‘इगो’ बाजूला तर ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:32 AM2018-05-23T01:32:40+5:302018-05-23T01:32:40+5:30

कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे.

Keep 'Ego' aside ... | ‘इगो’ बाजूला तर ठेवा...

‘इगो’ बाजूला तर ठेवा...

Next

इंग्रजीतल्या ‘इगो’ आणि मराठीतल्या ‘अहंकारा’ने भारतीय कुटुंब व्यवस्था सध्या ग्रासली आहे. रावणाच्या अहंकाराचा टिकाव लागला नाही तर आपल्यासारख्या सामान्यांचे काय ? असे पौराणिक दाखले घरातील जेष्ठ मंडळी देत असली तरी ‘इगो’ भारतीय कुटुंबव्यवस्थेतील कलहाचे प्रमुख कारण ठरतेय. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयात कौटुंबिक कलहाच्या वर्षाला सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी दाखल होत आहेत. नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत कौटुंबिक वादाची (कलहाची) ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल झाली होती. यंदा मार्चपर्यंत यात १०५२ प्रकरणांची आणखी भर पडली आहे. न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून करण्यात येणारा युक्तिवाद लक्षात घेता स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात लुडबूड करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, आदी प्रमुख कारणांमुळे कौटुंबिक कलह वाढत असल्याचे स्पष्ट होेते. कौटुंबिक भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे. या साºया वादामागे एकच शब्द दडलाय तो म्हणजे ‘इगो’. कौटुंबिक न्यायालयात समपुदेशक दोन्ही पक्षात तडजोड व्हावी यासाठी कौन्सिलिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून वादाचा विषय समजून घेतात. मात्र न्यायालयातील समपुदेशकांनाही वेळेचे आणि नोकरीचे बंधन असते. यातच एखादा पक्षकार किंवा त्याचा वकील आक्रमक असल्यास किंवा कोणत्याही तडजोडीला मान्य नसल्यास तेही हतबल ठरतात. शेवटी वकील आणि पक्षकारालाही ‘इगो’ असतोच. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हते. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करीत वाद शांत करीत होते. आज मात्र कुणीच कुणाला समजून घेण्यास तयार नाहीत. मात्र क्षणभरासाठी का होईना आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा किंवा तुम्ही मानत असलेल्या परमेश्वराचे चित्र डोळ्यापुढे आणून बघा आणि ‘इगो’ला अंत:करणातून बाजूला ठेवा. यासाठी कौणत्याही कौन्सिलरची गरज पडत नाही. निश्चितच कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ कुणावर येणार नाही.

Web Title: Keep 'Ego' aside ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.