जय हो प्रभादेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:32 AM2018-07-19T04:32:29+5:302018-07-19T04:32:32+5:30

नावात काय आहे? असे कितीही वेळा म्हटले तरी, नावातच सर्वकाही आहे

Jai Ho Prabhadevi | जय हो प्रभादेवी

जय हो प्रभादेवी

Next

नावात काय आहे? असे कितीही वेळा म्हटले तरी, नावातच सर्वकाही आहे, याची प्रचिती नेहमीच येत असते़ नावाला इतिहास चिकटून येतो़ त्यामुळे नाममाहात्माला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे़ आपण मराठी माणसे इतरांना नावे ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलो, तरी विशिष्ट नावाच्या आग्रहासाठी आपण आंदोलने, मोर्चेही काढतो़ आजपासून आणखी एक नामांतर मुंबईकरांच्या वाट्याला आले आहे़ तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचे रेल्वे स्थानक असलेल्या ‘एल्फिन्स्टन रोड’चे ‘प्रभादेवी’ असे नामकरण करण्यात आले आहे़ इंग्रजांच्या राजवटीत १८५३ ते १८६० या काळात गव्हर्नरपदी असलेल्या एल्फिन्स्टन यांचे नाव १८६७ साली बनलेल्या रेल्वे स्थानकाला देण्यात आले होते़ या स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी १९९०मध्ये शिवसेनेने केली होती़ ती पूर्ण होण्यास २८ वर्षांचा कालावधी जावा लागला़ प्रभादेवीचा इतिहास १२व्या शतकातला आहे़ काळानुसार परिसर बदलत गेला तरी प्रभादेवीची ओळख मात्र कायम राहिली़ काही महिन्यांपूर्वी ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानक गाजले ते येथे घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे़ तब्बल २३ जणांना प्राण गमवावे लागले होते़ त्यानंतर लष्कराच्या मदतीने नवा पूल तयार करण्यात आला़ मात्र त्यानंतरही शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या या व इतर अनेक रेल्वे स्थानकांवर डागडुजी करून ती तशीच सुरू ठेवण्यात आली आहेत. ‘प्रभादेवी’ हे नाव देण्यात आले असले तरी येथील पायाभूत सुविधांची चर्चा घडतच राहणार याविषयी दुमत असण्याचे कारण नाही़ इंग्रजांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले पूल आजही तग धरून आहेत; आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतर बांधलेल्या अनेक पुलांची अवस्था खिळखिळी झाली आहे हे़ त्यामुळे नामकरण करण्यासोबतच दर्जेदार सुविधांचाही विचार व्हायला हवा़ खरेतर, नाव बदलून काही फरक पडत नाही, याचीही अनेक उदाहरणे आहेत़ ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले़ काही आक्षेपानंतर ते ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले़ आता लोक ‘व्हीटी’ऐवजी ‘सीएसटी’ असे संबोधतात़ वांद्रे-वरळी सी लिंकचे नाव ‘स्वर्गीय राजीव गांधी सागरी सेतू’ असे ठेवण्यात आले़ पण तसा उल्लेख होताना दिसत नाही़ मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेला ‘यशवंतराव चव्हाण दु्रतगती महामार्ग’ असे नाव देण्यात आले़ अगदी क्वचित लोकांना याची आता माहिती असेल़ बहुतेक जण ‘एक्स्प्रेस-वे’ असाच उल्लेख करतात़ त्यामुळे नाव बदलून एखाद्या पक्षाला, गटाला खूश करता येते़ त्यापलीकडे फारसा फरक पडत नाही़ आता ‘प्रभादेवी’प्रमाणे ‘चर्नी रोड’चे नाव ‘गावदेवी’, ‘दादर’चे नाव ‘चैत्यभूमी’, ‘ग्रँट रोड’चे नाव ‘आॅगस्ट क्रांती’ करावे, अशी मागण्यांची यादी आहे़ तूर्त नावापेक्षा दर्जेदार सुधारणा आणि सुविधा यांचा गांभीर्याने विचार झाला तर तो लोकांना हवा आहे़ आज लोकांना ऐतिहासिक नावासोबत कर्तृत्वाचा भूगोलही हवा आहे़ नाहीतर लोक बदललेल्या नावालाही नावे ठेवतात हे नक्की़

Web Title: Jai Ho Prabhadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.