बालकोटा येथील हल्ल्याचा तपशील भारत का देत नसावा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 07:06 PM2019-03-01T19:06:24+5:302019-03-01T19:07:01+5:30

मंगळवार २६ फेब्रुवारी २०१९रोजी भारतीय वायू दलाने भारतीय सीमारेषेपासून ८० किलोमीटर आत असलेल्या बालकोटा येथील जैशच्या तळावर मारा करून तळ उद्ध्वस्त केला.

India why can not give details of the attack on Balakota | बालकोटा येथील हल्ल्याचा तपशील भारत का देत नसावा ?

बालकोटा येथील हल्ल्याचा तपशील भारत का देत नसावा ?

googlenewsNext

- प्रशांत दीक्षित

मंगळवार २६ फेब्रुवारी २०१९रोजी भारतीय वायू दलाने भारतीय सीमारेषेपासून ८० किलोमीटर आत असलेल्या बालकोटा येथील जैशच्या तळावर मारा करून तळ उद्ध्वस्त केला. तेथे ३००हून अधिक दहशतवादी भारतावर हल्ला करण्यासाठी जमा झाले होते. भारतीय नागरिकांची सुरक्षा जपण्यासाठी या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने सांगितले.
मात्र याचा कोणताही ठोस पुरावा भारताने माध्यमांसमोर ठेवलेला नाही. गुरुवारी झालेल्या सैन्यदल प्रमुखांच्या पत्रकार परिषदेतही यावर मौन पाळण्यात आले.

पुरावा कधी प्रसिद्ध करायचा हे सरकार ठरवील असे वायू दल प्रमुखांनी सांगितले. पाकिस्ताननेही फक्त अल जझिरा या वृत्तवाहिनीला तेथे नेले व काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये फारसा आक्रोश झाल्याचेही दिसले नाहीत. जैशही मौन बाळगून आहे. तीनशेहून अधिक लोक मारले गेले असतील तर त्याचा काहीतरी पुरावा मिळायला हवा होता, हा प्रश्न अयोग्य नाही. सध्या माध्यमांतील मोदी विरोधकांकडून हा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. असा प्रश्न करणे म्हणजे पाकिस्तानला मदत करण्यासारखे आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष करतात. पण त्यामुळे प्रश्न चुकीचा ठरत नाही. तथापि, भारत सरकार पुरावे का जाहीर करीत नाही यामागे वेगळे कारणही असू शकते. माजी वायूदल प्रमुख यशवंत टिपणीस यांनी चित्रवाहिन्यांशी बोलताना काही मुद्दे दिले ते विचारात घेण्याजोगे आहेत.

माजी वायू दल प्रमुख टिपणीस यांच्या मते, मंगळवारच्या भारताच्या मुसंडीनंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हल्ल्याचा तपशील अधिक गंभीरपणे तपासला पाहिजे. सध्या उघड झालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी २४ पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसली व लष्करी तळांवर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करताना भारताचे मिग-२१ पडले, अभिनंदन पाकिस्तानच्या हाती सापडला. परंतु, भारताच्या मंगळवारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने एकदम २४ विमाने का पाठविली. ही सर्व विमाने अत्याधुनिक होती. लहानश्या तळावर हल्ला करण्यासाठी इतकी विमाने पाठविली जात नाहीत. भारताने पाकिस्तानच्या प्रत्यक्ष हद्दीत घुसण्यासाठी फार थोडी विमाने वापरली होती.

याचा अर्थ असा की लहानशा लष्करी तळावर हल्ला करणे इतका साधा पाकिस्तानचा इरादा नव्हता. अवंतीपूर किंवा जमल्यास श्रीनगर येथील वायू दल तळांवर अचानक हल्ला करून भारताला आपली हवाई ताकद दाखवून द्यायची असा पाकिस्तानचा मुख्य उद्देश असावा.
पण झाले काय, तर पाकिस्तानी विमानांना अचानक मिग विमानांकडून कडवा प्रतिकार सुरू झाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पाकिस्तानी विमानांची चाहूल भारतीय सैन्यदलाला लागली होती व वायूदल तयारीत होते. भारताची यंत्रणा सतर्क होती आणि पाकिस्तानच्या हालचालींचा खोलवर वेध घेण्याची क्षमता भारताकडे आहे हेही यावरून कळते. इतका अचानक प्रतिहल्ला पाकिस्तानी वायूदलाला अपेक्षित नसावा. भारताने हवाई हल्ला केला त्याचा मागमूसही बराच काळ पाकिस्तानला लागला नव्हता. या तुलनेत भारताची सतर्कता पाकिस्तानला चकीत करणारी होती.

यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अभिनंदन वर्धमान व अन्य मिग-२१ विमानांनी दिलेली जोरदार लढत पाकिस्तानला अनपेक्षित होती. पाकिस्तानी विमानांच्या तुलनेत मिग विमाने ही दोन पिढ्या मागे आहेत. तरीही पाकच्या अत्याधुनिक एफ-१६ विमानांशी मिग-२१ने जोरदार झुंज दिली. हवाई युद्धाच्या परिभाषेत याला डॉग फाईट म्हणतात. या लढतीत अभिनंदनचे विमान दुर्दैवाने कोसळले. पण भारतीय वैमानिकांचे कौशल्य व तयारी या लढतीतून पाकिस्तानच्या लक्षात आली असावी, म्हणून ते माघारी वळले. पाकिस्तानने ताब्यात घेतल्यावरही अभिनंदनने दाखविलेल्या धैर्यामुळे भारतीय वायूदलाचा कणखरपणा पाकिस्तानच्या लक्षात आला.

लढाई सोपी जाणार नाही हे यातून कळले. मिग कोसळले नसते तर एफ-१६ विमान गमावल्यामुळे पाकिस्तानचे नाक आणखीनच कापले गेले असते. भारतीय सैन्यदलाची सतर्कता व माहिती जमा करण्याची क्षमता ही यातील महत्वाची बाब आहे. पाकिस्तानने एफ-१६ हीच विमाने आणली होती हे सिद्ध करण्यासाठी केवळ याच विमानांवर असणारी मिसाईल भारताने दाखविली. पण त्याहून महत्वाचे म्हणजे या विमानांची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर भारताकडे असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. इतकी अचूक माहिती भारताकडे जमा आहे. बालाकोट येथील हल्ल्याचा तपशील जाहीर न करण्याशी याचा संबंध आहे. बालाकोटमध्ये खरोखर किती नुकसान झाले, कितीजण ठार झाले याचा तपशील भारताने अत्याधुनिक यंत्रणांद्वारे वा उपग्रहाद्वारे मिळविला असेल. तो उघड केला तर भारताकडे किती अद्यावत तंत्रज्ञान आहे हे उघड होऊ शकते. शत्रुराष्ट्राला असे कळणे हे योग्य ठरणार नाही, असे एअर चीफ मार्शल टिपणीस यांचे मत आहे. 
हे मत सर्वांना मान्य होईल असे नाही. पण ते विचारात घेण्याजोगे नक्कीच आहे. बालाकोटवर हल्ला करणार्या भारतीय विमानांनीही फोटो काढले असणार. पण ते तितकेसे स्पष्ट नसतात, कारण बॉम्बवर्षावानंतर मोठे नुकसान झालेले असते. काही काळानंतरचे फोटो अधिक चांगले येतात व ते अचूक माहिती देतात.

असे फोटो काढणारी यंत्रणा भारताकडे आहे का किंवा याबाबत अन्य कोणता मित्रदेश भारताला मदत करीत आहे का, याबद्दल सध्या कोणतीच माहिती हाती नाही. (विमानांची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पकडणारी यंत्रणा आहे हे आता कळले आहे) त्यामुळे बालाकोट हल्ल्याच्या यशाबद्दल शंका कायम राहणार. परंतु, पूर्ण तयारी करून केलेली वायूदलाची कामगिरी ही केवळ दिखाऊ नसणार इतका विश्वास आपण वायूदलावर ठेवला पाहिजे.

आपली सैन्यदले लोकप्रतिनिधींच्या अधिकारात असतात हे खरे असले तरी सर्जिकल स्ट्राईक किंवा युद्ध पुकारण्यापूर्वी या दलांचे प्रमुख आपली मते सरकारकडे स्पष्टपणे मांडतात, सरकारच्या हातातील बाहुले नसतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बांगलादेश युद्धाच्या वेळी डिसेंबरशिवाय युद्ध सुरू करता येणार नाही, आपली तितकी तयारी नाही, असे त्यावेळचे प्रमुख माणेकशा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्पष्टपणे सांगितले होते. इंदिराजी प्रथम अस्वस्थ झाल्या, कारण त्यांना तातडीने आक्रमण करायचे होते. परंतु माणेकशांच्या शहाणपणावर त्यांचा विश्वास होता. इंदिराजींनी संयम पाळला. युद्ध डिसेंबरमध्येच सुरू झाले व भारताला विजय मिळाला. तेव्हा सध्यातरी आपण सैन्यदलांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन संयम बाळगला पाहिजे.

Web Title: India why can not give details of the attack on Balakota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.