कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

By रवी टाले | Published: July 19, 2019 02:19 PM2019-07-19T14:19:51+5:302019-07-19T14:27:42+5:30

कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला पुन्हा एकदा स्थगिती मिळाल्याने भारतात आनंद व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी, लढाई अद्याप संपलेली नाही.

Kulbhushan Jadhav: The battle is not over! | कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे सगळेच मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केल्यामुळे भारतासाठी हा नक्कीच मोठा नैतिक विजय आहे. जाधव यांनी बनावट पारपत्रावर पाकिस्तानात प्रवेश केल्याचा युक्तिवाद पाकिस्तानतर्फे करण्यात आला. जाधव पाकिस्तानात हेरगिरीच्या उद्देशाने अनधिकृतरित्या शिरल्याचा पाकिस्तानचा दावा खोडून काढणे शक्य होणार नाही.

कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल बुधवारी लागला. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील एखाद्या प्रकरणात भारतामध्ये निकालासंदर्भात एवढी उत्सुकता असण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. तमाम भारतीयांच्या अपेक्षेनुरुप कुलभुषण जाधव यांची मृत्युदंडाची शिक्षा तूर्त टळली आहे. स्वाभाविकत: भारतात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. हा भारताचा विजय अन् पाकिस्तानचा पराभव असल्याच्या आशयाच्या प्रतिक्रिया भारतात उमटत आहेत. गंमत म्हणजे पाकिस्तानातही आंतरराष्ट्रीय न्यायालनाने दिलेला निकाल हा त्यांचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
भारताच्या वतीने युक्तिवादादरम्यान मांडण्यात आलेले सगळेच मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केल्यामुळे भारतासाठी हा नक्कीच मोठा नैतिक विजय आहे; मात्र त्याचा अर्थ कुलभुषण जाधव यांच्यावरील संकट पूर्णपणे टळले असाही नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांची सुटका करून त्यांना भारताकडे सोपविण्याचा आदेश न दिल्याने पाकिस्तान हा त्यांचा विजय असल्याचे मानत आहे.
कुलभुषण जाधव यांना राजनैतिक मुत्सद्याशी संपर्क (कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस) न करू देऊन, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग केला असल्याचा भारताचा युक्तिवाद आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केला आहे आणि पाकिस्तानला जाधव प्रकरणी नव्याने निष्पक्षपणे खटला चालविण्याचा आदेश दिला आहे. जाधव हे भारतीय हेर असल्यावर पाकिस्तानने संपूर्ण युक्तिवादादरम्यान भर दिला. दुसरीकडे जाधव यांना (कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस) न देण्यामागे, जाधव यांनी बनावट पारपत्रावर पाकिस्तानात प्रवेश केल्याचा आणि त्यामुळे त्यांची राष्ट्रीयता संदिग्ध असल्याचाही युक्तिवाद पाकिस्तानतर्फे करण्यात आला. हे दोन्ही मुद्दे परस्परविरोधी आहेत. जर जाधव भारतीय हेर असल्याची पाकिस्तानला खात्री आहे, तर त्यांची राष्ट्रीयता संदिग्ध कशी आणि जर त्यांच्या राष्ट्रीयतेविषयी पाकिस्तानला एवढीच खात्री आहे, तर मग त्यांना (कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला? पाकिस्तानची ही जुनी खोड आहे. खोटे बोल अन् रेटून बोल हा त्या देशाचा खाक्या एव्हाना आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुपरिचित झाला आहे.
कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला पुन्हा एकदा स्थगिती मिळाल्याने भारतात आनंद व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी, लढाई अद्याप संपलेली नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कुलभुषण जाधव यांचा खटला नव्याने चालणार असला तरी, तो पाकिस्तानात, पाकिस्तानच्याच कायद्यानुसार आणि पाकिस्तानातील न्यायालयीन प्रक्रियेनुसारच चालणार आहे! फरक पडला आहे तो केवळ एवढाच, की पाकिस्तान आता भारतीय मुत्सद्यांना जाधव यांची भेट घेण्यापासून रोखू शकणार नाही आणि व्हिएन्ना करारानुसार कैद्याचे जे मुलभूत अधिकार मान्य करण्यात आले आहेत, त्यांचे पालन पाकिस्तानला करावे लागेल. त्याशिवाय जाधव यांना त्यांच्या मर्जीनुसार वकील निवडण्याचीही मुभा असेल.
आता प्रश्न हा निर्माण होतो, की जाधव यांची पाकिस्तानच्या कैदेतून सुटका होण्याचा काही मार्ग आहे का? त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आल्याचा भारताचा दावा न्यायालयात सिद्ध करणे! हे काम सोपे नाही. त्यासाठी सगळ्यात आधी तर हे सिद्ध करावे लागेल, की जाधव इराणमध्ये होते. ते इराणमध्ये काय करीत होते, या प्रश्नाचेही उत्तर द्यावे लागेल. त्यांनी इराणमध्ये अधिकृत पारपत्रावर प्रवेश केला होता, की बनावट पारपत्रावर हा प्रश्नदेखील उपस्थित होईल. त्याचेही समाधानकारक उत्तर द्यावे लागेल. इराणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही. शिवाय केवळ तेवढ्याने जाधव पाकिस्तानात हेरगिरीच्या उद्देशाने अनधिकृतरित्या शिरल्याचा पाकिस्तानचा दावा खोडून काढणे शक्य होणार नाही.
कुलभुषण जाधव यांचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने इराणमधून अपहरण केल्याचा दावा बचाव पक्ष सिद्ध न करू शकल्यास, जाधव यांनी पाकिस्तानात हेरगिरी अथवा घातपाताच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे सरकारी पक्ष सहज सिद्ध करून दाखवू शकेल. त्यासाठी वाट्टेल तसे बनावट पुरावे निर्माण केले जातील आणि न्यायालयापुढे सादर केले जातील. मग न्यायालय पाकिस्तानी कायद्यानुसार ज्या शिक्षेची अनुमती असेल ती शिक्षा ठोठवायला मोकळे असेल. ती शिक्षा कोणती असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय न्यायालयदेखील काही करू शकणार नाही.
जाधव यांचे इराणमधून अपहरण झाल्याचे सिद्ध करण्याव्यतिरिक्त त्यांच्या सुटकेचा आणखी एक मार्ग पाकिस्तानने स्वत:च सुचविला असल्याची माहिती समोर आली आहे. जाधव हेर असल्याचे आणि पाकिस्तानात दहशतवादी कृत्ये घडविण्यात लिप्त असल्याचे भारताने मान्य करावे, हा तो मार्ग! पाकिस्तान हे दहशतवाद प्रायोजित करणारे राष्ट्र असल्याच्या भारताच्या प्रचारातील हवा काढण्यासाठी, भारतही तेच करीत असल्याचा दावा पाकिस्तान गत काही काळापासून करीत आहे. आतापर्यंत तरी जगात कुणीही त्यावर विश्वास ठेवलेला नाही; मात्र भारताने स्वत:च जाधव दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असल्याचे मान्य केल्यास, पाकिस्तानला जगभर भारताच्या विरोधात बोंब ठोकण्याची संधी मिळेल. अर्थात भारताद्वारा पाकिस्तानची ही मागणी मान्य केली जाण्याची सुतराम शक्यता नाही.
पाकिस्तानची सध्याची नाजूक आर्थिक परिस्थिती हादेखील जाधव यांची सुटका करून घेण्याचा एक मार्ग असू शकतो. आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी भारतासोबत वाटाघाटी सुरू करण्याकरिता पाकिस्तान गत काही काळापासून तडफडत आहे. दहशतवादाच्या मुद्यावरील आपल्या भूमिकेशी तडजोड न करता, पाकिस्तानच्या या मजबुरीच्या लाभ जाधव यांना कसा मिळवून देता येईल, या दृष्टीने भारताने प्रयत्न करायला हवे.
थोडक्यात, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे जाधव यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यास तूर्त आळा बसला असला तरी, लढाई अद्याप संपलेली नाही. किंबहुना खरी लढाई समोरच आहे!

- रवी टाले                                                                                                  

ravi.tale@lokmat.com

Web Title: Kulbhushan Jadhav: The battle is not over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.