युद्धशास्त्राचा विसर पडल्याने किरीट सोमय्या धारातीर्थी

By संदीप प्रधान | Published: April 3, 2019 07:07 PM2019-04-03T19:07:04+5:302019-04-03T19:15:42+5:30

युद्धशास्त्राचा एक सोपा नियम आहे. एकाचवेळी अनेक शत्रूंना अंगावर घेऊ नये.

Kirit Somaiya criticised Shiv Sena chief Uddhav Thackeray, dropped from BJP list | युद्धशास्त्राचा विसर पडल्याने किरीट सोमय्या धारातीर्थी

युद्धशास्त्राचा विसर पडल्याने किरीट सोमय्या धारातीर्थी

Next

- संदीप प्रधान
युद्धशास्त्राचा एक सोपा नियम आहे. एकाचवेळी अनेक शत्रूंना अंगावर घेऊ नये. भाजपचे नेते व ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांना युद्धशास्त्रातील याच नियमाचा विसर पडला आणि त्यामुळे त्यांचा पत्ता कापला गेला. राज्यात १५ वर्षे जेव्हा भाजपची सत्ता नव्हती, तेव्हा भाजपमधील दोनच नेते सक्रिय होते. एक राम नाईक व दुसरे किरीट सोमय्या. बाकी सर्व भाजपा नेते मलूल अवस्थेत होते. सोमय्या हे बिल्डर, कंत्राटदार, उद्योजक यांच्या विरोधातील प्रकरणांच्या पत्रकार परिषदा घ्यायचे, आरोप करायचे आणि अचानक नवे प्रकरण हातात आल्यावर गप्प बसायचे. मग, नव्या प्रकरणाबद्दल उत्साहाने बोलायचे आणि जुन्या प्रकरणाबाबत ‘ब्र’ काढत नव्हते. सोमय्या हे भाजपतील फटकळ नेते आहेत. मतदारसंघात त्यांचे अनेक शत्रू आहेत. त्यांच्या ‘हम करे सो कायदा’, या कार्यशैलीमुळे मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते त्यांना दुरावले आहेत.

सोमय्या यांच्याऐवजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन या निवडणूक लढवणार, अशी चर्चा २०१४ मध्ये सुरू होती. मात्र, त्यावेळी सोमय्या यांनाच उमेदवारी दिली गेली व त्यांच्या नावाची घोषणा एवढी लांबली नव्हती. सोमय्या यांनी मागील सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांच्याशी संबंधित सिंचन घोटाळ्याबाबत माहितीच्या अधिकारात बरीच माहिती गोळा केली होती. यासंदर्भात पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आरोप केले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबतही अशीच बरीच कागदपत्रे सोमय्या यांनी माहितीच्या कायद्याच्या आधारे मिळवली व भुजबळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून त्यांना अक्षरश: बेजार केले. राज्यात सत्तापालट होताच भुजबळ यांना दीड ते दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होताच किरीट सोमय्या व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेवर आरोपांचा भडीमार सुरू केला. अर्थात, शेलार यांनी आपली लक्ष्मणरेषा ओळखून आरोप केले.

मात्र, सोमय्या यांनी शिवसेनेवर माफियाराजचा आरोप केला. मातोश्रीवर मलिदा पोहोचत असल्याचा आरोप करून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. सोमय्या यांच्या आरोपांमुळे उद्धव ठाकरे व्यथित झाले. युती केली नाही, तर दारुण पराभव होऊ शकतो, हे हेरून जेव्हा शिवसेनेने भाजपसोबत युती केली, तेव्हा साहजिकच मीडियातून शिवसेनेची रेवडी उडवण्यास सुरुवात झाली. शिवसेना कणाहीन असल्याची दूषणे लावली गेली. मात्र, आपण कणाहीन नाही, हे दाखवण्याकरिता शिवसेनेने सोमय्या यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. खा. संजय राऊत यांचे बंधू आ. सुनील राऊत यांनी सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवू, असा इशारा दिला होता.


अर्थात, सोमय्या यांचा पत्ता कापला जाण्याशी शिवसेनेचा थेट संबंध नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाच सोमय्या यांच्यावर दात असल्याची भाजप वर्तुळात चर्चा आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना गुजरातमधील काही वादग्रस्त प्रकरणांत शहा यांना तडीपारीचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या काळात शहा यांच्याशी ज्यांनी सौहार्दपूर्ण संबंध राखले, त्यांना शहा यांनी भाजपची सत्ता आल्यावर संघटनेत पदे देण्यापासून अनेक लाभ दिले. मात्र, सोमय्या यांनी अडचणीच्या काळात शहा यांची पाठराखण केली नव्हती. त्यामुळे शहा यांच्या मनात सोमय्यांबद्दल रोष असल्याचे दिल्लीतील पत्रकार व भाजप नेते खासगीत सांगतात. सोमय्या हे अडवाणी गटातील म्हणून ओळखले जातात. सध्या अडवाणी यांना शहा यांनी विजनवासात पाठवले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्याही नशिबी वनवास आल्याचे बोलले जाते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन मातब्बर नेते म्हणजे किरीट सोमय्या व प्रकाश मेहता. मेहता यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची शपथ दिली गेली. कारण, मेहता हे शहा यांचे कट्टर समर्थक आहेत. मेहता आणि सोमय्या यांच्यातून विस्तव जात नाही. सोमय्या हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अत्यंत घट्ट संबंध आहेत. त्याचवेळी प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील ही नेतेमंडळी अमित शहा यांच्याजवळील वर्तुळातील आहेत.


मध्यंतरी, मेहता हे एका भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात वादात सापडले होते. त्या प्रकरणातील मेहता यांचा सहभाग माध्यमांकडे भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून पोहोचल्याची चर्चा होती. खुद्द फडणवीस यांनाही मेहता यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती हवी होती. मात्र, मेहता यांचे मंत्रीपद हे शहा-कनेक्शनमुळे वाचल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्या घोटाळ्याचा वचपा सोमय्या यांना उमेदवारी नाकारून काढला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा पक्ष व पक्षाध्यक्ष हे सर्वाधिक प्रबळ असतात, हेच सोमय्या यांच्या गच्छंतीमुळे पुन्हा अनुभवास आले. पंतप्रधान मोदी किंवा फडणवीस यांचा वरदहस्त सोमय्या यांना वाचवू शकला नाही, हेच खरे. अर्थात, सोमय्या यांनी युद्धशास्त्राचा सर्व शत्रूंना एकाचवेळी अंगावर न घेण्याचा नियम जर पाळला असता, तर कदाचित सोमय्या यांना उमेदवारी गमावल्यावर विलाप करण्याकरिता सहानुभूतीदारांचा खांदा लाभला असता. सध्या सोमय्या एकाकी पडले आहेत.

Web Title: Kirit Somaiya criticised Shiv Sena chief Uddhav Thackeray, dropped from BJP list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.