प्रतिके संपवू पाहण्याचा असहिष्णू वारसा

By गजानन जानभोर | Published: November 14, 2017 01:46 PM2017-11-14T13:46:42+5:302017-11-14T13:48:25+5:30

एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे.

Intolerance legacy to see the end of the mark | प्रतिके संपवू पाहण्याचा असहिष्णू वारसा

प्रतिके संपवू पाहण्याचा असहिष्णू वारसा

Next

एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे. आपल्याला न आवडणारी प्रतिके संपविण्याच्या हिंसक प्रवृत्तीची ती द्योतक आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्रभूषण रा. कृ. पाटील यांचे नागपुरातील एका मार्गाला दिलेले नाव पुसून काढण्याचे काही मंडळींचे कारस्थान ‘लोकमत’मुळे उघडकीस आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडसावल्यानंतर संबंधितांचे मनसुबे उधळले गेले असले तरी हा विषय इथेच संपलेला नाही. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
रा. कृ. पाटलांचे नाव पुसून काढण्याचा प्रस्ताव देणारे लोकप्रतिनिधी सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीला अनवधान किंवा अज्ञान संबोधणे हेही त्यांच्या विकृत मानसिकतेची पाठराखण केल्यासारखे आहे. हे भंयकर प्रकरण जनतेसमोर आल्यानंतरही नागपूरच्या महापौरांनी साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही, याचा अर्थ काय घ्यावा? ज्या महापुरुषांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्या त्यागाचा वर्तमानाला विसर पडला हे कटूसत्य सांगणारी ही घटना आहे. दुसरे असे की, रा. कृ. पाटील यांचा त्याग ठाऊक असूनही हे लोकप्रतिनिधी असे का वागले? बालपणापासून त्यांच्या मनावर झालेल्या उलट्या धाटणीच्या सामाजिक, सांस्कृतिक संस्काराचा हा परिणाम तर नसावा ना? एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी भगवान बुद्धाच्या मूर्ती तोडल्या, अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेली, या घटना काय दर्शवितात? आपल्याला न आवडणारी प्रतिके संपविण्याच्या हिंसक प्रवृत्तीचे त्या द्योतक आहेत. सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहल हे कब्रस्थान आहे, असे घाणेरडे विधान हरियाणाचा एखादा मंत्री करतो तेव्हा त्याला ती वास्तू तिथे नकोशी असते आणि भविष्यात ती नष्ट व्हावी, अशी चिथावणीही त्याला त्या माध्यमातून द्यायची असते. रा. कृ. पाटलांसारख्या गांधीवाद्यांचे नाव पुसून काढण्याची मानसिकता अशाच संस्काराचा परिपाक आहे. हे संस्कार असे प्रत्यक्ष केले जात नाहीत. ते जन्मापासूनच धर्माच्या, जातीच्या, कुटुंबातील वातावरणातून पद्धतशीरपणे बिंबवले जात असतात. लहान मुलांसमोर या महापुरुषांबद्दल मुद्दाम अपशब्द वापरणे, घरात त्यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा घडवून आणणे, त्यांच्या विचारांची टवाळी करणे...या विचारसरणीतूनच पुढे ते मूल कट्टर, अतिरेकी विचारांचे निपजत असते. समाजात वावरू लागल्यानंतर त्या महापुरुषाबद्दल, त्याच्या प्रतिकांबद्दल त्याच्या मनात द्वेषाची भावना सळसळत असते. मग त्यातूनच नामफलक, पुतळे, वास्तू या प्रतिकांची विटंबना करण्याचा विचार त्याच्या मनात बळावतो. द्वेषाची प्रतिके जशी त्याच्या मनात बिंबवली जातात अगदी तसेच श्रद्धेचे विषयदेखील मनावर खोलवर कोरले जातात. या श्रद्धास्थानांबद्दल कुणी चिकित्सक टीका केली की तो चवताळतो. असे चवताळलेले तरुण अलीकडे समाजमाध्यमांवर आकम्रक असतात. त्यांची जडणघडण अशीच झालेली असते. ही अतिरेकी प्रवृत्ती सर्वच सामाजिक चळवळींत दिसून येते. ती साºया धर्मांत आणि जातींतही आहे. आपल्याला श्रद्धेय असलेल्या महापुरुषांचे मोठेपण सांगताना दुसºया महापुरुषाला शिव्या घालणे हाही त्यातीलच एक असहिष्णू प्रकार. जी माणसे समाजात प्रतिष्ठित म्हणून गणली जातात त्यांना सार्वजनिक जीवनात असे अविवेकी वागता येत नाही. पण बालपणी मन आणि मेंदूची अशी अचेतन मशागत झाली असल्याने कधीतरी तो विचार उफाळून येतो आणि मग रा.कृ. पाटलांचे नाव पुसून काढण्याचा प्रस्ताव त्यातूनच जन्मास येतो. ही कृती योग्य की अयोग्य? त्याचे समाजमनावर काय परिणाम होतील? याबद्दलचा सारासार विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही. या कृतीबद्दल त्यांच्या सचेतन मनालासुद्धा काहीच कल्पना नसते. त्या कृतीचे समाजात पडसाद उमटू लागल्यानंतरही त्यांना पश्चाताप होत नाही. रा. कृ. पाटलांच्या नामफलकाच्या निमित्ताने समोर आलेली ही घटना काहींना एक क्षुल्लक बाब वाटत असली तरी या अविवेकी वर्तनातून आपण पुढच्या पिढीला असहिष्णुतेचा वारसा देत आहोत, याचे भान या मंडळींना राहिलेले नाही.

Web Title: Intolerance legacy to see the end of the mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.