कशी साधावी भूकमुक्ती?

By किरण अग्रवाल | Published: November 17, 2018 08:55 AM2018-11-17T08:55:07+5:302018-11-17T09:00:37+5:30

पाणी व पर्यावरणाबद्दल जशी चिंता बाळगली जाते तशीच ती येणाऱ्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या भुकेच्या समस्येबद्दल बाळगली जाणे गरजेचे बनले आहे.

Hunger pains challenge India's development claims | कशी साधावी भूकमुक्ती?

कशी साधावी भूकमुक्ती?

Next

किरण अग्रवाल

लोकसंख्यावाढीचा वेग चिंताजनक बनला असून, साधन-सामग्रीची भासणारी कमतरता अगर व्यवस्थांवर येणारा ताण एवढ्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते; परंतु त्याहीपेक्षा आणखी एक बाब महत्त्वाची आहे जी संयुक्त राष्ट्राने लक्षात आणून दिली आहे ती म्हणजे, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी भुकेची समस्या. त्यामुळे पाणी व पर्यावरणाबद्दल जशी चिंता बाळगली जाते तशीच ती येणाऱ्या काळात सामोरे जावे लागणाऱ्या भुकेच्या समस्येबद्दल बाळगली जाणे गरजेचे बनले आहे.

माणसाची भूक वाढत चालली आहे, असे आपण सहज म्हणून जातो. ही भूक आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याशी संबंधित असते. कितीही मिळाले तरी मनुष्याचे समाधान होत नाही, या अर्थाने तसे म्हटले जाते. परंतु शब्दश: विचार करता, अन्नाद्वारे भागविली जाणारी भूकदेखील वाढत असून, आगामी काळात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाची भूक भागवता येईल का, हा जटिल प्रश्न ठरणार आहे. भूक व भयमुक्ततेची आश्वासने सर्वत्रच दिली जातात. जन्माला आलेली कुणीही व्यक्ती भुकेली वा उपाशी झोपू नये असा आदर्श विचार बाळगला जातो; परंतु ही भूकमुक्ती साधणे अशक्यप्रायच असल्याचे म्हणावे लागेल. कारण, भूक भागविणारे अन्नधान्य उत्पादन; ते पिकवण्यासाठी लागणारी जमीन आदी आहे तेवढीच असताना खाणारी तोंडे मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. संपूर्ण पृथ्वीवर आज सुमारे 750 कोटींपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या लवकरच सुमारे 900 कोटींवर पोहचेल, असे म्हटले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकांची भूक भागवायची कशी, असा प्रश्न त्यातून उभा राहणार आहे, कारण आजच त्यासाठी दमछाक होताना दिसत आहे.

अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या 2018च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार (ग्लोबल हंगर इण्डेक्स) 119 देशांच्या यादीत भारत तब्बल 103 क्रमांकावर आहे. गत वर्षापेक्षा चार नंबरने ही घसरण अधिक आहे. त्यामुळे मोदी सरकारनेही भूकमुक्तीच्या कितीही गप्पा केल्या तरी त्यात अर्थ नसल्याचेच स्पष्ट व्हावे. अशास्थितीत वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे हे कसरतीचेच ठरणार आहे. कारण, एक तर आजच सर्वाना पुरेल एवढे अन्न नाही. जे आहे ते सर्वाना परवडेल असेही नाही. शिवाय, उपलब्ध असणारे अन्न शरीराला आवश्यक असणारी प्रथिने पुरविणारे म्हणजे सकस आहे का, हा आणखी वेगळा प्रश्न आहे. आपल्याकडे कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे ते या सकस अन्नाच्या अभावामुळेच. मागच्या, म्हणजे 2010 च्या इंडिया स्टेट हंगर इण्डेक्सनुसार महाराष्ट्रामधील सुमारे 27 टक्के लोकांना जेवणातून मिळणारे उष्मांक पुरेशा प्रमाणात मिळतील असे अन्न मिळत नाही. गरिबी, बेरोजगारी यामुळे सकस अन्न घेऊ न शकण्यातून ही समस्या उद्भवते आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ती दिवसेंदिवस उग्र होत जाणार असून, त्यामुळेच अन्नाची मागणी वाढून भुकेची समस्याही वाढणार आहे, संयुक्त राष्ट्राला तीच चिंता भेडसावते आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मनुष्याच्या खाण्या-पिण्याबाबतच्या बदललेल्या सवयी व त्याच्या शारीरिक वाढीमुळे आगामी काळात आजच्यापेक्षा अधिक भूक वाढलेली असेल. प्रा. डॅनियल म्युलर व फेलिप वास्क्वेझ यांनी 1975 ते 2014 या काळात यासंदर्भात घडलेले बदल या अहवालात नोंदविले असून, त्यात 186 देशांचा अभ्यास केला गेला आहे. या काळात मनुष्य 14 टक्क्यांनी अधिक सशक्त झाल्याने त्याची भूकही वाढल्याचे म्हटले आहे. पूर्वी मानवाला जितक्या कॅलरीज लागत होत्या, त्यापेक्षा आज अधिक लागत असल्याचे व मनुष्याच्या वजनातदेखील सुमारे सहा ते 33 टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदविले आहे. स्वाभाविकच सशक्तता व वजन-उंची वाढल्याने त्याची भूकही वाढली आहे. त्याकरिता अन्नाची मागणीही अपरिहार्यपणे वाढली आहे. यापुढील काळात लोकसंख्या जसजशी वाढेल, तसतसा हा विषय अधिक गंभीरपणे समोर येणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी होऊ शकणारे झगडे व पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या जागृतीप्रमाणोच सकस अन्नाच्या उत्पादनाकडेही गांभीर्याने लक्ष पुरवावे लागणार आहे.

Web Title: Hunger pains challenge India's development claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत