Increasing risk of cancer due to changing lifestyle | बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका

सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील कर्करोगाविषयीची भीती दूर व्हावी व जनजागृती व्हावी, यासाठी ४ फेब्रुवारी ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो. ज्या रुग्णांना नव्यानेच कर्करोगाचे निदान झालेले आहे, त्यांनी खचून न जाता कॅन्सरवर मात करावी, कर्करोगाविषयी माहिती जाणून घ्यावी, यासाठी ‘कर्करोग म्हणजे मृत्यू’ ही भीती न राहता, त्याच्या उच्चाटनासाठी मनोबल वाढावे, या अनुषंगाने टाटा रुग्णालयाचे कर्करोग शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी कर्करोगाविषयी ‘लोकमत’शी सविस्तर चर्चा केली. कॅन्सरबाबत माहिती आणि उपचारांपेक्षा लोकांच्या मनात भीतीच अधिक आहे. कर्करोगाच्या निदानानंतर रुग्णांसह परिवारातील लोकांवर त्याचा खूप परिणाम होत असतो. अनेक रुग्ण सकारात्मक पद्धतीने कर्करोगाशी लढा देत, नव्या उत्साहाने पुन्हा आयुष्य जगतात. तथापि, कर्करोग टाळणे हाच कर्करोगावरील प्रतिबंध असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. प्रत्येकानेच स्वत:साठी काही वेळ द्यावा. बदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले. 

- कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढतेय, हे कशामुळे?
कर्करोग वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, हे खरे आहे. मात्र, हे प्रमाण कर्करोगाच्या निदानामुळे अधिक वाटत आहे. इंटरनेटसारखा माहितीचा स्रोत हाती आल्याने या पद्धतीचे चित्र दिसून येते. पूर्वी कर्करोगाचे निदान उशिरा व्हायचे, पण आता ही परिस्थिती बदलली आहे. लोकांची आजाराविषयी जाणीव वाढली आहे. अजूनही कर्करोग रुग्णांची अचूक संख्या उपलब्ध नाही. मात्र, निदानाचे प्रमाण वाढल्याने ‘कर्करोग’ हा शब्द सहज ऐकू येतो. कर्करोग ही वातावरणीय समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे एकूणच आजारांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब वा कर्करोग होणे हे जीवनशैलीशी निगडित आजार आहेत. हवा, खाणे-पिणे, व्यायाम या तीन गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेतली, तर सहजासहजी कर्करोग होत नाही. विविध आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते, त्यामुळे आजारांवर मात करण्यास मदत होते, पण तीच सध्या वेगाने ढासळत चालली आहे.

- कर्करोग कोणत्या प्रमुख कारणांमुळे होतो?
धूम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखूचे सेवन करणे अशा घातक सवयींमुळे कर्करोग निश्चितपणे होतो. खरे तर कोणत्याही गोष्टीचे अतिप्रमाण कर्करोगाला कारणीभूत ठरते. याशिवाय, प्रदूषित हवेमुळेही कर्करोग संभवतो. हल्ली व्यायामाची आवड आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही. एकीकडे आॅलिम्पिक पदाची आशा करतो. मात्र, त्यासाठी पोषक क्रीडा संस्कृती विकसित केली जात नाही. साधारण ३० वर्षांपूर्वी धूम्रपान, मद्यपान हानिकारक आहे, याविषयी ज्या पद्धतीने माहिती व जनजागृती व्हायची, त्याचा आता मोठ्या प्रमाणात अभाव आहे, हे खेदजनक आहे. पूर्वी अन्नाचा तुटवडा असायचा, आता अन्न उपलब्ध आहे. मात्र, पाश्चिमात्यांचे अनुकरण करून चुकीचा आहार आपण घेतो. सध्या सर्वत्र चरबीयुक्त आहाराचे सेवन वाढले आहे, यामुळे वजन अधिकाधिक वाढते. लठ्ठपणा आणि अतिलठ्ठपणा हीदेखील कर्करोगामागील कारणे आहेत. शरीराला व्यायामाची, श्रमाची गरज असते, परंतु आपण ते करत नाही. शरीरात कर्बोदके, प्रथिने आणि चरबीचा समतोल राखला पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तरुण पिढीचे ‘फास्टफूड’वर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढलेय. त्यामुळे गेल्या १० वर्षांत महानगरांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.

- कोणत्या कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून येते?
डोके, मान आणि तोंडाचा कर्करोग सामान्यत: आढळतो. त्याचप्रमाणे, महिलांमध्ये आढळून येणाºया स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही बºयापैकी आहे. या कर्करोगांच्या प्रकारानंतर सर्वांत कमी प्रमाण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे दिसून यायचे, पण जीवनशैली बदलली, शहरीकरण वाढतेय, त्यामुळे स्वादुपिंडाचा कर्करोग डोके वर काढतोय. गर्भाशयाच्या ग्रिवेच्या कर्करोगाचे प्रमाणही कमी होत आहे. तथापि, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांत मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, सध्याच्या आहारामुळे बद्धकोष्ठता वाढत आहे. खरं म्हणजे बद्धकोष्ठता हा आजार नाही. पालेभाज्या न खाणे, कोशिंबिरीचा रोजच्या आहारात समावेश नसणे, त्यामुळे हा त्रास संभवतो.

- कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे?
कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय अभ्यासक्रमात कर्करोगाविषयी माहितीचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून, ही माहिती लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळाली, तर महाविद्यालयीन वयात ही पिढी जागरूक होईल. या माध्यमातून धूम्रपान, तंबाखू खाणे या सवयींवर आळा बसेल. आपल्याकडे धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. विशेषत: महिलांमध्ये हे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढतेय. त्याचप्रमाणे, आपण दैनंदिन चुकीच्या सवयींवर नियंत्रण आणले पाहिजे. निसर्गचक्राच्या विरोधात जाऊन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अपवादात्मक वेळा आनुवंशिक असमतोलामुळेही कर्करोगाची शक्यता असते.

- सध्या देशात कर्करोगाची स्थिती कशी आहे?
कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक धोरण, प्रतिबंध, निदान या टप्प्यांवर विशेष काम सुुरू आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे जनजागृतीवर भर दिला जात आहे. यानंतर कर्करोग रुग्णाला मिळणाºया आरोग्यसेवांवर स्वास्थ्य सुधारणेही अवलंबून असते. टाटा रुग्णालयात अन्य देशांच्या तुलनेत चांगली सेवा दिली जाते. मात्र, अजूनही आपल्याकडे संशोधनाला तितकासा वाव नाही. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट संशोधक आहेत, उत्तम संकल्पनाही आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत देश पिछाडीवर आहे. याचे मूळ शिक्षण पद्धतीत आहे. आपला अभ्यासक्रम पूर्णपणे स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. याच समीकरणावर हुशारीचे मोजमाप केले जाते. त्यामुळे लहान वयातच संशोधनापासून, नवीन शोधण्यापासून ही पिढी दुरावत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही संशोधनाला वाव दिला जात नाही. संशोधनाच्या शाखा, त्यासाठीचे प्रोत्साहन दिले जात नाही, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही निराशाजनक स्थिती आहे. टाटा रुग्णालयात संशोधनाला वाव दिला जात आहे. थोडासा विलंब झाला. मात्र, पुढील १० वर्षांत यात नक्कीच शिखर गाठलेले असेल. याची दुसरी बाजू अशी की, संशोधनापेक्षा कर्करोग रुग्णांच्या उपचार आणि सेवेवर अधिक भर दिला जातो, तर अमेरिकेत, युरोपमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथे संशोधन क्षेत्र अग्रेसर आहे. आपल्याकडे २ हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर अशी स्थिती आहे, अमेरिकेत ही संख्या ३९० रुग्णांना एक डॉक्टर अशी आहे. संशोधक कसे तयार करायचे? याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करतोय. सद्यस्थितीला टाटा रुग्णालयाचे ५५-६० टक्के माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोप-यात कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे २ हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर हे प्रमाणही कमी करून हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

- टाटात बंगाल, ओडिशामधून येणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, याचे कारण काय?
होय. बंगाल, ओडिशा राज्यांतून अधिक रुग्ण येत असतात. तिथे कर्करोगाचे प्रमाणही जास्त आहे आणि त्या ठिकाणी योग्य सेवा-सुविधा, उपचार पद्धतींचा अभाव आहे. टाटामध्ये ३९ टक्के रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून येतात. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतातून आपल्याकडे अधिक रुग्ण येतात. येथील काही कर्करोग केवळ त्याच प्रदेशांत आढळतात. त्याचप्रमाणे, देश-परदेशांतून म्हणजेच आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश येथून बरेच रुग्ण उपचारांसाठी येतात.

- टाटा रुग्णालयाच्या विस्ताराचा काही विचार आहे का?
गेल्या वर्षी ६४ हजार नव्या रुग्णांची नोंद टाटा रुग्णालयात करण्यात आली, तर गेल्या ५ वर्षांत ५ लाख रुग्ण टाटा रुग्णालयात उपचारांसाठी ये-जा करत असतात. टाटा रुग्णालयाच्या वातावरणातील सेवा-संस्कृती ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे येथील विश्वासार्हता टिकून आहे आणि दिवसेंदिवस अधिक दृढ होते आहे. मात्र, एकाच ठिकाणी अशा पद्धतीची सेवा देण्याऐवजी आम्ही टाटा रुग्णालयाच्या विस्तार प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत हाफकिनच्या ५ एकर जागेवर ६०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाराणसीला नवे रुग्णालय उभारत आहोत. पंजाबमध्येही तेथील राज्य शासनाने नव्या रुग्णालयासाठी पुढाकार घेतलाय, तर विशाखापट्टणमला नवीन रुग्णालय बांधून तयार आहे. कोलकात्यालाही टाटा मेडिकल सेंटर या खासगी संस्थेने सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी या रुग्णालयात १४ हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, यामुळे टाटावरील भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल.

- कर्करोग बरा होण्याचे टप्पे कसे असतात?
कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, त्यावरून तो १०० टक्के बरा होणार की नाही हे अवलंबून असते. लवकर निदान झाले की, तो बरा होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगाच्या उपचार प्रक्रियेसाठी ‘मल्टिडिसिप्लिनरी केअर’ महत्त्वाची भूमिका बजावते. यात रेडिओलॉजी, कर्करोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, पॅरामेडिकल स्टाफ अशा सर्वांचे एकत्र प्रयत्न रुग्ण बरे होण्यासाठी झटत असतात, तसेच सद्यस्थितीत ‘पर्सनालाइज्ड् मेडिसिन’ ही संकल्पनाही सध्या रूजू पाहतेय. यात प्रत्येक रुग्णाच्या आनुवंशिकता तपासून त्याप्रमाणे औषधोपचार दिले जातात.

- इंटरनेटवरून आजारांविषयी माहिती घेणे कितपत योग्य आहे?
इंटरनेटवरून माहिती घेण्याचे प्रमाण वाढले आहे, बºयाचदा काही रुग्ण हे विषय खरेच नीट समजून घेतात. मात्र, काही वेळा या ‘सर्फिंग’मुळे चुकीच्या समजुती रुग्णांच्या मनात घर करतात. अशा वेळी डॉक्टरांना रुग्णांच्या मनातील नकारात्मक वाइब्स दूर करण्यासाठी समपुदेशन करावे लागते.

- पॅरामेडिकल शाखेतील कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतात?
आपल्या शरीरात ‘डिसिझ’ नव्हे, तर ‘डिस्टर्बन्सेस’ असतात, ते दूर करण्यासाठी पॅरामेडिकल शाखेतील विविध पद्धतींचा वापर करणे उपयुक्त ठरते. अनेकदा स्थितप्रज्ञ राहणारे रुग्ण, सकारात्मक मनाने उपचार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून योगा, श्वसनाचे व्यायाम करणे उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. रुग्णांच्या अशा सकारात्मक आणि शांत मनामुळे बºयाचदा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि चमूलाही त्याची बरीच मदत होते.

- जागतिक कर्करोग दिनानिमित्त काय संदेश द्याल?
प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता, नियमित व्यायाम, योग्य आहार या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. केवळ कर्करोग दिनानिमित्त हे अंमलात आणून उपयोग नाही, तर दैनंदिन जीवनात याचा अवलंब केल्यास निश्चित कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होईल. मी आणि माझ्या चमूने आत्तापर्यंत हजारांहून यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

- महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, त्याचे काय कारण?
स्तनपान न केल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आणि मुख्य म्हणजे सुशिक्षित वर्गात हे अधिक असल्याचेही दिसून येते. याशिवाय, बºयाचदा भारतीय महिलांमध्ये आनुवंशिक असमोतल असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. लग्न उशिरा होणे, गर्भधारणेस विलंब होणे हेदेखील कर्करोगामागील कारणे मानली जात आहेत.

- पेशंट नेव्हिगेशन कोर्सबद्दल थोडेसे सांगा?
टाटामध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण आहे, त्यांच्या मदतीसाठी हा कोर्स डिझाइन करण्यात आला आहे. हा कोर्स म्हणजे ‘पेशंट नेव्हिगेशन’ या नावाने ओळखला जातो. हे कोर्सचे पहिलेच वर्ष असून, या माध्यमातून पदवीधर, पदव्युत्तर झालेले तरुण प्रवेश घेऊ शकतात. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना प्राथमिक माहिती देणे, त्यांना मदत-मार्गदर्शन करणे, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून हे स्वयंसेवक/प्रतिनिधी कोर्सद्वारे घडविण्यात येणार आहे. या कोर्सविषयी संस्थेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.