भयमुक्तीसाठी ‘जाणता वाघोबा’

By किरण अग्रवाल on Sat, November 11, 2017 3:13am

बिबट्यांचे प्रमाण व वन विभागातील मनुष्यबळ यांचा मेळ बसणे शक्य नाही. त्याऐवजी बिबट्यापासून संरक्षणाची शास्त्रशुद्ध माहिती देणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.

बिबट्यांचे प्रमाण व वन विभागातील मनुष्यबळ यांचा मेळ बसणे शक्य नाही. त्याऐवजी बिबट्यापासून संरक्षणाची शास्त्रशुद्ध माहिती देणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे. जंगल झुडपातून नागरी वस्तीकडे झेपावणारे व प्रसंगी मनुष्यहानीसही कारणीभूत ठरणारे बिबट्यांचे वाढते प्रमाण नाशिक जिल्हावासीयांसाठी चिंतेचे ठरले असले तरी, वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाºया संघटनेच्या मदतीने वनविभागाने जाणता वाघोबा नामक जनजागरण मोहीम हाती घेतल्याने यासंदर्भातील भयमुक्ती घडून येण्याची आशा बळावली आहे. नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालके दगावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. विशेषत: निफाडचा गोदाकाठ तसेच दिंडोरी, देवळा, बागलाण आदी परिसरात ऊसलागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बिबट्यास लपण्यासाठी पुरेशी जागा व भरपूर आडोसा उपलब्ध होत असल्यामुळे या परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे. बिबटे ऊसशेतीत अधिवास करताना शेतातील शेळ्या-कुत्र्यांना लक्ष्य करतातच, शिवाय भक्ष्याच्या शोधात ते नागरी वस्तीतही शिरतात. काही दिवसांपूर्वीच बागलाण तालुक्यातील एका मेंढपाळ वस्तीत पोहचलेल्या बिबट्याने एका बालकास पळवून नेले. त्याहीपूर्वी निफाड तालुक्यात व इतरही ठिकाणी बिबट्यांनी बालकांचा बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे ग्रामीण भागात व विशेषत: मोठ्या प्रमाणात ऊसलागवड असलेल्या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून, ग्रामस्थ धास्तावले आहेत. यातून काही ठिकाणी रात्ररात्र जागून काढली जात असून, बिबट्याचा शोध घेतला जात आहे. भयग्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा संताप लक्षात घेता हाती लागलेल्या बिबट्याच्याही जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता यातून बळावली आहे. बिबट्यांचे वाढते प्रमाण व त्यांना पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे लावण्याची मागणी वनखात्याकडे केली जात असली तरी मागणीच्या तुलनेत पिंजरे व वनकर्मचाºयांचीही कमतरता प्रकर्षाने पुढे येताना दिसते. त्यामुळे ही एकूणच परिस्थिती पहाता बिबट्याचा उपद्रव ही नाशिक जिल्हावासीयांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. म्हणूनच वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या मदतीने वनविभागाने ‘जाणता वाघोबा’ मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे प्रशासनाची चिंता व ग्रामस्थांमधले भय दूर होण्याची आशा बळावली आहे. बिबट्याचे वास्तव्य असलेल्या क्षेत्रात राहणाºया लोकांना बिबट्यापासून संरक्षणाविषयीची तसेच त्याच्या सवयीची माहिती या मोहिमेद्वारे दिली जाणार आहे. याआधी जुन्नर व संगमनेर परिसरात अशी मोहीम हाती घेतली असता त्याचा चांगला परिणाम घडून आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील या मोहिमेमुळे बिबट्याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती मिळून त्याद्वारे मानव व बिबट्यामध्ये उभ्या राहत असलेल्या संघर्षाची समस्या सुटण्यास मदत होऊ शकणार आहे. वाईल्डलाईफ सोसायटीच्या समन्वयक मृणाल घोसाळकर व वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. विद्या अत्रेया या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाºयांनी यासाठी कामही सुरू केले आहे. यातून बिबट्यापासून संरक्षणाचे धडे मिळून त्याच्या हल्ल्यात जाणारे बालकांचे बळी तर रोखले जातीलच, शिवाय बिबट्याविषयीचा रोषही कमी होण्यास मदत घडून येण्याची आशा आहे.  

संबंधित

विश्वासाला फोड येऊ नये !
सहृदयता आणि स्वीकारार्हता
‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला
आक्रित
बहुपक्षीय समतेच्या जुळणीकडे...

संपादकीय कडून आणखी

२४ जुलै १९४३ सांगलीच्या क्रांतिकारकांच्या उडीचा अमृतमहोत्सव! - रविवार विशेष - जागर
खडसेंची सरशी
मराठवाडा हिरवाकंच होणार
सार्वजनिक वाहतुकीचे मारेकरी
सरकार व विरोधक दोघांनाही अविश्वास प्रस्तावाचा लाभ

आणखी वाचा