पितरांबाबतची कृतज्ञता व्यक्त केली गेली नाही तर तो मागासलेपणा ठरेल

By दा. कृ. सोमण | Published: September 10, 2017 03:00 AM2017-09-10T03:00:11+5:302017-09-10T03:00:51+5:30

If gratitude is not expressed to the Father, it would be backwardness | पितरांबाबतची कृतज्ञता व्यक्त केली गेली नाही तर तो मागासलेपणा ठरेल

पितरांबाबतची कृतज्ञता व्यक्त केली गेली नाही तर तो मागासलेपणा ठरेल

Next

आधुनिक काळात श्राद्ध करणे हे मागासलेपणाचे कृत्य आहे, अशीही काहींची समजूत असते. परंतु यात खरं म्हणजे मागासलेपण काय आहे? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, जमीन जुमला, इस्टेट ठेवली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेली तर त्यात मागासलेपणा काय आहे? उलट अशी कृतज्ञता व्यक्त केली गेली नाही तर तो मागासलेपणा ठरेल. त्यामुळे पितृपक्षात पितरांचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि तशी श्रद्धा असणे स्वाभाविक आहे.
अशुभ काहीही नाही
काही लोक पितृपक्षाचे हे पंधरा दिवस अशुभ, वाईट असे समजतात. हा मात्र एक मोठा गैरसमज आहे. या दिवसात सोने, चांदी, घर, गाडी यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे टाळतात. हेही चुकीचेच आहे. काही लोक विवाहाची किंवा उद्योग-व्यवसायातील महत्त्वाची बोलणी करण्याचेही टाळतात; मात्र असे करण्याचे काहीच कारण नाही. आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करणे हे अशुभ-वाईट कसे असू शकेल? आणि भाद्रपद कृष्ण पक्षात आपले मृत नातेवाईक यमलोकांतून जर आपल्या घरी राहण्यासाठी येतात अशी समजूत असेल तरी त्यात घाबरण्याचे काय कारण आहे. उलट ते आपल्याला आपल्या कार्यात आशीर्वाद, शुभेच्छाच देतील ना? हा ! जर कुणी त्यांना जिवंतपणी त्रास दिला असेल तर मात्र त्यांना त्या मृत पूर्वजांची भीती वाटणे साहजिक आहे.
श्रद्धा असेल तर कुणीही श्राद्ध विधी करायला कसलीच हरकत नाही. कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मृत्यूनंतर श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणी त्या माणसांना सुख देणे हे जास्त गरजेचे आहे. जिवंतपणी त्या माणसास जर आपण दु:ख दिले असेल तर त्याच्या मृत्यूनंतर श्राद्ध करण्याला काहीच अर्थ राहत नाही.
श्राद्ध प्रथा ही भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पितरांच्या म्हणजे मृतात्म्याच्या ठायी पुढील पिढ्यांचे भले-बुरे करण्याचे सामर्थ्य असते या कल्पनेतूनच श्राद्ध कल्पनेचा उदय झाला असावा. श्राद्धाचे पार्वण, एकोद्दिष्ट, नांदी व सपिंडीकरण असे चार प्रकार सांगण्यात आलेले आहेत. पित्रादी त्रयींना उद्देशून केलेले जे श्राद्ध ते पार्वण होय. एकाच्याच उद्देशाने व एकाच पिंडाने करावयाचे श्राद्ध ते एकोद्दिष्ट श्राद्ध असते. पुत्रजन्म, उपनयन, विवाह इत्यादी शुभप्रसंगी जे वृद्धिश्राद्ध करतात त्याला नांदीश्राद्ध म्हणतात. मृत्यूच्या बाराव्या दिवशी मृत व्यक्तीच्या पिंडाचे पितामह, प्रपितामह व वृद्ध प्रपितामह या त्रयींचे पिंडाशी संयोजन करतात ते सपिंडीकरण श्राद्ध असते. श्राद्ध अनेक प्रकारे करता येते. श्राद्धाला किती पैसे खर्च केले हे महत्वाचे नसून हे आपण किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचे असते. इथे माणसाचे मन महत्त्वाचे असते. अशाप्रकारे श्रद्धांजली वाहिल्याने काही लोकांना मन:स्वास्थ्य मिळत असते.
पितृपक्षात अनेक लोक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ श्रद्धेने जेवणाचे एक पान वाढून पक्ष्यांसाठी बाहेर ठेवतात. जर कावळ्याने ते जेवण जेवले तर आपले पितर आपल्यावर खूश आहेत असे मानले जाते. काही लोक गार्इंनाही जेवण खाऊ घालतात. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने पितृपक्ष पाळला जातो. महाराष्ट्रात आपण ज्याला भाद्रपद कृष्णपक्ष म्हणतो, उत्तर भारतात त्याच पक्षाला आश्विन कृष्णपक्ष म्हणतात. अनेक देशांत, विविध संस्कृतींत मृत पूर्वजांसाठी असे करण्याची प्रथा असल्याचे दिसून येते.

आधुनिक काळात रक्तदान, ज्ञानदान, नेत्रदानाचा संकल्प, अवयव-देहदानाचा संकल्प करूनही श्रद्धेने आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते. काही लोक श्रद्धेने आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्य करणाºया संस्थांना आर्थिक मदत देत असतात. आधुनिक काळात असे करणे जास्त योग्य होईल. नवीन पिढीलाही ही गोष्ट नक्कीच पटेल. अर्थात यासाठी किती खर्च करतो याला महत्त्व नसते. आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कायम निर्व्यसनी, नीतिमान, परोपकारी, मेहनती राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्यकर्म केले तरी ते चांगले होईल. तेच खरे श्राद्ध होईल, त्यामुळेच आपल्या मृत पूर्वजांना खरे समाधान लाभेल.

भाद्रपद कृष्णपक्षातच श्राद्ध करावयास का सांगितले असावे याचा कार्यकारणभावही शोधता येईल. भारत हा शेतिप्रधान देश आहे. भाद्रपद शुक्लपक्षात शेतात धान्य तयार होत असते म्हणून चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. या दिवशी मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भाद्रपद कृष्णपक्षात ज्या पूर्वजांनी आपणास जमीन ठेवली त्यांच्याप्रति श्रद्धेने श्राद्ध करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवरात्रात शेतातील धान्य घरात येते म्हणून निर्मिती शक्तीची-देवीची पूजा केली जाते. शेतातील धान्य घरात आल्यावर मग आनंदाने दसरा-दिवाळी हे सण साजरे केले जातात.

प्राचीनकाळी उत्तर दिशा ही देवांची आणि दक्षिण दिशा ही यमाची मानली जाई. भाद्रपद कृष्णपक्षाच्या सुमारास २२ - २३ सप्टेंबर रोजी सूर्य सायन तूळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. या दिवसाला विषुविदन असेही म्हटले जाते. सूर्याचे दक्षिण गोलार्धात प्रवेश करण्याचे हे प्रारंभीचे दिवस पितृपक्षाचे दिवस म्हणून ठरविण्यात आले असावेत, असेही सांगता येऊ शकते. शेवटी हे सर्व विधी का करायचे तर माणसाने माणसासारखे माणुसकीनेच वागावे हा त्यामागचा उद्देश असावा आणि आजच्या काळात त्याचीच खरी आवश्यकता आहे.

(लेखक हे पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक आहेत)
 

Web Title: If gratitude is not expressed to the Father, it would be backwardness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.