कबड्डी का कोमेजली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:58 AM2018-08-29T06:58:28+5:302018-08-29T06:58:47+5:30

आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही.

Kabadi kabadali? | कबड्डी का कोमेजली?

कबड्डी का कोमेजली?

googlenewsNext

- विजय बाविस्कर

पानं का नासली? घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी का कोमेजली, या प्रश्नाचेही उत्तर एकच आहे... न फिरविल्याने! आशियाई स्पर्धा म्हटले की पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारतीय कबड्डी संघ सुवर्णपदक जिंकणार, हे समीकरण आतापर्यंत ठरलेले होते. मात्र, यंदा दोन तर सोडा, एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर पुरुष संघाची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली.

अलीकडील काही वर्षांत प्रो-कबड्डी लीगमुळे या खेळात अनेक अर्थाने क्रांती घडून आली. या लीगमुळे कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला पुन्हा लोकाश्रय मिळाला... खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळाले... इराण, इराक, जपान, कोरिया, पाकिस्तान हे संघही बलवान म्हणून पुढे येऊ लागले. मात्र, आजवर एखादा अपवाद वगळता कबड्डीतील आपल्या वर्चस्वाला धक्का बसला नव्हता. आशियाई स्पर्धा, विश्वचषक (?) म्हटले की आपणच विजेते असणार, हे तमाम भारतीयांनी गृहित धरले होते. मात्र, यंदाच्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी भारताचे विमान जमिनीवर आणले. पण हे का झालं? आपले दोन्ही संघ चारीमुंड्या चीत झाले. संघनिवडीची प्रक्रिया, हे या पराभवामागील महत्त्वाचे कारण आहे. यासंदर्भातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याच महाराष्ट्रात ही घटना घडली होती. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या एका गुणवान महिला खेळाडूला अन्याय्य पद्धतीने वगळण्यात आले. सराव शिबिर सुरू असताना तिच्या गर्भाशयात गाठ असून, कबड्डी खेळण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न घेता कबड्डीतील अधिकाऱ्यांना झाला होता. एवढ्या मोठ्या राज्याचा विचार करता क्रीडा क्षेत्रातील ही घटना तशी किरकोळ असली तरी, कबड्डीतील अधिकाºयांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणाºया महाराष्ट्राची मान खाली गेली.

आशियाडसाठी संघ निवडताना काय प्रक्रिया राबविली गेली, याबाबत पारदर्शकता नव्हती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ध्यानात घेतली जाते. मात्र, आशियाडसाठी निवडलेल्या भारतीय कबड्डी संघाबाबत असे काही जाणवले नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी झाल्याचेही ऐकीवात नाही. प्रो-कबड्डी लीगमधील स्टार खेळाडूंना थेट संघात स्थान दिले. हे म्हणजे, रणजी स्पर्धा व इतर देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी ध्यानात न घेता केवळ आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान दिल्यासारखे झाले. भारतीय कबड्डी महासंघात अनागोंदी माजली आहे. आशियाई स्पर्धा तोंडावर असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने संघनिवडीवरून त्यांना चपराक लगावली, हे गरजेचेच झाले. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना केली नाही तर भारतीय कबड्डीची अवस्था हॉकीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.

कबड्डीच्या प्रसाराचा विचार करता इतर देशांच्या कामगिरीकडे सकारात्मकपणे पाहता येईलही. पण हे होत असतानाच या खेळाचा जन्मदाता अशा पद्धतीने पराभूत होणे खचितच भूषणावह नाही.

Web Title: Kabadi kabadali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.