष्ट, असा नवा अर्थ उदयाला येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, एखाद्याने स्वत:च्या जगण्याचे मोल देऊन एखाद्याचा जीव वाचवल्याची घटना कानी येते तेव्हा मदत हा शब्द अमृतात भिजून समोर उभा आहे असे वाटते. स्वप्नात दिलेले वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र, मृत्यूशय्येवरही आपला सोन्याचा दात याचकाला देणारा कर्ण किंवा महारोग्याच्या जखमा कोणताही किंतू मनात न ठेवता साफसूफ करणारे बाबा आमटे आपल्या कृतीने वचन, दातृत्व, सेवा, यासारख्या शब्दांना नवा अर्थ देऊन जातात, हा एक दिलासा आहे. विंदांनी एका कवितेत म्हटले आहे ते लक्षात ठेवण्यासारखे आहे -
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढून देताना...