ज्ञानसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:03 AM2018-04-20T00:03:09+5:302018-04-20T00:03:09+5:30

अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते.

Knowledge Resources | ज्ञानसंपदा

ज्ञानसंपदा

googlenewsNext

प्रा. डॉ. संदीप ताटेवार
आज व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, गॅजेट्स यांचा वापर करणारे समाजात मोठ्या प्रमाणात लोक आढळतात. काहीतर अक्षरश: त्याचे व्यसनाधीन झाले आहेत. याद्वारे आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास माहितीचा भडीमार आपल्यावर होत असतो. आपल्याला मिळणारी माहिती ही आपल्या आत्म्याचे अन्न असते. अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे सात्विक अन्न जे आपल्या शरीराची ताकद वाढविते व दुसरे म्हणजे तामसिक अन्न जे आपली ताकद कमी करते. ज्या माहितीमुळे आपली सकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनविते मात्र ज्या माहितीमुळे आपली नकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला कमजोर बनविते. आपण आपल्या शरीराची ताकद वाढविण्याबाबत जागरुक असतो पण आत्म्याची ताकद वाढविण्याबाबत जागरुक नसतो. आपण एकदा माहिती वाचली की त्याचे मनात चिंतन चालू होते व ती आपल्या मनात शिरकाव करून आपल्या मनाचा भाग बनते मग आपल्याला त्याला मनापासून वेगळे करणे कठीण होते. म्हणूनच फक्त चांगली माहिती ग्रहण करणे अत्यावश्यक असते. एखाद्या भोजन समारंभासाठी आपण गेलो तर विविध जिन्नस आपल्यासाठी उपलब्ध असतात मात्र कोणते खायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. तसेच उपलब्ध माहितीपैकी कोणती माहिती आपण वाचायची व वाचायची नाही हे आपल्या हातात असते. जी माहिती आपल्याशी संबंधित नसते व बरेचदा ज्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही अशी माहिती आपण वाचत गेलो की उगाचच विचारांची गर्दी आपल्या मनात निर्माण होत असते. आपण चांगली माहिती ग्रहण केली की आपले विचार प्रगल्भ होतात, आत्म्याची शक्ती वाढते व आपोआप चांगले कर्म उदयास येतात. नकारात्मक माहितीमुळे मनात उदासिनता, उद्विग्नता, वासना, क्रोध, इर्षा, मत्सर असे दुर्गुण जागृत होतात तर सकारात्मक माहितीमुळे प्रेम, आनंद, जिव्हाळा असे सद्गुण जागृत होतात. स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ते आपल्या विचारामुळेच शक्य होत असते म्हणूनच चांगले विचार निर्माण करायचे असेल तर चांगलीच माहिती आपल्या मनाला भरवावी लागेल.त्यामुळे आपली आध्यात्मिक व भौतिक स्तरावर प्रगती होईल. यासाठीच ज्ञानसंपदा ही पवित्र असायला पाहिजे म्हणजे आपले अज्ञान, आसक्ती, दु:ख लोप पावतील व आपले दोष क्षीण होऊन आपण आत्मज्ञानाचा साधक बनू शकू !

Web Title: Knowledge Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.