Information Technology for the development of that defect? | माहिती तंत्रज्ञान प्रगतीसाठी की दुर्गतीसाठी?

इंटरनेट, समाज माध्यमे यामुळे माणसाचे जग विस्तारले. प्रत्येकाला आपली मते मांडण्याचे, दुसºयाचे विचार समजून घेण्याचे व्यासपीठ मिळाले. यामुळे माणसाची प्रगल्भता वाढली. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच त्या या समाज माध्यमांच्या वापराबाबतही दिसू लागल्या आहेत. या माध्यमांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागलाय की त्याचे फायदे जास्त की तोटे असा प्रश्न आता पडतो आहे. सर्वाधिक धोका निर्माण झालाय तो याद्वारे होत असलेल्या अश्लील साहित्याच्या प्रसाराने. या पोर्नोग्राफीने केवळ मोठ्यांनाच नव्हे तर बालमनालाही घट्ट विळखा घातला असून समाजस्वास्थ्य बिघडविणाºया या अश्लील साहित्याचा प्रसार कसा रोखायचा? हे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. असामाजिक तत्त्वांच्या अतिक्रमणाने ही माध्यमे प्रदूषित झाली आहेत. अनेक देशांनी तर यासंदर्भातील कायदे अधिक कठोर करण्यास प्रारंभ केला आहे. अश्लील साईटस्वर बंदी घातली आहे. जर्मनीसारख्या देशाने संसदेत एका कायदा पारित करून सोशल नेटवर्किंग साईट्सवरील आक्षेपार्ह मजकुरासाठी इंटरनेट कंपन्यांना दोषी ठरवून त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातही या दिशेने यापूर्वीच हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने मुलांचे अश्लील चित्रण असणाºया साईटस्वर बंदी घातली आहे. परंतु अशा सर्वच साईटस्वर सरसकट निर्बंध घालण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने शासनाने अलीकडेच आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत पोर्नबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अशी सामग्री ब्लॉक करून ती कुठेही अपलोड होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश यू ट्युब, गुगल आणि व्हॉटस्अ‍ॅपसह सर्व समाज माध्यमांना दिले आहेत. समाधानाची बाब म्हणजे या माध्यमांनीही त्यातील गांभीर्य जाणत येत्या दोन ते तीन महिन्यात अशी नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली आहे. परिणामी पोर्न बघणारे आणि त्याचा प्रसार करणारे दोघेही रडारवर येणार आहेत. समाज माध्यमांवरील स्वातंत्र्य उपभोगताना आत्मसंयम आणि जबाबदार वृत्ती असायला हवी. पण दुर्दैवाने बहुसंख्य समाजमाध्यमांमध्ये ती दिसून येत नाही. यासंदर्भात कुंभार आणि गाढवाची एक मार्मिक कथा आहे. एका कुंभाराकडे ओझे वाहून नेणारे गाढव होते. तो त्याला नेहमी बांधून ठेवत असे. एक दिवस त्याला आपल्या या वागण्याचे वाईट वाटते. गाढवालाही स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा विचार करीत तो त्याला मोकळे सोडतो. गाढव प्रथम आनंदाने उड्या मारते अन् बघताबघता चौखूर पळत सुटते. समोर असलेल्या खोल दरीचेही भान त्याला राहात नाही आणि दरीत कोसळते. मग काय? कुंभार स्वत:लाच कोसतो.
गाढवाला स्वातंत्र्य देण्याची दुर्बुद्धी आपल्याला सुचलीस कशी? याचे दु:ख व्यक्त करतो. मतितार्थ हाच की समाजमाध्यमांचा अनियंत्रित गैरवापर केल्यास आपलेही या गाढवासारखेच हाल होऊ शकतात, याचे भान राखतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या या देणगीचा प्रगती आणि विकासासाठी लाभ करून घेण्याची कला प्रत्येकाने शिकली पाहिजे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.