From kirtan and inside ... | वरून कीर्तन अन् आतून....

- नंदकिशोर पाटील
भूत जबर मोठं ग बाई
झाली झडपड करू गत काई ।।
सूप चाटून केले देवऋषी,
या भूताने धरिली केशी।।
लिंबू नारळ कोंबडा उतारा
त्या भूताने धरिला थारा।।
मंडळी आज निरुपणाला नाथबाबांचे (संत एकनाथ) भारुड घेतले म्हणून चकित होऊ नका. आम्हांस ठाऊक आहे की, कीर्तन परंपरेनुसार नामस्मरणानंतर अभंग घेण्याची प्रथा आहे. पण नाथषष्ठी येऊ घातली आहेच. शिवाय, आजचा प्रसंगही तसा बाका आहे. काल आम्ही जळगावी होतो. नाथाभाऊंचा सध्या तिथं हरिनाम सप्ताह सुरू आहे. अनेक संत-महंत येऊन हजेरी लावत आहेत. म्हटलं आपणही पायधूळ झाडून यावी. ज्या नाथाभाऊंनी खान्देशात भाजपधर्माचा पाया रचिला त्यांना पक्षाने किंकरासारखे बाजूला सारिले म्हणून काय झाले? आपल्या खान्देशी संप्रदायाची पताका त्यांनी अजून खाली ठेवलेली नाही बरं का! नाथाभाऊंच्या हरिनाम सप्ताहासाठी राष्टÑवादी सेवा संस्थानचे ह.भ. अजित (बुवा) बारामतीकर देखील आले होते. सर्वांसमक्ष त्यांनी नाथाभाऊंना आलिंगन दिलं. आहाहा! काय तो दुर्मीळ क्षण! हल्ली अशा संतभेटी होतात कुठे महाराज? म्हणून तो क्षण याचि डोळा, याचि मोबाईल साठविण्याची संधी आम्ही दवडली नाही. आम्ही धन्य जाहलो! वस्तुत: दादा-भाऊंच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते. पण थोरामोठ्यांची बातच निराळी. आपल्या कानगोष्टींची त्यांनी कुणाला कानोकानी खबर लागू दिली नाही महाराज! तेही सहाजिकच म्हणा. ‘सत्तेविना स्वारी, मन रमेना संसारी’ असं जगजाहीर कसं सांगणार?
अनुभवातून माणंस शहाणी होतात महाराज!
(बोला विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)
-तर मंडळी, सांगायचं तात्पर्य काय? नाथबाबा म्हणतात, लोकसेवेपेक्षा परमार्थ हीच खरी ईश्वरसेवा. प्रपंचाशिवाय, परमार्थ आणि परमार्थाशिवाय परमेश्वर प्राप्ती होणे नाही. राजे हो, सत्तासुंदरी ही तर मोहमाया. तिच्या नादी लागून रावांचे रंक, नाथांचे अनाथ अन् योगींचे भोगी झाले. या भुताटकीला उतारा गंडेदोरे टाळा...
(बोला, विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)
-तर मंडळी, नाथबाबांनी आपल्या भारुडातून समाजाच्या अंगातील अंधश्रद्धेची भुताटकी उतरवली. पण सत्तेची भुताटकी गेलीच नाही. सत्ता आणि सीतेच्या मोहापायी लंका जळाली. बिभीषण हुशार होता महाराज. काळाची गरज ओळखून त्यानं पक्ष बदलला. सुग्रीवानं हनुमंतांना बाहेरुन पाठिंबा दिला आणि शकुनीनं पांडवांचा पक्ष फोडला!
(बोला, पुंडलिका हरी विठ्ठलऽऽ)
-तर मंडळी कीर्तनाच्या उतरार्र्धाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ती नीट ध्यानात ठेवा. तुम्हाला राजकारणात पाऊल ठेवायचं असेल, तर नारद मंडळीपासून सावध राहा. नारद देवलोकांत गेलेच नाहीत. वेशांतर करून ते भूलोकीच आहेत. कधी ‘आरटीआय’ टाकून तर कधी ब्रेकिंग न्यूज देऊन कुणाला अडचणीत आणतील याचा नेम नाही! सत्तेची ‘लक्ष्मणरेषा’ आणि संघाचा कावा वेळीच ओळखा. देवेंद्राचा धावा कामाचा नाही. नाही तर, लक्ष्मी चतुर्भूज झाली नि सत्तेबाहेर घेऊनी आली, अशी नाथाभाऊंसारखी गत व्हायची महाराज!